इचलकरंजी दि. १८ – “दि. १९ मार्च १९८६ या दिवशी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील नीलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपली पत्नी व चार मुले यांच्यासह विष घेऊन आत्महत्या केली. तेंव्हापासून १९ मार्च हा “एक दिवस अन्नदात्यासाठी – एक दिवस उपोषण” या पद्धतीने आत्महत्या स्मृतिदिन आणि जगाचा पोशिंदा असलेल्या या देशातील अन्नदात्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी आपल्या सद्भावना व सहवेदना व्यक्त करण्यासाठी उपोषण या मार्गाने केला जातो. राज्यातील तसेच देशातीलही अनेक ठिकाणी हे उपोषण “जेथे शक्य असेल तेथे” या पद्धतीने केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यामधील कार्यकर्त्यांच्या वतीने आजच्या ३८ व्या स्मृतिदिनी “अन्नदात्यासाठी उपोषण’ हा कार्यक्रम सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शेतकरी कामगार पक्ष कार्यालय, टेंभे रोड, कोल्हापूर येथे समाजवादी पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि भावनांना पाठिंबा म्हणून या अन्नत्याग सत्याग्रहामध्ये विविध पक्षातील सर्व कार्यकर्ते तसेच इंडिया आघाडीमधील सर्व बंधू-भगिनीनी सहभागी व्हावे असे आवाहन समाजवादी पार्टीच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे, समाजवादी पार्टीचे महासचिव व किसान सभेचे संघटक शिवाजीराव परुळेकर, राज्य कार्यकारीणी सदस्य रविंद्र जाधव व कोल्हापूर शहर अध्यक्ष मधुकर पाटील यांनी केले आहे.
कर्जबाजारीपणा, नापिकी, कधी दुष्काळ तर कधी अवकाळी, शेतीमालाला भाव नाही, सरकारी हस्तक्षेप, पीक विम्यातील सावळागोंधळ, व्यापारी दलालांची खाबूगिरी, वीज व पाणी प्रश्न, भाव पाडण्यासाठी निर्यातबंदी व अनुचित आयात अशा विविध कारणांमुळे महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढते आहे. गेल्या ३७ वर्षांमध्ये या देशामधील किमान चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पहिल्या आत्महत्येचा स्मृतिदिन आणि शेतकऱ्यांच्या प्रती सद्भावना आणि सहवेदना म्हणून हा कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र केला जातो. त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात येत आहे.