- 116
- 1 minute read
जो संविधान की बात करेगा, वही देशपर राज करेगा….!
संविधान व लोकशाही विरोधी संघ,भाजपाचे चारित्र्य जनमानसात गेल्यानेच मोदींचा दारूण पराभव…!!
जयभीम, जय समाजवाद, जय संविधान अन् लाल सलाम…!
काल लोकसभा निवडणुकीचे निकाल आले अन् गेलीं दहा वर्ष सतत भेडसवणारी चिंता व भिती कशी क्षणात छू मंतर झाली. काळ नाहीतर एका कर्दनकाळाच्या हातात आपण २०१४ साली आपल्या या सुंदर, छानशा देशाची सूत्रे दिली होती. खूप विविधता असणारा आपला हा देश. या देशाच्या भुगोलावर जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाच्या धम्माच्या खुणा आहेत. त्या जमिनीवर आहेत. डोंगरदऱ्या अन् पहाड, पर्वतांमध्ये आहेत. इथल्या वैदिकांच्या देवळांवर आहेत. इतकेच काय भूगर्भात ही आहेत. खोदकाम केले, उत्खनन केले की बुध्दच भेटतो. म्हणून सारे जग या देशाला बुद्ध भूमी, बुद्धाचा देश म्हणून ओळखतो. या देशाच्या भूगोल व इतिहासावर महान चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या साम्राज्याच्या ही खुणा आहेत. एक नव्हे तर ८४ हजार बौद्ध स्तूप अशोकाने या आपल्या साम्राज्यात उभे केले होते. इतिहासाची पाने न पाने याची साक्ष देतात. तर हाच देश जो जगाला शांतीचा संदेश देतो, त्याच देशात अशांती निर्माण करण्याचे काम गेल्या दशकभरापासून या देशात सुरु होते. कालच्या निकालाने त्यास ब्रेक लागला गेला. हा ब्रेक लावण्याचे महान कार्य संविधान व लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या राष्ट्रप्रेमी जनतेने मोदीची सत्तेच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल रोखून केली. त्याबद्दल सर्व भारतीय जनतेचे प्रथम त्रिवार अभिनंदन….!
ज्यांना बुद्ध गवसला, कळला, समजला व जे बुध्दाला शरण गेले, ते ही महान झाले. सम्राट अशोक ही त्याने बुद्ध स्विकारला म्हणून महान झाला. ८४ हजार स्तूप बांधले. आपल्या देशाच्या तिरंगी ध्वजावरील २४ आर्य सत्य असलेले जे चक्र आहे, ते ही अशोक चक्र असून तेच देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. हे चक्र प्रगतीचे प्रतिक आहे. शक्ती, साहस, गर्व अन् आत्मविश्वासाचे ही प्रतिक आहे. तर बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे बुद्धाचा संदेश असलेले ब्रीद वाक्य आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे. देशातली सर्व सार्वजनिक उद्योग व व्यवसायाने ते स्विकारले आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेने ही सारी राष्ट्रीय प्रतिक व प्रतिमा म्हणून स्विकारले आहे. तर या लोकशाही, संविधान व राष्ट्रीय प्रतिकं अन् प्रतिमांना विरोध असणारे संघ, भाजपचे सरकार गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असून या संघ व भाजपने अगदी जाहीरपणे यास विरोध केलेला आहे. हा विरोध छुपा तर राहिला आहेच. पण उघडपणे ही केला असून अगदी राजधानी दिल्लीत संविधान जाळण्यापर्यंत या देश विरोधी शक्तींची मजल गेलेली आहे.
वैदिक ज्याला ब्राह्मणी धर्म म्हटले जाते त्याच धर्म व्यवस्थेला या देशात अधिक घट्ट, मजबूत करण्याचा प्रयत्न सतत केला जातो. सावरकर व संघाने त्यासाठी सतत प्रखर भूमिका घेतली आहे. विखारी व विषारी प्रचार केला. १९२० नंतर या देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलना सोबतच सडक्या, नीच, अमानवी परंपरांना विरोध करणारा वर्ग तयार होत होता. त्यास सामजिक सुधारणावादी आंदोलन म्हटले गेले. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई व फातिमा शेख यांनी ही पुण्यातून अगदीं वैदिकांच्याच नाकावर ठिचुन सामाजिक सुधारणांचे कार्य हाती घेतले व ते यशस्वीपणे पुढे नेले. शाहू महाराज हे ही या सुधारणांसाठी आग्रही होते. गांधी, नेहरु अन् आंबेडकर या देशाला नवे नेतृत्व देण्यासाठी उभे राहत होते. या सर्व परिस्थितीत वैदिक, ब्राह्मणी धर्माचा टिकाव लागणार नाही, हे लक्षात येताच या व्यवस्थेच्या ठेकेदारांनी काँगेस व स्वातंत्र्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले व त्यातूनच पुढे १९२५ साली डॉ. हेडगेवार, सावरकर बंधू अन् अन्य पंतोबांना सोबत घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ब्राह्मणी धर्मासाठी ब्राह्मणांची संघ शक्ती उभी केली. संघ किती ही सामाजिक संघटन असल्याचा आव आणीत असला तरी ते एक देशविरोधी, बहुजन विरोधी संघटन आहे. हे संघाच्या १०० वर्षांच्या कार्यकाळावर नजर टाकल्यावर दिसते.
