महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-११ (१५ जुन २०२४)
हिंदू धर्माचे विचार म्हणजे संपूर्ण भारतीय विचारसरणी असे मानले जाते. मात्र, हे योग्य नाही. भारतातील सामाजिक विचारांचा आढावा घेतांना हिंदू तत्वज्ञानाव्यतिरिक्त बौद्ध तत्वज्ञानाचा सुद्धा विचार करावा लागेल. कारण, तथागत बुध्दांच्या क्रांतिकारी तत्वज्ञानामुळे भारतीय सामाजिक विचारांना वेगळी दिशा मिळाली. जाती, वर्ण, यज्ञयाग, संस्कृती, कर्मकांड आदि पारंपरिक विचारसरणीला बुद्धाने कडाडून विरोध करून, “बहुजन हिताय-बहुजन सुखाय”, ही नवीन विचारसरणी मांडली.
बौद्ध काळातच भारताचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास झालेला दिसतो. बौद्ध काळातच तक्षशीला, नालंदा ही जग प्रसिद्ध विशाल विद्यापीठे अस्तित्वात आलीत. विशेष म्हणजे, बुध्दांचे विचार जगात पोहचले आणि, त्या त्या देशात भारतीय संस्कृती पोहचली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक विचारांवर तथागत भगवान गौतम बुध्दांच्या विचारांचा अथवा तत्वज्ञानाचा प्रभाव होता. समता, स्वातंत्र, बंधुत्व आणि न्याय या मानवतावादी विचारांचा बाबासाहेबांवर अत्यंत प्रभाव होता. इतकेच नव्हे तर, बाबासाहेबांचे संपूर्ण विचारच मानवतावादी तत्वज्ञानावर आधारित आहेत. ३ ऑक्टोबर १९५४ रोजी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की, “माझे जीवणविषयक तत्वज्ञान हे तीन शब्दातच सामावले आहे, आणि, ते म्हणजे, स्वातंत्र, समता, बंधुत्व. फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे हे जीवणविषयक तत्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. तसे मी केले नाही, हे मी निक्षून सांगतो. माझ्या तत्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून, धर्मात आहे. माझे गुरु गौतम बुध्दांच्या शिकवणीतून हे तत्वज्ञान मी स्वीकृत केले आहे”.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (३५) या ग्रंथातून)