- 47
- 1 minute read
एका टेलरची हमाली !
टेलर कल्याण यांची ही कथा !
तुमच्या साहेबांना सांगा हवं तर मी अंगमेहनतीचं कोणतंही काम करुन देतो, तुमच्या संस्थेचं आवार साफ करुन देतो, किंवा काय सांगाल ते काम करतो पण साहेब मागताहेत ते मी नाही देवू शकत, मला माफ करा’ शैक्षणिक संस्थाचालक मित्राने पाठविलेल्या कर्मचाऱ्याला असा निरोप देवून टेलर कल्याण यांनी परत पाठवलं. त्यामुळे अनेक दिवस संस्थाचालक मित्राची नाराजगी राहिली, मात्र मैत्रीचे धागे तुटले नाहीत. कारण मित्रालाही माहिती होतं की त्याने जी गोष्ट मागितली होती ती टेलर कल्याणसाठी किती जीव की प्राण आहे ! त्यात टेलर कल्याण यांना काय कापावं, कसं कापावं आणि काय जोडावं, कसं जोडावं यांचं कौशल्य आहेच ! टेलरचं गळा कापणं मान वाढविण्यासाठी असतं.
टेलर कल्याण यांची ही कथा !
मी एक प्रवास संपवून 11.30 वाजताच नियोजीत बस स्थानकावर पोहोचलो होतो. वेळ रात्रीची होती. दुसरा प्रवास पहाटे 4.30 ला सुरु होणार होता. 11.30 ते 4.30 हा काळ घालवायचा होता. मी बस स्थानकातच बसण्याचा विचार केला. आजुबाजूला बसल्या बसल्या पेंगणाऱ्या, आडव्या झालेल्या, पाठ टेकलेल्या बाया-बापड्यांची गर्दी होतीच. अख्यं बस स्थानकच झोपेला हुलकावणी देत देत डुलक्या काढत होतं. मध्येच नाईट ड्युटीवाले स्थानक नियंत्रक गाड्यांची ठेवणीतल्या आवाजात घोषणा करत होते. माझ्यासारख्या लोकांना कान देवून तसेच आजुबाजूला बसलेल्यांकडून समजून घेवून घोषणेला डिकोडींग करावं लागत होतं, पण ज्यांच्यासाठी हे सरावाचं होतं त्यांना त्या घोषणेमधील शब्द निट कळत असावेत कदाचित म्हणूनच घोषणांगणिक माणसं एकमेकाला उठवत, लेकरांना तसंच उचलत,सामान सुमान घेवून गाडीच्या दिशेने पळत होती. बरं प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित गाड्या लागतील तर मग कसं चालेल ? सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या लौकीकाला कोठेही बाधा पोहोचणार नाही याची काळजी चालक लोकं घेत होतेच, प्रवाशांनाही अशा परिस्थितीत आपली गाडी शोधून काढण्याचे कौशल्य प्राप्त झालेले असल्याने हा लपाछपीचा खेळ सुसुत्रपद्धतीने सुरु होता. मध्येच हवालदार फिरत होता. तांबरलेल्या डोळ्यांनी करडी नजर ठेवत होता. त्याच्या डोळ्यांची अवस्था त्याच्या मनाची कथा सांगत होती. कधी मधी हातातला दांडा आपटत तो स्वत:चीही झोप उडवून लावत असावा कदाचित ! काही पोरं टाईमपाससाठी मोबाईलवर तुटून पडली होती, काहीजण जणू आजुबाजूच्या लोकांना गाढ झोप लागून त्यांची गाडी सुटून जाऊ नये याची काळजी घेण्यासाठीच मोबाईलचं सार्वजनिकरण करत होते. अशा अवस्थेत मी बॅगेतील एक पुस्तक काढलं आणि वाचत बसलो !
मी वाचत असतानाच माझ्या समोरच्या बाकावर बसलेल्या एका वयस्क गावकरी व्यक्तीकडे माझी नजर गेली. त्या व्यक्तीचा चेहरा तिच्या वयाचा अंदाज देत होता. तिच्यासोबत एक आजीही होत्या. त्यांनी बाकावर डोकं टेकवून आराम चालवला होता. तर माझी नजर त्या व्यक्तीवर पडली तेव्हा ती व्यक्ती माझ्याकडे एकटक पाहत आहे असं लक्षात आलं. नजरानजर होताच त्या व्यक्तीने ओळखीचं हास्य दिलं. मीही प्रतिसाद दिला. या व्यक्तीला आपण कुठे भेटलो होतो याचा मनातल्या मनात विचार करत होतो. तेवढ्यात त्या व्यक्तीचे डोळेही बोलू लागले, ते माझ्या हातातील पुस्तकावर खिळले आणि एवढ्या आधुनिक जगात मी पुस्तक वाचत बसलोय याचं कौतुक त्या डोळ्यांत दिसलं. मी त्यांना हातातील पुस्तक दाखवलं. त्यानंतर लोहचुंबकाकडे लोखंड जसं आकर्षित होतं तशीच ती व्यक्ती थेट माझ्या जवळ येवून बसली आणि तेथून टेलर कल्याण नावाच्या एका पुस्तकांचं एक एक पान वाचता आलं !
