- 48
- 1 minute read
ट्रम्पला अमेरिकेत डेमोक्रॅटिक शॉक…….
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 57
भारतीय वंशाचे ३४ वर्षीय झोहरान ममदानी न्यू यॉर्क चे महापौर.
अमेरिकेमध्ये विविध राज्यातील गव्हर्नर आणि महानगरातील महापौर पदांसाठी झालेल्या निवडणुकांचे ताजे निकाल लागले. त्यात अमेरिकी लोकांचा अपेक्षा पेक्षा जास्त प्रतिसाद डेमोक्रॅटिक पक्षाला लाभला आहे आणि ट्रुम्प राष्ट्रपती म्हणुन निवडून आल्यानंतर झालेल्या या निवडणुकांत त्यांच्या टेरिफ वार, मायग्रेशन विरोधी धोरण आणि विद्वेषाच्या विखाराला नापसंती दिसून आली. या निवडणुकीत अमेरिकी लोकांनी ट्र्म्प यांना धक्काच नाही तर अक्षरश: नाकही रगडले आहे. त्यातले तीन ठिकाणचे निवडक विजय जगाला स्पष्ट लोकाभिमुख संदेश देणारे ठरले आहेत. व्हर्जिनिया गव्हर्नर, न्यू जर्सी गव्हर्नर आणि न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाची निवडणूक.
त्यात सर्वात महत्त्वाचा धक्का देणारा निकाल म्हणजे अमेरिकेतील सर्वात मोठे आणि सर्वाधिक श्रीमंत असलेले शहर न्यूयॉर्क. म्हणून या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे केवळ अमेरिकेचेच नाही तर जगाचे लक्ष लागलेले. त्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि भारतीय वंशाचे 34 वर्षीय वयाचे जोहरान ममदानी हे या शहराचे महापौर म्हणून निवडून आले आहेत.त्यांनी ट्र्म्प यांच्या ॲंड्र्यू क्युमो यांचा त्यांनी पराभव केला. जोहरान ममदानी हे प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे चिरंजीव आहेत.
न्यूयॉर्क सारख्या अतिश्रीमंत शहरात ख्रिस्ती समुदायाबरोबरच ज्यू (यहुदी) लोकांचे देखील प्राबल्य आहे. त्यांचे आर्थिक वर्चस्व चांगले आहे. तसेच भारतीय वंशाचे लोक देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. अमेरिकेतील 52 लाख भारतीय दुस-या क्रमांकाचे अप्रवासी आहेत. त्यातले श्रीमंत या शहरात भरपूर आहेत. या निवडणुकीत भारतीय अमेरिकन समाजाने देखील डेमोक्रॅटिक पार्टीच्या बाजूने अमुलाग्र असा प्रतिसाद दिलेला आहे. या शहरात 1969 नंतर प्रथमच मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान केले. ममदानी यांना मिळालेली मते ही अमेरिकेतील पाच राज्यांच्या लोकसंख्ये इतके असल्याचे तिथल्या जनगणनेच्या आकडेवारीवरून सांगितले जात आहे. प्रथमच इसाई, मुस्लिम आणि यहुदी यांच्यसह भारतीय समुदायांनी या न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदी जोहरान ममदानी यांची निवड करत ट्रम्प यांच्या वांशिक आणि भेदभावाच्या राजकारणाला जोरदार धक्का दिला.
जोहरान यांना न्युयोर्ककरांनी मतदान करु नये असे आहावन ट्र्म्प यांनी केलेले. इतकेच नाही तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला मत म्हणजे न्युयॉर्क शहराचा सत्यानाश असे म्हणत प्रचार केला. जोहरान यांना माध्यमांत कव्हरेज मिळू दिले नाही. आणि जोहरान विजयी झाल्यावरही यहुदी लोकांनी केलेल्या मतदानावरुन ट्र्म्प यांनी यहुदी लोकांना “स्टुपिड पर्सन” असे म्हणत निर्भर्त्सना केली.
निवडणूक निकालानंतर जवळच्या यहुदी तरुणाने जोहरान यांना विचारले की आमच्या समुदायाने तुमचा प्रचार केला, तुम्हाला मत दिले. ट्रम्प यांनी आम्हा यहुदी लोकांना ‘स्टुपिड पर्सन’ म्हटले त्याकडे आपण कसे बघता ? त्यावर जोहरान यांनी दिलेले उत्तर मात्र लक्षात घेण्यासारखे आहे. जोहरान म्हणतात “मला मदत करणारे आणि न करणारे दोन्ही माझ्यासाठी या शहराचे नागरिक आहेत, आणि महापौर म्हणून त्यांच्या प्रती त्यांच्या आकांक्षाला खरे उतरणे हे महापौराचे कर्तव्य आहे” याच दृष्टीने मी याकडे बघतो.
डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रचार सर्वसमावेशकता, न्युयॉर्कला सर्वांना परवडण्यायोग्य शहर बनविणे, महिलांचे प्रजनन अधिकार, महागाई कमी करणे, समाजवादी लोकशाही मूल्यांना बळकटी देवून न्युयॉर्क शहर सर्वांना राहण्यायोग्य होईल यासाठी काम करणे या मुद्द्यांवर होता. तर ट्रुंम्प यांचा वांशिक भेद, व्हाईट सुपरमसी आणि विद्वेषावर भर होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर यहुद्यांच्या इस्त्रायलची भलामन करुनही न्युयॉर्क शहरात यहुद्यांनी ट्रंम्प यांच्या धोरणाकडे पाठ फ़िरवली. न्यूयॉर्क शहरवासीयांनी स्थानिक प्रश्नाला प्राधान्य देत धार्मिक आणि वांशिक बाजू दुय्यम मानली हे या निवडणुकीचे महत्त्वाचे समावेशी लोकतांत्रिक मूल्य आहे.
दुसरा झटका म्हणजे न्यू जर्सी राज्यातही रिपब्लिकनचा पराभव करत मिकी शेर्रिल गव्हर्नर पदी विजयी झाले.
तर तीसरा झटका म्हणजे व्हर्जिनिया राज्यात गव्हर्नर पदी देखील डेमोक्रॅटिक पक्षाच्याच महिला उमेदवार श्रीमती ॲबिगेल स्पॅन्बर्गर विजयी झालेल्या आहेत. या राज्याच्या गव्हर्नर पदावर आलेल्या स्पॅन्बर्गर या पहिल्या महिला आहेत. व्हर्जिनिया राज्यात या पक्षाला 40 वर्षानंतर 13 जागेवरील विजयाने प्रथमच मोठे यश मिळालेले आहे. व्हर्जिनिया पाठोपाठ न्यूजर्सी मध्ये देखील ट्रुम्प पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
याच राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून भारतीय वंशाच्या गझाला हाश्मी या विजयी झाल्या आहेत. भारतातील तेलंगणाची राजधानी हैदराबाद या शहरात हाश्मी यांचा जन्म झालेला. व्हर्जिनिया या राज्याच्या लेफ़्टिनंट गवर्नर (उप राज्यपाल) होणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई अमेरिकन आणि पहिल्या मुस्लिम महिला आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या जॉन रीड यांचा पराभव केला. अमेरिकन साहित्यात डॉक्टरेट केलेल्या हाश्मी राजकारणात येण्यापूर्वी अमेरिकी रिचमेंट युनिव्हर्सिटी आणि रेनॉल्ड कम्युनिटी कॉलेज मध्ये प्राध्यापकी करत होत्या.
यासोबतच आणखी एक महत्वाची निवडणूक म्हणजे अमेरिकेच्या दक्षिण पश्चिमेकडील ओहयो राज्याच्या सिनसिनाटी सारख्या समृद्ध शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे असलेले अफताब कर्मा सिंह पुरेवाल यांनी अमेरिकेचे विद्यमान उपराष्ट्रपती जेडी वान्स यांच्या भावाचा पराभव करत दुस-यांदा महापौर पदाची निवडणूक जिंकली.
पुरेवाले यांची आई तिबेटन भारतीय. त्या लहान वयात भारतात निर्वासित म्हणून आल्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसुर आणि पुढे दिल्लीत झाले. पुरेवाल यांचे वडील डॉ. श्याम पुरेवाल पंजाबी. व्यावसायिक कारणासाठी ते दांपत्य अमेरिकेत स्थायिक झाले. अफताब पुरेवाल यांचा जन्म अमेरिकेतील याच ओहिओ राज्यात झालेला. सिनसिनाटी हे वोहिओ मधले अत्यंत प्रसिद्ध आणि समृद्ध शहर मानले जाते.
योगायोगाने वरील तीनही उमेदवार भारतीय वंशाचे असून डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित आहेत. त्यातील महत्वाच्या दोन विजयी चेहरे मुस्लीम समुदायाचे असल्याने त्यांना ट्र्म्प अणि त्यांच्या समर्थकांच्या सांप्रदायिक विरोधाला सामोरे जावे लागलेले. एकूण काय तर हे निकाल, हे उमेदवार, त्यांच्या लोकाभिमुख भूमिका आणि त्याला अमेरिकी लोकांनी दिलेला प्रतिसाद लोकशाही मूल्यांसाठी आशादायक आहेत.
आर एस खनके
0Shares