• 30
  • 1 minute read

इगतपुरीचे दहा दिवस

इगतपुरीचे दहा दिवस

“हाताच्या मनगटावरचा धागा आणि बोटातली अंगठी काढून टाकावी लागेल “इगतपुरीला विपश्यनेच्या पहिल्याच दिवशी नाव नोंदणी करताना तिथल्या धम्म सेवकांनी सांगितलं.

अनेक वर्षे माझ्या उजव्या हातात एक धागा बांधत होतो. तो बांध असं कोणी मला सांगितलं नव्हतं आणि तो धागा बांधल्यामुळे मी कुठली पथ्यं पाळत होतो असंही नाही. पण मनात एक श्रध्दा होती आणि आताशा मला त्या धाग्याची सवय झाली होती. बोटातल्या अंगठीचं पण तेच. आईने सांगितलं म्हणून मी ती वापरायला सुरुवात केली आणि वापरत राहिलो. आता तो धागा काढणं सहज शक्य नव्हतं म्हणून त्यांनी कात्रीने तो कापून टाकला आणि अंगठी एका कागदात गुंडाळून ठेऊन दिली. मोबाईल काढून घेतला गेला. तो जमा करताना पटकन मला तो बंद करता येईना. मी शेवटचा मोबाईल केव्हा बंद केला होता तेच आठवेना.

दहा दिवसाच्या विपश्यनेची अशी ही सुरुवात. दहा दिवस मौन पाळायचे. संध्याकाळी जेवण नाही फ़क्त मका आणि कुरमुर्‍याचा थोडा चिवडा, एखादे फळ आणि दूध. पहाटे चार वाजता उठायचे. साडेचार पासून ध्यानाला सुरुवात. साडेसहा वाजता नाश्ता, अकरा वाजता जेवण आणि सायं पाच वाजता नाश्ता. रात्री साडेनऊ वाजता झोपी जायचे. दिवसभरात जवळ जवळ दहा तास ध्यानसाधना. शारिरीक आणि मानसिक पातळीवर शस्रक्रियेला न कळत सुरुवात झाली होती.

मोबाईल वापरायला सुरुवात केल्यापासून सलग दहा दिवस मोबाईलपासून दूर राहण्याचा हा पहिलाच प्रसंग. कधी कधी दुर्गम भागात भटकंतीला गेलो असताना रेंज नसल्याने तीन चार दिवस मोबाईल वापरला जायचा नाही तरी पण फोटो काढायला का होईना मोबाईल जवळ असायचाच. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत जवळ असणार्‍या आणि जणू काही आपल्या शरीराचाच एक भाग झालेल्या मोबाईलशिवाय कसं राहता येणार हा एक प्रश्नच होता. मोबाईल नसल्याने सकाळी उठण्यासाठी एक साधं गजराचं घड्याळ सोबत नेलं होतं. राहण्यासाठी स्वतंत्र टुमदार खोली होती. त्यात एक पलंग, एक खुर्ची, बाथरुम आणि गिझरची सोयही होती. सोबत वही, पेन, पुस्तक , फोटो असलं काहीही न्यायचं नव्हतं. पहाटे ४ वाजता घंटा वाजायची. खोलीच्या बाहेर छोट्या घंटीचा नाद करत सेवक उठायची वेळ झाली हे सांगायचे.

तिथे मौनाला “ आर्यमौन“ असं म्हणतात. म्हणजे वाणीने नव्हे तर शारिरीक हातवारे करुनही बोलायचं नाही. तुम्हाला काही शंका असतील तिथल्या गुरुजींशी ठरलेल्या वेळेत हळू आवाजात त्या विचारता येतात.

दहा दिवस जणू एखाद्या बेटावर राहिल्यासारखे! समोर माणसं दिसतात पण त्यांच्याशी बोलता येत नाही. कोणत्याही प्रकारे संपर्क करता येत नाही. दूरवरच्या आपल्या माणसांशी संपर्क करण्याचा प्रश्नच नाही. जगाची कोणतीही बातमी तुमच्यापर्यंत पोचत नाही. तुम्ही पूर्ण एकटे पडता. हा अनुभव अक्षरश: डोळे उघडणारा असतो. असं पूर्ण वेळ स्वत:सोबत रहाण्याची सवय कुठे असते आपल्याला? सतत बहिर्मुख असणारं आपलं मन आणि त्यात आता सोशल मिडिया, टिव्ही, मोबाईलमुळे अथकपणे बाहेर पाहण्याची आपली सवय. या एकांतातला एक एक तास हा एक एक दिवसासारखा भासायला लागतो.