ब्रिटिश सत्तेच्या गुलामीतून देश स्वतंत्र झाल्यावर या देशात लोकशाही राज्य व्यवस्था प्रस्थापित होईल, याची चाहूल लागताच संघ व सावरकर ब्रिटिश सरकारसोबत उभे राहिले. याचे मुख्य कारण होते व ते म्हणजे लोकशाही राज्य व्यवस्थेत बहुजन समाजाला मिळणारे सत्तेतील प्रतिनिधीत्व व त्याचा राजकीय सत्तेतील सरळसरळ होणारा हस्तक्षेप. संघ व सावरकरांना तो हस्तक्षेप नको होता. ब्रिटिशांची गुलामगिरी करु पण मनुस्मृतीने शूद्र व अतिशूद्र ठरविलेल्यांना राजकीय सत्तेच्या आडोशाला ही उभे राहू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका तत्कालीन संघ सरसंचालक गोलवलकर यांनी घेतली होती. यावरून संघ भाजपचा संविधान व लोकशाहीला असलेला टोकाचा विरोध दिसून येतो. त्याशिवाय संघाने तिरंगी ध्वजाचा ही सतत विरोध केलेला आहेच. या सर्व गोष्टी आज ही संघाला देशद्रोही, देश विरोधी ठरविण्यासाठी पुरेशा आहेत.
संघ हिंदूंचे संघटन नाहीतर ते ब्राह्मणांचे संघटन आहे. हिंदूचे संघटन असते तर ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती यांना मिळणाऱ्या आरक्षणाला संघाने विरोध केला नसता. हिंदू धर्मातील हा बहुसंख्य समाज असून त्यांच्या विकासाच्या आड संघ वेळोवेळी उभा राहिला नसता. हिंदू – मुस्लिम व अन्य अल्पसंख्य समाजाच्या विरोधात विखारी व विषारी प्रचार करून संघाने आपली हिंदू वोट बँक तयार केली व या वोट बँकेने संघ, भाजपला देशाच्या सत्तेवर ही बसविले. पण सत्ता मिळताच या धर्मांध शक्तींनी रंग दाखवायला सुरुवात केली. आपला लोकशाही व संविधान विरोधी अजेंडा राबवायला सुरुवात केली. हाच आपला असली चेहरा आहे, हे त्यांनी आपल्या वोट बँकेला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुस्लिम धर्मा अपप्रचार केला. अंधभक्त व आय टी सेलची एक फौज उभी केली. सोबत गोदी मिडियाला खरेदी केले. या सर्वांच्या माध्यमातून धर्माचे भूत मानगुटीवर असलेल्या बहुजन समाजाच्या मेंदूची नसबंदी केली. पण मोदी सरकारच्या लोकशाही व संविधान विरोधी धोरणांच्या झळा बसायला लागल्यानंतर हा बहुजन वर्ग जागा झाला. त्याला संघाचे देशविरोधी चरित्र व चारित्र्य दिसू लागले. अन् यातुनच पुढे संघ, भाजप की लोकशाही व संविधान यापैकी कुठली एक बाजू निवडायची वेळ आली, तेव्हा या बहुजनवादी जनतेने लोकशाही व संविधानाची बाजू निवडली. त्याच मुळे लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा मुख्य मुद्दा म्हणून पुढे आल्यावर जनतेने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला डावलून इंडिया आघाडीसाठी सत्तेचा मार्ग मोकळा करून दिले.
संविधान व लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न गेल्या ७५ वर्षांत सतत केला गेला. पण त्यास म्हणावे तितके यश मिळाले नाही. मात्र संघ, भाजप व मोदीने ज्या प्रकारे संविधान, सवैधानिक संस्था व लोकशाहीच्या चौकटी , परंपरा उद्ध्वस्त करण्याचा जो कुटील डाव मांडला. तो जनमानसांच्या लक्षात आला. संघ व भाजप मोदींच्या माध्यमातून करीत असलेले हे कट कारस्थान उधळून लावण्यासाठी हेच जनमानस सज्ज झाले. तसेच २०२४ च्या निवडणुकीत हेच जनमानस संविधान व लोकशाहीचे रक्षक म्हणून निवडणुकीचा मैदानात उतरले व त्याने संघाचा सर्व अजेंडाच धुळीस मिळविला. आता यापुढील संसदीय राजकारणातून धर्मांध शक्ती अन् त्यांचा अजेंडाच पूर्णपणे बाद झाला असून ” जो संविधान की बात करेंगा, वही देशपर राज करेंगा ” या प्रमाणे या देशाचे संसदीय राजकारण पुढे जाईल, हा नवा आशावाद या निवडणूक निकालांनी दिला आहे.
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)