टेलर कल्याण यांना माझ्याजवळ खेचलं ते माझ्या जवळील पुस्तकाने ! मी कोणत्या विषयाचं पुस्तक वाचतोय याच्याशी त्यांना देणंघेणं नव्हतं, पण मी पुस्तक वाचतोय याचंच त्यांना कौतुक होतं. ते माझ्याजवळ आले आणि पुस्तकांवर बोलू लागले. “मलाही पुस्तक वाचण्याचा शौक आहे, हे बघा माझ्याजवळ आताही पुस्तक आहे.” त्यांनी एक पुस्तक काढलं, काही तरी नाव होतं (विसरलो). मी चाळलं, ते केवळ मनोरंजनात्मक नव्हतं, धार्मिकही नव्हतं, किंवा एखाद्या इझमला वाहिलेलं नव्हतं. पण या पुस्तकाने माझ्या सोबत असलेली व्यक्ती ही किरकोळ वाचक नाही हे माझ्या लक्षात आणून दिलं. मी काही बोलणार तेवढ्यात तेच म्हणाले, “साहेब, मी सर्व प्रकारचं वाचन करतो. माझ्याकडे धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, करमणूक,माहितीपर सर्व प्रकारची पुस्तकं आहेत, माझ्याकडे गिताही आहे आणि कुराणही आहे, बायबलही आहे. गांधीही आहेत आणि आंबेडकरही आहेत ! तुकाराम असोत की नथुराम; मी सर्वांना वाचलंय ! आज माझ्याकडे जवळ जवळ पाच हजार पुस्तकं आहेत. घरी स्वत:चं ग्रथालयच आहे. माझ्या घराजवळच असलेल्या कारखान्यातील अधिकारी लोकं माझ्या घरी येवून पुस्तकं वाचतात. माझ्या एका शैक्षणिक संस्थाचालक मित्राने त्याच्या संस्थेसाठी माझ्या पुस्तकांची मागणी केली होती पण मी नाही दिली. कारण माझ्यासाठी पुस्तकं जीव की प्राण आहेत ! “
जुनी नववी पास झालेले टेलर कल्याण हे एक असामान्य व चौफेर वाचकच ! पाचवी सहावीपासून त्यांना वाचनाचा छंद जडला. घरच्या परिस्थितीने त्यांच्या शिक्षणाचा मार्ग अडवला मात्र ही परिस्थिती त्यांच्या वाचनाच्या आड आली नाही. नववीनंतर त्यांना जगण्यासाठी हातपाय मारावे लागले. कल्याण उल्हासनगर गाठलं. तेथे एक पुस्तक हाती लागलं. शिवणकाम शिकवणाऱ्या या पुस्तकाने त्यांना टेलर हे नाव दिलं. पुढे गावात आले आणि शिवण काम करु लागले. स्त्री-पुरुष सर्वांचेच कपडे शिवण्याचं कसब त्यांना आहे. पण केवळ शिवणकामावर कसं भागेल ? मग त्यांनी शहराचा रस्ता धरला आणि इथे काही वेगळं करु लागले पण पुस्तकांची साथ सोडली नाही. 1975 मध्ये घेतलेलं शिवणकाम शिकवणारं पुस्तक आजही त्यांच्या गाठीला आहे, 1972 पासूनच्या वृत्तपत्रांच्या कात्रणांचं मोठ्ठं गाठोड (संग्रह) त्यांच्याकडे आहे.
टेलर कल्याण यांनी पुस्तकांची संपत्ती गोळा करण्यासाठी मोठा पैसा खर्च केला. त्यांची कमाई आणि पुस्तकांवरील खर्च हे गणित कसं जुळत असेल असा प्रश्न सहाजिकच माझ्या मनात आला, तो विचारताच ते म्हणाले की ‘साहेब मी एखादं पुस्तकं खरेदी केलं की खर्च झालेल्या पैशांची भरपाई करण्यासाठी पाच-दहा किलो मिटरचा प्रवास चालतच करतो.’
प्रवास भाडं वाचलं की पुस्तक वाचता येतं !
आता टेलर कल्याण यांचं वय 72 वर्षे आहे. ते शहरात जे काम करत होते ते आता त्यांच्या ताकदी पलीकडचे आहे. हमाली करायला शरिरात बळ असावं लागतं. टेलर कल्याण पुण्यात गेल्या पत्तीस वर्षापासून हमाली करत आहेत. बाबा आढाव यांच्या हमाल पंचायतीचे सदस्य आहेत. हमाली करताना डोकं वापरावं लागतं. पण या हमालाने डोक्यावर कसलंही ओझं वाहिलं असलं तरी डोक्यात पुस्तकं भरलेली आहेत.
