डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन चिरायू होवो..

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन चिरायू होवो..

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन चिरायू होवो..

आज तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा समस्त भारतीयांचा मकरसंक्रांत सण….ह्याच दिवशी सर्वांना तिळगुळ देऊन गोड गोड अभिवचन दिले जाते किंवा आश्वासन घेतलें जाते…पण एक दिवस गोड गोड बोलून चालणार का,,,,?… हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो.पण हे सुद्धा साहजिक आहे.कारण माणुस एक वेगवेगळा मुखवटा पांघरलेला मनुष्य प्राणी आहे.त्यामुळे हा प्रश्न तसं तर सर्वांनाच पडला पाहिजे…
 
भ. बुध्दांनी  जगाचे अवलोकन केले आणि त्यांच्या अनुभवास आले. लोक एकमेकांना वाईट बोलतात तिरस्कार करतात एकमेकांना दुषित नजरेतून पाहतात .म्हणूनच भ.बुध्दांनी  सुमारे अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी” सम्यक वाचा”हा अष्टांग मार्गातील एक मार्ग आपल्या अनुयायांना लोकांना सांगितला आणि इतरांशी कसे बोलावे,कसे वागावे  ,कसे चालावे ते सांगितले सम्यक वाचा म्हणजे दुसरे तिसरे काही नाही आपली वाणी म्हणजे वाचा शुद्ध असली पाहिजे त्या वाणी तुन विषारी बाणा  किंवा अस्त्रासारखे आपले शब्द गेले नाही पाहिजेत . आपल्या शब्दांमुळे समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला कसलीही ठेच पोहोचता कामा नये म्हणून भ.बुध्दांनी अष्टांग मार्गातील एक  मार्ग”सम्यक वाचा”सांगितला आणि विश्वातील समस्त मानवजातीला सर्वांशी एकमेकांना आदरपूर्वक बोला कुणाचा अपमान अवहेलना होईल असे बोलू नका आपल्या वाणीतील शब्द जपुन वापरा शब्द कुणालाही लागू नये …त्यामुळेच आपल्या वाणीने निरंतर गोड बोला. समोरच्याचे मन जिंकून घ्या…याचा अर्थ असा नव्हे की कुणी गोड बोलून गुळात विष घालून दुसऱ्या चा जीव घ्यावा .किंवा गोड गोड बोलून समाजात दुषित विचार पेरावेत किंवा दुषित विचार पसरावेत… याचा अर्थ बिलकुल नाही.हे भ.बुध्दांचे तत्वज्ञान नाही.शत्रु असला तरी शत्रुत्व न बाळगता प्रेमानेच जिंका असेच सांगितले आहे.भ.बुध्द म्हणतात तुमची वाणी शुद्ध असली पाहिजे आणि आचारण सुध्दा शुद्ध असले पाहिजे तरच मानवी जिवन सोईस्कर आणि सुलभ होते.मैत्री प्रेम करूणा आणि बंधुत्व वाढीस लागते..मानव जातींतील कपटभाव द्वेष भाव नष्ट होतो आणि मानव जातीमध्ये सौहार्द भाव निर्माण होवून बंधूभावाचे वातावरण निर्माण होते.म्हणून एक दिवस गोड बोलून किंवा तिळगुळ वाटुन गोड बोलण्याचे आश्वासन किंवा अभिवचन घेऊन काय होतं नसते… तर निरंतर कायम सौहार्दयाचे वातावरण ठेवले पाहिजे तरच आजच्या दिनाला काही महत्व आहे…असो…
 
आजच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन आहे.समाजातील दुषित कलुषित वातावरणामुळे सुमारे सोळा वर्षे नामांतराचा लढा अव्याहत चालू राहिला.१९७८ला सुरू झालेला लढा १४जानेवारी १९९४ला संपला.नामांतरासाठी समाजातील युवकांची सोळा वर्षे शिक्षण उद्योग व्यवसाय पासून दुर गेलो मातीमोल झाली.परंतु परम् पित्याचे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव विद्यापीठाला देऊनच हा लढा संपला….
 
