ट्रम्प यांच्या विक्षिप्त व्यक्तिमत्वाच्या आणि आयात कर धोरणांच्या चर्चा अधिक होतात. ट्रम्प यांच्या विविध निर्णयांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करताना त्यांच्या विक्षिप्त व्यक्तिमत्त्वाच्या आणि आयातकरांच्या विषयापलीकडे जाण्याची गरज आहे.
याचे कारण ट्रम्प यांना या खेपेस मिळालेले निर्विवाद जनसमर्थन. त्याशिवाय, अमेरिकेतील दोन्ही सभागृहातील रिपब्लिकन पक्षाचे जनप्रतिनिधीदेखील, किमान सार्वजनिकरित्या, त्यांच्या निर्णयांवर काहीही टीका करताना दिसत नाहीत.
असे यश कोणताही राजकीय नेता एकहाती मिळवू शकत नाही. त्यासाठी प्रशासनातील अधिकारी, लष्करशहा, पैशाच्या थैल्या ओतू शकणारे आणि वैचारिक आयुधे तयार करणारे त्या नेत्याच्या मागे असावे लागतात.
________
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनण्यामध्ये, २०१६ मध्ये कमी पण २०२० मध्ये निर्णायकपणे, अमेरिकेतील “मेक अमेरिका ग्रेट अगेन” किंवा “मागा” जनआंदोलनाचे मोठे योगदान आहे. या आंदोलनाने जे “कथानक” (Narrative) विकसित केले, त्याने मोठ्या संख्येने मतदार नागरिकांच्या आणि काही प्रमाणात अमेरिकेतील वरील समाज-अर्थ घटकांच्या मनाची पकड घेतली आहे.
अमेरिकेतील आर्थिक विषमता टोकाची आहे. या विरुद्धचा असंतोष त्या देशात अनेक वर्षे धुमसत होता. त्याचा स्फोट झाला २००८ सालातील “सब प्राईम” नावाने ओळखल्या जाणाऱ्या वित्तीय अरिष्टाच्या निमित्ताने.
या अरिष्टावर मात करण्यासाठी अमेरिकन सरकारने जी अब्जावधी डॉलर्सची मदत केली होती. यामुळे सार्वजनिक पैशाचा विनियोग उच्च वर्गातील गुंतवणूकदारांच्याच फायद्यासाठी होत असल्याचे सामान्य नागरिकांचे आधीचे मत अघिकच दृढ झाले.
त्यानंतरच्या काही वर्षात “टी पार्टी” नावाने ओळखले जाणारे अतिरेकी राष्ट्रवादी , वंशवादी गट देशात अनेक ठिकाणी स्थापन झाले.
ट्रम्प यांची २०१६ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आधीच्या “टी पार्टी” आंदोलनाचे रूपांतर, अधिक व्यापक अजेंडा असणाऱ्या “मागा” आंदोलनात होऊ लागले.
_________
“मागा” आंदोलनातील “चला, पुन्हा एकदा अमेरिकेला तिचे गतवैभव प्राप्त करून देऊया” या घोषणेत अमेरिकेचे आधीचे गतवैभव कमी झाले आहे याची अदृष्य, दुखरी बोच आहे.
सहाजिकच हे गतवैभव कमी होण्यासाठी काय कारणे असतील याची मांडणी समांतर पद्धतीने केली जाऊ लागली. “मागा”च्या मांडणीमध्ये ठळकपणे पुढे येणाऱ्या या परस्परसंबंधित कारणांची दोन गटात विभागणी करता येईल; देशांतर्गत आणि देशाबाहेरील.
ट्रम्प यांची अनेक धोरणे जगाला कितीही विचित्र वाटली तरी “मागा” समर्थकांच्या मते ती मागाच्या मांडणीशी सुसंगत आहेत. राजकीय सत्तेमागे एकच मोठा दबावगट असणे धोक्याचे असते, ते असे.
संजीव चांदोरकर