ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याने सदस्यत्व रद्द !
धुळे, ता. २ : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात माहिती लपविल्याने अपत्याबाबत खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी हडसुने (ता. धुळे) येथील एका ग्रामपंचायत सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे, अशी माहिती धुळे येथील अॅड. विशाल साळवे यांनी दिली.
सन २०२२ मध्ये हडसुने ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत पोपट मांगु ठेलारी हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. मात्र, त्यास गावातील रहिवासी भारत चैत्राम देवरे यांनी हरकत घेतली. ग्रामपंचायत निवडणूक लढविताना पोपट ठेलारी यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये होती. ठेलारी यांना एकूण सात अपत्य असल्याची माहिती त्यांनी लपवून ठेवली अशी हरकत, देवरे यांनी घेतली व याबाबत अॅड. साळवे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदार देवरे व सदस्य ठेलारी यांचा लेखी व तोंडी युक्तिवाद ऐकला. ठेलारी यांना सदस्यपदावरून अपात्र घोषित करण्यात यावे, असा जोरदार युक्तिवाद अॅड. साळवे यांनी केला. दोन्ही बाजूंचे लेखी म्हणणे व युक्तिवाद ऐकून आणि उपलब्ध कागदपत्रे तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी ठेलारी यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित करण्याचा आदेश २७ जानेवारी २०२५ ला दिला. या निकालाकडे हडसुने गावासह तालुक्यातील राजकीय व सामाजिक व्यक्तींचे लक्ष लागून होते. या प्रकरणी अर्जदार देवरे यांच्यातर्फे अॅड. विशाल साळवे यांनी कामकाज पाहिले. त्यांना अॅड. मोनाली करडक, अॅड. कमलाक्षीदेवी पाटील यांनी सहकार्य केले.