मी स्वतः ही लढ्यात सक्रिय होतो.तो लढा मी जवळून पाहिला आहे अनुभवला आहे.त्या पॅंथर गार्डच्या भिमसैनिकांच्या गगनभेदी घोषणांचा आवाज आजही जसाच्या तसा माझ्या कानांवर घुमतोय…. त्याकाळी झिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.एका क्षणात महाराष्ट्रातील तमाम रस्ते बंद होते रेलगाडी बंद होत होती.इतके आक्रमक पणे भिमसैनिक नामांतराचा लढा अटीतटीने आणि सचोटीने चालवित होते….क्षणात महाराष्ट्रातील अनेक गावांत जमावबंदी संचारबंदी लागू होत होती.मराठवाडा कायम अशांत होता.मराठवाड्यात लाखोंचे जत्थे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणांनी औरंगाबाद कडे आगेकूच करीत होते.कुणालाच आपल्या भविष्याची वर्तमानाची चिंता होईल याची काही काळजी नव्हती..प्रत्येक भिमसैनिक तळहातावर आपलेच शिर घेऊन उभा होता.त्याला मरणाची भिती वाटत नव्हती….तो हसत  हसत पोलीसांचा लाठीमार झेलत पुढे जात होता.अश्रुधुरांच्या नळकांड्या फुटल्या तरी धुरातुन वाट काढत पुढे चालत होता तो छातीठोकपणे बिनधास्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या   आपल्या मुक्तीदात्याच्या  नावासाठी लढत होता.त्याला ऊन वारा पाऊस धारा ह्याची कसलीच तमा नव्हती तो बेभान रणभोर होवून लढत होता.संवैधानिक पध्दतीने तो आपले हक्क अधिकार मागत होता….तस तर नामांतर काळात मराठवाडा कायमच पेटलेला असायचा.मराठवाड्यातील दलित शोषित उपेक्षित घटकांची जातीय मानसिकतेच्या लोकांनी घरे पेटवून दिली होती खुलेआम झोपड्याची सर्वांसमक्ष होळी केली होती .हजारो आबालवृद्धांना बेदम मारहाण केली जात होती..अनेक महिलांवर लेकी बाळींवर देवा धर्माच्या नावाने घोषणा देऊन जात्यांध लोक बलात्कार करीत होते.अनेक जणांच्या खुलेआम कतली झाल्या.त्यामुळे सगळे  प्रकार आगीत तेल ओतल्या सारखे होते.ते चित्र आजही डोळ्यासमोर आले तरी भरभरून अंगावर  काटा फुटतो….मनामध्ये समाज व्यवस्थे विषयी चिड निर्माण होते . ह्या समाजव्यवस्थेची  अब्रुची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगावी असे वाटते….आणि ह्याच कारणामुळे दलित शोषित पिडीत समाजाच्या मनात एक असंतोष पसरला होता.पुरता दलित शोषित पिडीत पेटुन उठला होता.
 