दिवसभरातला थोडा वेळ विश्रांती मिळायची तेव्हा रुमवर येणं व्हायचं. रुमवर येऊन काय करायचं हा प्रश्नच असायचा. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ती खोली एखाद्या तुरुंगासारखी भासायला लागे. मोबाईल नाही, लॅपटॉप नाही, टिव्ही नाही, रेडिओ नाही, साधं पुस्तक ही नाही की पेन नाही. रुमवर इलेक्ट्रीकचे दोन पॉइंट होते. मी त्यांच्याकडे शुन्य नजरेने पहात रहायचो. त्याठिकाणी मनाला चार्ज करण्याशिवाय माझ्याकडे काहीच नव्हतं. करण्यासारखं काहीच नसल्यामुळे अगदी खुळावल्यासारखं व्हायचं. मग वेळ काढायला खुर्चीत बसून खिडकीतून दिसणारी झाडाची फांदी पहात बसायचे. सतत कशात तरी मन रमवायची सवय लागलेल्या मन आणि शरीरासाठी हा एकटेपणा अक्षरश: अंगावर यायला लागतो. काहीही न करता स्वत:सोबत बसून राहणं किती अवघड आहे हे उमगायला लागतं. तिसर्‍याच दिवशी काहीतरी आतून तुटायला लागलं. काही कारण कळेना. एखादी जखम उघडी केल्यावर आतलं सगळं दूषित रक्त वाहू लागतं तसं काहीतरी मनाच्या पातळीवर जाणवू लागलं. निचरा होत असल्यागत. खूप विलक्षण अनुभव!

कपड्यांचे साताठ जोड नेले होते. तिथे लौंड्रीची सोय होती. पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्री धुतलेले कपडे दुसर्‍या दिवशी सकाळी वाळायचे. कोणीच कोणाकडे पहात नसल्याने किंवा बोलत नसल्याने आपण काय घातले आहे याची कोणालाच फिकीर नव्हती. दहा दिवसांसाठी दोन साधे खादीचे सदरे आणि दोन सूती विजारी, एवढेच कपडे वापरले गेले. बाहेर पाहणं कमी करुन आत पहायला लागलं की लक्षात येतं की आपल्या गरजा किती कमी आहेत.

इगतपुरी धम्मगिरीचा परिसर अतिशय रम्य आहे. तिथली रचना अशी आहे की लांबवर दृष्टी टाकली तरी डोंगर आणि निसर्गाशिवाय दुसरं काही दिसत नाही. बाहेरच्या जगाशी पूर्ण संपर्क तुटला जातो. कोणत्याही बातम्या तुमच्यापर्यंत पोचत नाहीत. आपल्या आप्तांविषयी मनात विचार येत असतात. नोकरी, धंदा, मित्र परिवार या विषयी विचार येत राहतात. याचं काय झालं असेल आणि त्याचं काय झालं असेल. मी नसताना बाहेरच्या जगात काय चाललं आहे. मी नसल्यामुळे कोणाचे आणि काय अडत असेल? असे अनेक विचार मनार रुंजी घालत असतात. आणि दहाव्या दिवशी फोन हातात आल्यावर जेव्हा समजतं की तुमच्याशिवाय जगात सगळं अतिशय उत्तम सुरु आहे, कोणाचं काहीही अडलेलं नाही तेव्हा तुमचा अहं न कळत दुखावतो. आपण करत असलेल्या अनेक निरर्थक गोष्टीतली व्यर्थथा लक्षात यायला लागते.

जे मनाचं तेच शरीराचं. त्याला तरी एका जागी स्थिर बसण्याची कुठे सवय आहे. शांतपणे कुठलाही विचार न करता एका ठिकाणी तासभर बसणं सुध्दा कष्टप्रद असतं. म्हणजे चित्रपट किंवा क्रिकेट सामना वगैरे आपल्या आवडत्या गोष्टी करायला आपण तासंतास एका जागी बसू शकतो पण मनात काहीही विचार न आणता शांतपणे एका ठिकाणी बसायचं म्हंटलं की शरीर बंड करुन उठतं.

