- 26
- 1 minute read
तिळसंक्रांत: तिळगूळ, वाण आणि पतंग… माणुसकीचा सण
तिळसंक्रांत: तिळगूळ, वाण आणि पतंग… माणुसकीचा सण
भारतीय सणपरंपरेत काही सण हे केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित न राहता सामाजिक संवाद, नातेसंबंध आणि जीवनमूल्यांची आठवण करून देणारे असतात. मकरसंक्रांत हा असाच एक सण. ऋतूंच्या बदलाची, सूर्याच्या उत्तरायण प्रवासाची आणि माणसाच्या अंतर्मनात सकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशाची ही सुरुवात असते. महाराष्ट्रात हा सण प्रामुख्याने ‘तिळसंक्रांत’ म्हणून ओळखला जातो. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ या साध्या वाक्यातून जीवनाचं मोठं तत्त्वज्ञान सांगणारा हा सण आजही सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देतो. मकरसंक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, उत्तरायणाची सुरुवात होते. कृषीप्रधान भारतासाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा. थंडीचा कडाका ओसरू लागतो, दिवस मोठे होतात आणि शेतीला नव्या आशेची पालवी फुटते. शेतकऱ्याच्या आयुष्यातील कष्टाचा काळ मागे पडत, नव्या हंगामाची चाहूल लागते. त्यामुळेच हा सण केवळ पंचांगापुरता नसून, मातीशी जोडलेला आहे.
तिळसंक्रांतीचा आत्मा म्हणजे तिळगूळ. तीळ आणि गूळ दोन्हीही आरोग्यदायी, शरीराला उष्णता देणारे. थंडीच्या दिवसात शरीराला बळ देणारे. पण या खाद्यपदार्थामागे केवळ पोषणमूल्य नाही, तर सामाजिक संदेश आहे. तीळ काळे असले तरी गूळ त्यांना गोडवा देतो. माणसाच्या आयुष्यातील कटुता, मतभेद, गैरसमज हे तिळासारखे असतात; पण संवाद, प्रेम आणि आपुलकीचा गूळ त्यांना गोड बनवतो. “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” ही केवळ शुभेच्छा नाही, तर समाजातील ताणतणाव विसरून एकमेकांशी प्रेमाने वागण्याची विनंती आहे. आज सोशल मीडियाच्या काळात शब्द जखमा करतात, टीका वाढते; अशा वेळी तिळगुळाचा हा संदेश अधिकच समर्पक ठरतो. महाराष्ट्रात तिळसंक्रांतीला वाण देण्याची प्रथा विशेष महत्त्वाची आहे. गृहिणी एकत्र येतात, हळदी-कुंकू लावतात, वाण देतात. ही प्रथा केवळ धार्मिक नाही; ती स्त्री-सामाजिकतेची शक्ती दर्शवते. वाणामध्ये तीळ, गूळ, साखर, फुलं, भांडी, कापड यांचा समावेश असतो. काळानुसार स्वरूप बदलले; पण भाव कायम राहिला. घराघरांतील नाती घट्ट करणारा हा सण आहे. नव्या सूनबाईंना समाजात सामावून घेणारा, वृद्ध महिलांना मान देणारा आणि मैत्रीचा धागा घट्ट करणारा हा सोहळा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्रियांना एकत्र येण्यासाठी वेळ कमी मिळतो. अशा वेळी तिळसंक्रांत ही संवादाची, अनुभवांची देवाणघेवाण घडवणारी पर्वणी ठरते.
उत्तर भारतात मकरसंक्रांत म्हणजे पतंगोत्सव. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशात आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जातं. पतंग उडवणं म्हणजे केवळ खेळ नाही; ते स्वातंत्र्याचं, स्पर्धेचं आणि आनंदाचं प्रतीक आहे. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण छतावर, मैदानावर एकत्र येतात. “काय पो छे!”चा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर, संगीत, हास्य… समाज एक क्षण तरी एकत्र येतो. तुटलेल्या नात्यांना जोडणारा हा सण आहे. मात्र आज पतंगोत्सवाबाबत पर्यावरणीय जाणीवही तितकीच महत्त्वाची ठरते. चायनीज मांजा, पक्ष्यांचे जीव, अपघात यामुळे आनंदाला जबाबदारीची किनार लागते. पर्यावरणपूरक पतंगोत्सव ही काळाची गरज आहे. तिळसंक्रांत हा सण जाती-धर्माच्या भिंती ओलांडतो. तिळगूळ देताना कुणाचा धर्म विचारला जात नाही, वाण देताना कुणाची जात पाहिली जात नाही. हा सण समानतेचा आहे. संतपरंपरेतही संक्रांतीचं महत्त्व दिसून येतं. संतांनी गोड बोलण्यावर, अहंकार टाकून देण्यावर भर दिला. आज समाजात द्वेष, ध्रुवीकरण वाढत असताना तिळसंक्रांत आपल्याला मानवतेचा धडा देतो.
आज तिळगूळ व्हॉट्सॲपवरच्या शुभेच्छांपुरता मर्यादित होतोय, हळदी-कुंकू ऑनलाईन गिफ्ट्समध्ये बदलतंय, पतंग मोबाइल गेममध्ये अडकतोय. बदल अटळ आहे; पण भाव हरवता कामा नये. संक्रांत म्हणजे केवळ सण नाही, ती संवादाची संधी आहे. शेजाऱ्याशी बोलण्याची, नात्यांतली कटुता मिटवण्याची, जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी. तिळसंक्रांत आपल्याला शिकवते, शब्द गोड ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि नाती घट्ट ठेवा. तिळगुळाचा गोडवा, वाणाची आपुलकी आणि पतंगांचा उन्मुक्त आनंद हे सगळं मिळून तिळसंक्रांत केवळ सण न राहता माणुसकीचा उत्सव बनतो. आज समाज तणावग्रस्त आहे, संवाद तुटतोय, मतभेद वाढत आहेत. अशा काळात तिळसंक्रांत अधिक अर्थपूर्ण ठरते. कारण हा सण सांगतो की, भांडणं विसरा, अहंकार सोडा, गोड गोड बोला आणि कदाचित याच साध्या तत्त्वज्ञानात आपल्या समाजाचं मोठं उत्तर दडलेलं आहे. तिळगुळाचा गोडवा तुमच्या शब्दांतून, वाणाची उदारता तुमच्या कृतीतून आणि पतंगासारखी उंच भरारी तुमच्या स्वप्नांतून सदैव झळकत राहो. नव्या उत्तरायणात आयुष्य अधिक प्रकाशमान, नातेसंबंध अधिक मधुर आणि भविष्य अधिक आशादायी व्हावे, हीच मनापासून तिळसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रविण बागडे