बरं दलित चळवळीचा मराठवाडा विद्यापीठाला च नामांतर करण्याचा अट्टाहास तरी का होता.?हेही जाणून घेणे गरजेचे आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव  मराठवाडा विद्यापीठालाच का द्यावे असे तरी का होते..!हे आज तरी तुम्हाला माहीत असावे असेच मला वाटते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९५४दरम्यानच्या काळात  हैदराबादच्या निजामाची राजवट असलेल्या ओसाड माळरान प्रदेशात जिथं कसलंच ज्ञानाच पीक नव्हते तिथला समाज अडाणी अज्ञानी होता. मराठवाड्यातील सर्वच जाती धर्मातील लोकांना विशेषत: युवकांना चार पाचशे कि.मी.परिसराचा रस्ता तुडवत दुरवरच्या शहरात शिक्षणासाठी जावे लागत होते त्याकाळी मराठवाड्यातील युवकांचे शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प म्हणजे ०.०३ किंवा ०.०४इतकेच होते.त्या ओसाड माळरानावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाचा वृक्ष पेरला त्याला पाणी घातले त्याला बहरून आणले..म्हणजे  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली.मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली…अगदी पहिली पासून पदवीत्तर  शिक्षणाची ज्ञानगंगा मराठवाड्यात आणली एवढेच नाहीतर सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यासाठी होस्टेलची सोय करुन जेवणखाण्याची सोय केली…आणि त्यामुळे  एका ज्ञानाच्या ज्योतीने संपूर्ण मराठवाडा न्हाऊन निघाला.निजामाचे सगळे ओसाड माळरान शैक्षणिक किमयेने बहरून आले.अल्पावधीतच मराठवाड्याचा शैक्षणिक कायपालट झाला.बाबासाहेबांनी झाडाला गोड मधुर फळे आली…शिक्षणाची गंगोत्री सर्वदूर पसरली…त्यामुळे मराठवाड्यातील युवक  शिक्षणाची ज्योत घेऊन अंधारातून प्रकाशाकडे निघाला. मराठवाड्याची शैक्षणिक प्रगती झाली आणि ओसाड रानामाळात फिरणारा पोरगा ,शेती करणारा पोरगा,गुरा ढोरा मेंढरा मागचा पोरगा, देवळात घंटी बडवणारा पोरगा ,वेशीबाहेर चा पोरगा आता साहेब प्राध्यापक अधिकारी झाला.आणि  त्या बाबासाहेबांच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठीच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे म्हणूनच हा वडवानल लढा सुरू झाला होता.वडवानल म्हणजे स्वतंत्र विचारांचा लढा.. परंतु या लढ्याला प्रखर विरोध जात्यांध प्रतिगामी शक्तींनी  केला.ते पुरोगामी शक्ती ला फुरोगामी म्हणू लागले ते आजही म्हणतात हा भाग निराळा…
ज्या महामानवाने छोटछोट्या  संस्थानिकांना एकत्र आणून एक देश एका धाग्यात विणुन बांधले देशाला भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे अशी जगामध्येओळख निर्माण करून दिली ज्या मराठवाड्यासारख्या ओसाड माळरानाचे शैक्षणिक नंदनवन फुलविले त्या उपकारकर्त्या राष्ट्र निर्मात्याच्या म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध केला .हा कृतघ्नपणा च म्हणावा लागेल.त्या जात्यांध शक्तींनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणी पण विरोधच केला होता .त्यांच्या मृत्यूनंतर विरोधच केला …हे विशेष… जात्यांध शक्तीचे सुसंस्कार नामांतराच्या काळात पाहायला मिळाले….जसा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढ्याचा वणवा पेटला तसा मराठवाडा धुमसत राहिला.राजकीय पक्ष शक्ती आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी सज्ज होत्याच.त्यांच्याही मोठमोठ्या सभा होवू लागल्या मराठवाड्यातील लोकांच्या भावना भडकतील अशी प्रक्षोभक भाषणे मिडीयातुन येवू लागली ज्याच्या घरात त्यांना कशाला हवंय विद्यापीठ …अशी चिथावणी खोर वक्तव्य होवू लागली.एवढेच नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नांव विद्यापीठाला दिल्यास त्यांचा फोटो डिग्री सर्टिफिकेटवर येईल मग आम्ही काय त्यांचा म्हणजे एका महाराचा फोटो घरात लावायचा का? अशी सगळीकडे गरळ ओकली जावू लागली आणि वातावरण कलुषित होवू लागले.मात्र नियतीनं आज उलटा बदला घेतला आहे.ज्यांनी त्याकाळी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध केला त्यांच्या वारसांना मात्र प्रत्येक सभेत बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचे राजकारण पुढे जात नाही.त्यांची अवस्था आज पाहण्यासारखी आहे.असो…
नेत्यांच्या चिथवणीखोर वक्तव्यामुळे 
मराठवाड्यातील वातावरण तापतच राहिले …वणवा पेटायचा तो थांबता थांबेना….मराठवाड्यातील शांतता दिसेनाशी झाली.मराठावाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी  महाराष्ट्रातील भीमसैनिक आगेकूच करु लागले.नामांतरातील शहिद योध्दा मातंग समाजातील कार्यकर्ता पोचिराम कांबळे ची जयभिम म्हणतोय म्हणून त्याची हालहाल करून हत्या केली गेली….जयभिम म्हणतोय म्हणून  त्याची सुरुवातीला जिव्हा छाटली  गेली…हात पाय तोडण्यात आले आणि त्याला पेटत्या कडब्याच्या गंजीत   फेकून देण्यात आले तो जिवाच्या  आकांताने तडफड करुन मरुन गेला.तसेच जनार्दन मेवाडेची सुध्दा तीच गत झाली .. त्याला सुद्धा जात्यांध लोकांनी गावात ताणु ताणुन लाठ्या काठ्या तलवारी ने मारहाण केली  त्याला हाल हाल करून मारण्यात आले  त्यानंतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.या नामांतर लढ्यामध्ये अशाच प्रकारे सुमारे १२जणांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या.त्यामध्ये काही महिलांचाही समावेश होता.यामध्ये प्रतिभा तायडे,शरद पाटोळे, जनार्दन मेवाडे, सुहासिनी बनसोडे, दिलीप रामटेके, गौतम वाघमारे,चंदर कांबळे, अविनाश ठोंबरे, गोविंदराव भुरेवाड,नारायण गायकवाड रोशन बोरकर इत्यादी शहिदांचा समावेश होतो. नामांतर फुकटात झाले आहे असे नाही  मराठवाडा विद्यापीठ धर्तीवर आमचे रक्त सांडले आहे…तर इथल्या जात्यांध वादी व्यवस्थेने आमच्या बारा शहिदांचे रक्त घेतले प्राण घेतले … आमच्या शहिदांच्या प्राणांची आहुती घेतली..हजारों लोकांचे संसार उद्धवस्त झाले त्यांच्या घरांची राखरांगोळी झाली शेकडो कार्यकर्ते अबालवृद्ध कायमचे अपंग अपाहिज झाले.हजारो जणांना आपला जीव  मुठीत घेऊन आपली गावे घर जमीन सोडून परागंदा व्हावे लागले.मग कुठे सोळा वर्षा नंतर सरकारला जाग आली आणि सरकारने आजच्या दिवशी १४जानेवारी १९९४रोजी नामांतर ऐवजी नामविस्तार करुन समाजाची बोळवण केली.तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी आपल्या सत्तेची तमा न बाळगता नामांतर घडवून आणले आणि मराठवाड्यातील लोकांना तिळगुळ खायला घालून नामांतराचे एक पर्व संपविले….
नामांतर झाले पुढे काय..असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा दलित चळवळीने पुढे काय केले… खरं तरं नामांतर झाले ते जनतेच्या रेट्यामुळे झाले.जात्यांध शक्ती ला बरे वाटले असेल… परंतू त्यांनी  असाहघ विचार केला असेल की .. जावू द्या ‌..आता नांव दिले म्हणून काय झाले..तसेच नांव द्यायला काय हरकत आहे… पण विद्यापीठातील अभ्यासक्रम हा आपण  सांगू  तसाच राहिल ना..आपण ठेवू तसाच राहिल ना….त्यामध्ये कुठे बदल होईल …आपणच विद्यापीठाचे मुख्य गुरु ना…मग काय हरकत आहे नांव बदलले तर बदलू द्याय…आपण विद्यापीठाची पाटी बदलली आहे पण अभ्यासक्रम आपलाच विषमतावादी प्रतिगामी असेल ना…त्यामुळे त्यांनी पुढे ह्या विषयाला जास्त चघळले नाही….त्यांनी तसाच त्यांच्या विचारांचा अभ्यासक्रम पुढे चालू ठेवला… आजही तो तसाच आहे.असो..
 
