महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४, संविधान, लोकशाही विरोधी असून या कायद्यामुळे नागरिकांच्या संविधानात्मक अधिकारांवर गदा येणार असल्याने समाजवादी पार्टी या विधेयकाला तीव्र विरोध करीत आहे. नागरिकांचे संविधानात्मक न्याय, हक्क अधिकार वाट्टेल ती किंमत मोजून वाचविण्यासाठी समाजवादी पार्टी तयार असून त्यासाठी विधिमंडळ व रस्त्यावरची ही लढाई समाजवादी पार्टी लढेल , असे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू असीम आजमी यांनी विधेयकाच्या विरोधात आपली भुमिका स्पष्ट करताना सांगितले.
आज सरकार जनसुरक्षा विधेयक सभागृहात मांडणार असून समाजवादी पार्टी या विधेयकाला विरोध करेल, या विधेयकात कुठल्याही सुधारणा आम्हाला नको आहेत. हे विधेयकच नको आहे, ही स्पष्ट भुमिका असल्यावर सुधारणा सुचविण्याचा प्रश्नच येत नाही, असे ही ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले. विधानभवन परिसरात आज ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्यातील जनता या विधेयकाच्या विरोधात ठामपणे उभी राहिली असून समाजवादी, डावे पक्ष, संघटना व सामाजिक संघटनांनी आपल्या एकजुटीचे प्रदर्शन करून या विधेयकाला असणारा आपला विरोध ३० जून रोजीच पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढून जाहीर केला आहे.
जनसुरक्षेचा नावाखाली स्वसुरक्षेचे विधेयक फडणवीस सरकार आणू पाहत असून या विधेयकाला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध होत आहे. मतांची चोरी करून स्थापन झालेल्या फडणवीस सरकारने भारतीय संविधानाने दिलेल्या नागरिकांच्या न्याय, हक्क व अधिकारांवर गदा आणू नये. दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक समाज, महिला व कामगार वर्गाला आपल्या न्याय, हक्क व अधिकारांसाठी संविधान संवैधानिक मार्गाने विरोध व आंदोलन करण्याचा अधिकार देते. या विधेयकामुळे या अधिकारांची गळचेपी व हानी होणार आहे, असे ही यावेळी म्हणाले.
राज्यातील जनतेच्या विरोधाला डावलून सरकारने हे विधेयक पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले, तर लोकशाही व संविधानावर निष्ठा असलेली जनता या संविधान व लोकशाही विरोधी सरकारला योग्य तो धडा शिकवेल, असा इशारा ही त्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिला.
या कायद्यामुळे पोलिसांना अधिकचे अधिकार दिले मिळणार आहेत. असे सांगून ते म्हणाले देशात व राज्यात लोकशाही व संविधानाचे राज्य हवे आहे, पोलिस राज्य नको.