ते केवळ वाचतच नाहीत तर संधी मिळेल तसं प्रबोधनही करतात. वक्ते आहेत, जमवलेल्या ज्ञानपुंजीवर ते आता एक पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहेत. त्यांच्या पिशवीत एक पुस्तक आणि एक डायरीही होती. त्यात त्यांनी लिहिलेल्या कविता होत्या, वाचताना काढलेली टिपणं होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख त्यांच्या मळकट व चुरगळलेल्या शर्टाच्या खिशाला असलेले दोन-तीन पेन करुन देत होते !
एकदा तर पुण्यातल्या एका कार्यक्रमासाठी त्यांना त्यांच्याच एका मित्राने बोलावलं होतं. शिवाजी महाराजांच्या नावाने जो काही खोटा इतिहास सांगितला गेला आहे त्यातीलच एका पात्राच्या नावाने हा कार्यक्रम होता. मित्राचं निमंत्रण मिळताच त्यांनी आपलं ज्ञान सांगितलं. “साहेब ते पात्र मुळात लादलेलं आहे मग मी अशा पात्राबाबत कसं बोलणार ? “ हा प्रश्न समर्थपणे विचारुन त्यांनी निमंत्रण स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. पण तो मित्र ठराविक विचारांचा केवळ हमाल असल्याने त्याने त्वरीत गर्दी गोळा केली. ! ज्याला आपला खोटा विचार लादायचा असतो तो अविचारच करतो. तो मुद्यांऐवजी पटकन गुद्यांवर येतो ! बाका प्रसंग उद्भवला ! किरकोळ शरिरयष्टी असलेल्या या विचारवंताला ठेचण्यासाठी हात सरसावले, काहीजणांनी हात चालवलाही. पण तेवढ्यात कुणीतरी मध्यस्थी केली आणि सुटका झाली. टेलर कल्याण डगमगले नाहीत किंवा त्यांनी आपले विचार सोडूनही दिले नाहीत. कारण त्यांचा गुरु पुस्तक आहे कुणी तोतया नाही ! त्यानेच त्यांना बळ दिलं.
टेलर कल्याण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावचे रहिवाशी !
साधारण एक दिड तास ‘एका टेलरची हमाली’ मी वाचत होतो. अजून बरीच पान परतायची होती. तेवढ्यात स्थानक प्रमुखाचा आवाज घुमला. टेलरचे कान टवकारले. सोबतच्या आजींनीही टेकलेलं डोकं पटकन वर केलं. आणि हातातल्या पिशव्या संभाळत ही वयोवृद्ध माणसं तोल संभाळत आडव्या उभ्या पार्क केलेल्या गाड्यांमधून वाट काढत आपल्या गाडीकडे धावली !!!
पाय फाकत चाललेल्या पाठमोऱ्या टेलर कल्याणकडे मी पाहत होतो …एक पुस्तक अर्धवट वाचून झालं होतं…आता हातातल्या पुस्तकाकडे वळलो खरा ! पण हातातल्या पुस्तकातही टेलरच दिसू लागले…
माझ्या एका प्राध्यापक मित्राने कुणा वक्त्याचा सांगितलेला किस्सा आठवला. या वक्त्यांने समोर बसलेल्या शिक्षकांना प्रश्न विचारला. “सर तुमच्याकडे हे असले महागडे कपडे किती आहेत ? मॅडम असल्या किती साड्या आहेत ?” उत्तरं अर्थातच तीन-चार-पाच- सात अशी काही तरी आली. ही हाऊसफुल उत्तरं ऐकल्यानंतर मग त्यांनी विचारलं की ‘पुस्तकं किती आहेत ?’ एक दोनजण काही तरी पुटपूटले पण बाकी शांतता पसरली. मग तो वक्ता म्हणाला “तुम्ही सर्वजण एक पुस्तक मात्र नक्की वाचता ! ते म्हणजे बँकेचं पास बुक !” उपस्थित शिक्षक स्वत:वरच हसले !!! काहीजण खलीजही झाले असावेत ! पण इथे हा एक हमाल पुस्तकांतील ज्ञानाचा पाठलाग करण्यासाठी पायपीट करतोय !
शिक्षकाचा आणि वाचनाचा जवळचा संबंध म्हणून शिक्षक आठवला. बाकी पुस्तकांची संगत सर्वांनाच करायला हवी, तरच ती आयुष्यभर साथ देतात.
पेशाचं (पैशाचं) ओझं वाहणाऱ्यांपेक्षा विचारांचं ओझं वाहणारा हा टेलर म्हणून प्रसिद्ध असलेला हमाल कैकपटीने आदर्श आणि प्रतिष्ठीत !
समाजाला अशा सुज्ञ नागरीकांची गरज आहे !