खरं तर दलित चळवळीतील नेत्यांनी आधुनिक जगाचा अभ्यासक्रम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत विचारांचा स्वतंत्र अभ्यासक्रम विद्यापीठात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते….जो बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत होता.. त्याप्रमाणे “आम्ही भारतातील लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष भारतीय गणराज्य घडविण्यासाठी आणि समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ह्या चतुरस्त्रीचा अवलंब करण्यासाठीचा अभ्यासक्रम तयार झाला पाहिजे.त्यासाठीचा प्रयत्न पाहिजे होता आणि आताही तो प्रयत्न केला पाहिजे.जात्यांध शक्तींनी देशातील सगळ्याच  विद्यापीठात असा  वरीलप्रमाणे अभ्यासक्रम राबविला नाही.त्यामुळे त्याची फळे देशाची जनता आजही  भोगताना दिसते आहे.जातीवाद संपता संपत नाही कारण शैक्षणिक अभ्यासक्रम त्याचे कारण आहे.कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी  सत्य मांडणीच केली जात नाही…आणि केली जाते ती चुकीची…म्हणूनच जातीवाद देशात वाढत आहे…
 
सरकार आंबेडकरी विचारांचा अभ्यासक्रम ठेवल न ठेवेल…
मात्र आंबेडकरी बहुजन आणि पुऱोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी  आता मनावर घेतले आहे…जनतेनीच आता एक स्वतंत्र विद्यापीठ सुरु केले आहे त्याचे नांव “डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांती  लोक विद्यापीठ.”ह्या लोक विद्यापीठातुनच आज रोज नित्यनेमाने आंबेडकर चळवळीची लाखो पुस्तके विकली जातात.सार्वजनिक कार्यक्रम असले की, म्हणजे चैत्यभूमी ६डिसेंबर मुंबई, दिक्षा भुमी अशोका विजयादशमी नागपुर,१४आॅक्टोबर येवला नाशिक, २०मार्च महाड,१जानेवारी भिमा कोरेगाव,२५मार्च महाड , देहूरोड अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम स्थळी कोट्यवधी रुपयांची पुस्तके विकली जातात आणि यामधून कार्यकर्ते तयार होतात.यामधुन एकच संदेश जातो  तो म्हणजे “कोंबड झाकुन ठेवले म्हणून सुर्य उगवायचा राहत नाही तो उगवतच असतो.”त्यामुळे कुणी चळवळीला दाबण्याचा प्रयत्न केला तरी वाढतच जाते. तिला जितकी दाबाल तितकाच वेग जास्त वाढत जातो  आणि हे इतिहासाचा सिध्दांत  आहे.. म्हणून प्रत्येकाने तथागत बुद्धांच्या विचाराने गेले पाहिजे..सम्यक वाचा ठेवून वागले तर देशात राष्ट्रीय भावना वाढीस बंधूभाव प्रेम करुणा मैत्री सहह्यदयता म्हणजे करुणा वाढीस लागून देश बलदंड होईल.तरच त्या तिळगुळाला काही तरी महत्व असेल नाही तर सर्व मिथ्य आहे.
 
-अॅड.संजयकुमार चंदनशिवे 
0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *