महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-२५ (०१ जुलै २०२४)
जातीव्यवस्था: एक मूलभूत सामाजिक समस्या: जातीला पवित्र, दैवी, धार्मिक असल्याची मान्यता दिल्यामुळे जातीव्यवस्थेत कोणत्याच प्रकारचे परिवर्तन होऊ शकले नाही. काळानुसार सामाजिक नियमांमध्ये बदल होणे आवश्यक असते. परंतु, जातीव्यवस्थेत कोणत्याच प्रकारचे परिवर्तन न होता, ती अधिक मजबूत झाली. त्यामुळे आज जातीव्यवस्थेला एका मूलभूत सामाजिक समस्येचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
बाबासाहेबांच्या मते, जातीव्यवस्था ही सामाजिक समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्याला घातक आहे. जातीव्यवस्था मानवी मूल्यांच्या विरोधी आहे. म्हणून, जातीव्यवस्थेने अनेक समस्यांना जन्म दिला आहे. जाती पद्धतीची उभारणी ही मुळातच विषमतेच्या आधारावर झाली आहे. जी व्यवस्था विषमतेचा पुरस्कार करते त्या व्यवस्थेकडून सामाजिक समता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि न्याय मिळेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
जातीव्यवस्थेचे दुष्परिणाम: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेचे कोणकोणते दुष्परिणाम झाले आहेत याचे विश्लेषण केले आहे. जगामध्ये अनेक परिवर्तने झालीत. सामाजिक, धार्मिक, राजकीय क्रांत्या घडून आल्यात. परंतु, अशा प्रकारची कोणतीच क्रांति भारतात घडून आली नाही. इतकेच नव्हेतर, साधी आर्थिक सुधारणा देखील होऊ शकली नाही. या संदर्भात बाबासाहेब म्हणतात, तुमच्या आवडी प्रमाणे कोणत्याही दिशेला पळा, जातीचा राक्षस तुमचा रास्ता रोखून बसला आहे. या राक्षसाला ठार मारल्याशिवाय तुम्हाला राजकीय किंवा आर्थिक सुधारणा कधीही प्राप्त होऊ शकत नाही.
जाती ही एक अशी व्यवस्था आहे की, जी प्रत्येक प्रकारच्या सुधारणेमध्ये अडथळा निर्माण करीत असते. त्याचाच परिणाम म्हणजे समाज स्थितीशील बनला. काळानुसार परिवर्तन घडून येऊ शकले नाही. ज्या ठिकाणी सुधारणेचे सर्व मार्ग बंद आहेत, आशा अवस्थेत जात ही समस्यांचे माहेरघर बनते. त्यामुळे इतर कोणत्याही समस्येपेक्षा जातीची समस्या ही महत्वाची आहे. म्हणून या समस्येचे निर्मूलन आवश्यक आहे.
जातीची समस्या कशी नष्ट करता येईल या संदर्भात बाबासाहेबांनी चिंतन केले, विचार मांडलेत, इतकेच नव्हेतर त्यादृष्टीने आंदोलने देखील केलीत. भारतीय समाज एकसंघ नाही. एकसंघत्वाची जाणीवच भारतीय समाजात नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे जाती होय. जातिभेदामुळे एकसंघत्वाची भावना निर्माण होऊ शकली नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की, समाजशास्त्रज्ञ जीला दयेची जाणीव असे म्हणतात त्याचा हिंदूंमध्ये पूर्ण अभाव आहे. प्रत्येक हिंदूमध्ये जी जाणीव असते ती त्याच्या जातीची जाणीव असते. म्हणूनच हिंदू हा समाज किंवा राष्ट्र निर्माण करतो असे म्हणता येत नाही.
वरील चर्चेवरुन हल्ली राजकारण कोणत्या दिशेने चालले, यावर चिंतन-मनन करणे गरजेचे आहे.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)