- 30
- 1 minute read
ओबीसी बहुजन पक्ष आणि वंचितचा आत्मविश्वासाचे बळ काय ?
नव्याने स्थापन झालेल्या प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पक्षाने सत्ताधारी पक्षातील छगन भुजबळ यांना व सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील काँग्रेस पक्षाचे कोल्हापूरचे उमेदवार व अकोल्यातील वंचितचे उमेदवार यांना पाठिंबा दिला आहे. ओबीसी बहुजन पक्षाच्या लेखी तीनही पक्षांचे धोरण, कार्यक्रम, राजकारण यांचे महत्व नसावे. ओबीसी आरक्षण एवढाच त्यांचा मुद्दा आहे आणि एवढ्या मुद्द्यावर त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे असे दिसते. आरक्षण हवे तर खासगीकरणाला विरोध करायला हवा वा खाजगी क्षेत्रातही आरक्षणाचा आग्रह हवा ही भूमिका दिसत नाही. हीच बाब जरांगेंची दिसते. त्यांना संकूचित होणा-या सरकारी क्षेत्रात सरसकट मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून हवे आहे पण तेही खाजगीकरण, भाजपाचा आक्रमक हिंदुत्ववाद, महागाई, बेरोजगारी इत्यादी जनसामान्यांच्या मुद्द्यांना स्पर्श करत नाहित. निवडणुकात, राजकारणात पडायचे नाही ही त्यांची भूमिका आहे.
ओबीसी बहुजन पक्ष व जरांगेंना सोबत घेऊन तिसरी आघाडी बनवण्याचा आंबेडकरांचा मनसुबा फलद्रूप झालेला नाही. जरांगेचा विषय संपवून टाका असे सांगून ओबीसी बहुजन पक्षाने वंचितपासून स्वतःला दूर ठेवले. जरांगेंनीही राजकारणात पडायचे नाही म्हणून आंबेडकरांचा प्रस्ताव दूर ठेवला. सद्यातरी वंचित एकटीच आहे. ओबीसी व जरांगेंचे आरक्षणवादी मराठे सोबत घेऊन सामाजिक युती साधत आहोत असे आंबेडकरांनी म्हटले असले तरी सामाजिक सौकर्याची जाण जरांगेंठायी आहे हे दिसून येत नाही अन्यथा आरक्षणप्राप्त दलितांच्या हाताखाली मराठ्यांना काम करायला लागणे याचा जरांगेंना विषाद वाटला नसता.
ओबीसी बहुजन पक्ष व वंचित सुरुवातीपासून एकटे पडले आहेत. स्वतःच्या विजयाची हमी ते कशात शोधतात हे स्पष्ट नाही. साधारणतः कोणताही लोकसभा मतदार संघ पंधरा लाख मतदार संख्येपेक्षा अधिकचा असतो आणि होणारे मतदान साधारणतः ६०% वा अधिकचे असते. अशा परिस्थितीत विजयासाठी किमान पाच लाखांच्या आसपास मते मिळवावी लागतात व ही क्षमता आज विपक्षातील एक दुकट्या पक्षात नाही म्हणून त्यांना आघाडीची गरज वाटते. ही किमया एकटा ओबीसी बहुजन पक्ष वा वंचित कशी करणार आहे? हे जर त्यांना जमले नाही तर त्यांना झालेले मतदान सार्थकी लागणारे नसेल!
काँग्रेसला सात जागांवर आंबेडकरांनी एकतर्फा पाठिंबा जाहीर केला आहे व पाच मतदारसंघात पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसकडे मतदार संघाची यादी मागितली आहे. पाठिंबा दिलेल्या दोन मतदारसंघांपैकी एक नागपूर मतदार संघ आहे. या मतदारसंघांमध्ये २००९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारिप बहुजन महासंघाचे यशवंत मनोहर यांना ४,४५५ मते मिळाली होती व त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सागर डबरासे यांना २६,१२८ (२.२%) मते मिळाली होती. आता २०२४ पर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांमध्ये या मतदार संघात फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे हे कशाच्या निकषांवर तपासायचे? असे नसेल तर वंचितांच्या पाठिंब्यामुळे भाजपाला लक्षणीय क्षती पोहोचेल वा काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल ही शक्यता संभवत नाही. मात्र नागपूर आणि कोल्हापूर मध्ये काँग्रेसला पाठिंबा एकतर्फा देऊन काँग्रेस अकोल्यात आपल्या विरुद्ध उमेदवार देणार नाही असा आंबेडकरांचा होरा असेल तर तो चुकला आहे असे म्हणावे लागेल कारण अकोल्यात आंबेडकरांच्या विरुद्ध उमेदवार देण्याचे काँग्रेसने सूतोवाच केले आहे. ओबीसी बहुजन पक्ष व वंचित बहुजन आघाडी ‘एकला चलो रे’ या आपल्या रणनितीमुळे किती सफल होतात हे लवकरच कळून येईल.
-उत्तम जागीरदार