रोज जवळपास दहा तास ध्यान करायचे. मन स्थिर करण्यासाठी आपल्या श्वासांचीच मदत घेऊन त्याकडे साक्षीभावाने पहात रहायचे. सायंकाळी गोयंका गुरुजींची रेकॉर्डेड प्रवचने असायची. विपश्यनेविषयी आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यात मिळत असत. अत्यंत मधाळ आणि भारदार आवाजातील या प्रवचनांची रोज ओढ लागलेली असायची.

धम्मगिरीमधे कुठेही कुठलीही मूर्ती नाही किंवा तसबीर नाही किंवा आकृती नाही. पगोडामध्ये तरी एखादी मूर्ती असेल असे वाटले होते तर आत गेल्यावर समजले की तिथे कुठलीही मूर्ती नसून केवळ ध्यानाची शुन्यागारे आहेत. त्या शुन्यागारातल्या अंधारात शांतपणे बसून ध्यान करण्याचा अनुभव शब्दातीत आहे.

अनित्य/ अस्थिर असणे हा वैश्विक नियम आहे. या विश्वात सतत बदल होत आहे. अगदी अणूरेणू पासून ते सुर्यमालेच्या पलिकडच्या अथांग विश्वात सतत बदल होत असतो. तोच नियम आपल्या शरीरातल्या पेशी पेशींना लागु आहे. जुनं नष्ट होणं आणि नवीन निर्माण होणं हेच सत्य. आपल्या सार्‍या विकारांचा उगम मनात आणि शारिरीक पातळीवर होत असतो. सगळं अनित्य आहे हे बुध्दीच्या पातळीवर लक्षात आलं तरीही आसक्ती आपल्या मनातून जात नाही. आपला मीपणा सुटत नाही, अहं जात नाही.

आपल्या विकारांचं आणि आपल्या शरीराचं खूप जवळंच नातं आहे. सर्व विकारांचं मूळ कुठेतरी शारिरीक संवेदनांमधे दडलेलं असतं. म्हणजे एखाद्याला तंबाखूचं व्यसन आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला खरं तंबाखूचं व्यसन नसून ती खाल्यामुळे त्याला शारिरीक पातळीवर जे काही नशा किंवा किक वगैरे सुख वाटतं त्या संवेदनांचं व्यसन असतं. कुठल्या तरी देवामुळे किंवा साधुमुळे किंवा कोणी सांगितलं म्हणुन तुम्ही तंबाखु सोडली तरी ते वरवरचं दमन झालं. आत सुप्त तुमची जी भावना आहे त्यापासुन तुम्ही मुक्त झालेला नसता. या शरीर पातळीवरच्या संवेदनांकडे आपण कधी जाणीवपुर्वक लक्ष देत नाही.

धर्म म्हणजे केवळ पोथ्या , उपवास , भजन जप , वार्‍या, यात्रा नव्हे. हे सगळं करण्यात गैर काहीच नाही परंतु हे करत असताना आपण त्यामागचा खरा अर्थच विसरुन जातो आणि केवळ कर्मकांडात अडकून राहतो. तोच धर्म आहे असे आपल्याला वाटू लागते. हे सगळं आपण फार विचारपुर्वक करत असतो असंही नाही. दुसरं कोणीतरी करतं किंवा सगळे करतात किंवा कोणीतरी सांगितलं म्हणुन आपणही ते करत असतो. याची दुसरी गोची अशी की पुन्हा आपण जे करत असतो त्या कर्मकांडाबद्दलच आपल्याला आसक्ती निर्माण होते आणि आपलाच मार्ग कसा श्रेष्ठ असा नवा विकार जन्माला येतो. आपली साधना किंवा श्रध्देच्या बाह्य खुणा शरीरावर किंवा वस्त्रांवर बाळगणे हे सुध्दा मनाच्या कमकुवतपणाचेच लक्षण! गुरुजींची प्रवचनं ऐकताना मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात. पहिल्याच दिवशी मनगटावरचा धागा आणि अंगठी का काढायला लावला याचं कारण समजायला लागतं.

पण विकार आणि शारिरीक पातळीवरील या संवेदनांकडे साक्षीभावाने पहायला शिकलं की या विकारांच्या मुळावर घाव घालण्याची शक्यता निर्माण होते. विपश्यना या शब्दाचा अर्थ आहे विशेष प्रकारे पाहणे. सत्य पहाणे व जराही विचलीत न होणे. तटस्थपणे, अलिप्तपणे, निर्विकारपणे पहाणे. ही मन आणि चित्त शुध्द करण्याची साधना आहे. त्याचा कोणत्याही धर्माशी, पंथाशी, नावाशी ,आकृतीशी संबंध नाही.

बुध्दीच्या पातळीवर अनेक संकल्पनांचं पांडित्य आपल्याकडे असतं. पण प्रत्यक्ष त्याची व्यवहारात आणि शारिरीक पातळीवर अंमलबजावणी होतेच असं नाही, किंबहुना ती अतिशय कठीण असते. त्यासाठी लागणारा एकांत आणि मन अंतर्मुख करण्याची संधी आपल्याला क्वचितच मिळते. नेमकी हीच गोष्ट या दहा दिवसात आपल्याकडून करवून घेतली जाते. मानसिक आणि शारिरीक पातळीवरचा हा एकांत सुरुवातीला अतिशय जड जातो. मन आणि शरीर क्षणोक्षणी बंड करुन उठते. तिथून पळून यावे असे विचार अनेकदा मनात येतात. दोन तीन दिवसात मात्र याची एकदा सवय झाली की या एकांतातली गोडी लक्षात यायला लागते.

या कोर्सची कुठलीही फी आकारली जात नाही. फी भरली की पुन्हा अहंकार जागा होतो. एखाध्या भिक्षुकाप्रमाणे आपण तिथे रहातो. कोणीतरी आधी दान केलेलं असतं त्याने तुमची सोय झालेली असते. विपश्यना शिकवण्याची कोणतीही फी नसली तरी राहण्याखाण्याचा खर्च आहेच. तुम्हाला कोर्स आवडला आणि आपल्यासारखाच इतरांना याचा उपयोग व्हावा असं वाटलं तर शेवटच्या दिवशी दुसर्‍या कोणासाठी दान करावे. त्याची कोणतीही सक्ती नाही.

दहाव्या दिवशी मौन समाप्त झाले. मोबाईल हातात आला तरी तो पटकन सुरु करावा वाटेना. दहा दिवस जी असीम शांतता अनुभवली होती ती तशीच पुढे चालू ठेवावी असं वाटत होतं. घरी फोन करुन खुशाली विचारली. सगळं ठिकठाक होतं. घरी, दारी सगळं छान चाललं होतं. माझ्यावाचून कोणाचं अडलं नव्हतं की कोणावाचून माझंही अडलं नव्हतं.

पुन्हा फोन बंद केला. दहा दिवस पेपर पाहिला नव्हता की कोणतीही बातमी ऐकली नव्हती. घर नव्हते की ऑफीस. व्हाटसअप, युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, शेअर मार्केट काहीही नव्हते. माहितीचे सर्व स्त्रोत बंद होते आणि त्यामुळे काहीही बिघडले नव्हते. उलट मन अगदी शांत झाले होते. लक्षात आले की कितीतरी अनावश्यक गोष्टींचा कचरा मी रोज मनात जमा करत होतो. अनेक बातम्या आणि माहिती ज्याचा माझ्या दैनंदिन आयुष्यात काहीच उपयोग नव्हता त्यावर मी चर्चा करत होतो आणि वाद घालत होतो. यामुळे निष्कारण आपल्याच जवळच्या माणसांबद्दल मनात उगाच अढी बाळगून होतो.

केवळ दहा दिवस हे सगळं बंद झालं तर इतकं शांत वाटत होतं. एकांत आणि मौनातला आनंद काय असतो याची प्रचिती आली होती. अकाराव्या दिवशी तिथून बाहेर पडताना उगाचंच डोळे वहात होते. त्याचं नेमकं कारण कळत नव्हतं पण आतून अगदी शांत वाटत होतं. सगळा गाळ तळाशी बसल्यावर पाणी स्वच्छ होते तसं. पण गाळ तळाशी आहेच ही जाणीवही मनात होती. त्यावर मात करण्यासाठी साधनेत सातत्य ठेवायला हवं!

– प्रशांत साजणीकर.
(विपश्यना एक अनुभव)

0Shares

Related post

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!    …
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *