• 171
  • 1 minute read

पेटलेल्या मराठीच्या मुद्द्यात होरपळ होऊ नये म्हणून उद्धव व राज ठाकरे एकत्र….!

पेटलेल्या मराठीच्या मुद्द्यात होरपळ होऊ नये म्हणून उद्धव व राज ठाकरे एकत्र….!

मराठी माणूस युद्धात जिंकतो व तहात हरतो!

                 उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले नाहीतर,हिंदीची सक्ती व मराठी भाषेचे प्रेम या दोन भावनात्मक गोष्टींनी त्यांना एकत्र येण्यास भाग पाडले आहे. मराठी भाषा हे प्रकरण तसे महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेशी जोडले आहे. अन ती अस्मिता मराठी व महाराष्ट्रद्रोही फडणवीस सरकारने हिंदीची सक्ती करताच जागी झाली व मोदी भक्तीत लीन झालेल्या राज्यातील पेशवाई सरकारला बॅकफुटवर घेऊन गेली. हिंदीला विरोध नाही, पण सक्ती होताच मराठी माणूस पेटून उठला. या पेटलेल्या वणव्यात अनेकांना आपली होरपळ दिसली. त्यामुळे सर्वच पक्ष व नेते सावध झाले. या सावधगिरीनीच दोन्ही ठाकरेंचे एकत्रिकरण ही झाले आहे. हे समजून घेणे फार गरजेचे आहे. मराठी भाषा व महाराष्ट्राच्या हितासाठी हे एकत्रिकरण झाले आहे, असा समज मराठी माणसांचा असेल तर तो समज नाही, गैरसमज असून जितक्या लवकर त्यास दूर करता येईल तितक्या लवकर तो केला पाहिजे. नाहीतर युद्धात जिंकलो व तहात हरलो, अशी गत झाल्याशिवाय राहणार नाही.
        मराठी माणूस युद्धात जिंकतो व तहात हरतो, असे सर्रास बोलले जाते, ते खरे आहे. यास फक्त एक अपवाद आहे, तो म्हणजे मराठी माणूस ब्राह्मण्यवादी असेल तर तो युद्ध जिंकले तरी व युद्ध हरले तरी तहात जिंकतोच. १८८५ मध्ये पेशवे भीमा कोरेगावची लढाई हारले, पण त्यावेळी ब्रिटिशांसोबत झालेल्या तहात पेशव्यांनी आपल्या पदरात अनेक सवलती पाडून घेतल्या. तनखे घेतले. मात्र जो मराठी माणूस ( महार) जिंकले त्यांच्या पदरात विजयश्री शिवाय काहीच पडले नाही. सावरकरांचे पेंशन प्रकरण ही असेच एक उदाहरण. ही ऐतिहासिक प्रकरणे पुन्हा काढण्याचे कारण इतकेच की, दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी पेशवे फडणवीस जिंकतील. मग ते युद्ध असेल अथवा तह. हे कसे तर हे एकीकरण इंडिया आघाडी व राज्यातील तिची शाखा असलेल्या महाविकास आघाडीला ब्रेक लावणार आहे. या एकत्रीकरणाची किंमत मोजावी लागणार आहे.
       संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचारांच्या काँग्रेस, समाजवादी पार्टी व डाव्या पक्षांशी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोल्ड होत जमवून घेतले आहे. खळ खट्याक संस्कृतीवाल्या राज ठाकरेंना ते सोबत घेऊन इंडिया आघाडीत कसे कायम राहतील ? बर ते ही शक्य झाले,  तर राज ठाकरे काँग्रेस, समाजवादी पार्टी व राष्ट्रीय जनता दलला कसे चालतील ? मराठी बोलण्याची सक्ती करीत राज ठाकरेच्या आदेशाने मनसे सैनिकांनी जो आतंक माजविला आहे, त्याबद्दल उत्तर भारतातील जनता राज ठाकरेंना कधीच माफ करणार नाही. शिवसेनेत संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यासारखे मवाळ नेते असल्याने काँग्रेस, समाजवादी व डाव्या पक्षांनी त्यांना समजवून घेतले. तसे राज ठाकरे यांच्याबद्दल समजून घेणे शक्य होणार नाही. बिहार विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना राजद व काँग्रेसला ते शक्य होणार नाही. 
          अन समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर त्याची किंमत ही मोजावी लागेल. ती मोजण्याची तयारी नक्कीच राजद, काँग्रेस अथवा उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीची नसेल. अशा वेळी राज ठाकरे सोबतचे हे एकत्रिकरण कायम ठेवायचे असेल तर, महाविकास व इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय असणार नाही. पण राज ठाकरे की, महाविकास, इंडिया आघाडी यामधील एकाची निवड करताना उद्धव ठाकरे नक्कीच इंडिया आघाडीची निवड करतील. मग या एकत्रीकरणाचा फायदा काय ? केवळ चिनपाट लोकांना हवी असल्याने राजकीय आघाड्या करण्याचा निर्णय मराठी नेत्यांनी घ्यावा का ? हा प्रश्न आहे.
      उद्धव ठाकरे यांनी गेल्या ५ वर्षात राजकीयदृष्ट्या बरेच काही गमावले असले तरी बरेच काही कमावले ही आहे. इंडिया आघाडी व राष्ट्रीय राजकारणात त्यांचे एक स्थान आहे. शिवसेनेचा चेहरा ही बदलण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची सेना बनविली आहे. हे फार मोठे परिवर्तन असून ते त्यांनी अतिशय हिंमतीने व परिणामाची पर्वा न करता करून दाखविले आहे. राज ठाकरेमुळे हे सर्व टिकवून ठेवणे शक्य होणार नाही.
      
 शिवसेना स्थापनेपासूनच असंवैधानिक व लोकशाही विरोधी….!
 
  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती, डाव्या व समाजवादी पक्षांची वाढती राजकीय, सामाजिक व कामगार वर्गातील ताकद यास आळा घालण्यासाठी मराठी माणसाच्या हितासाठी या गोंडस नावाखाली १९६६ मध्ये झालेली आहे. थोडक्यात अगदी स्थापनेपासून सेनेच्या नेतृत्वाने फक्त मराठी माणसांचा वापर केला आहे. कामगार संघटना स्थापन करून मराठी माणसांच्या न्याय, हक्कासाठी लढणाऱ्या कामगार संघटना तोडण्याचे काम सेनेने केले आहे. स्थापनेनंतर केवळ एका दशकात सेनेने राज्याच्या सत्ताकारणात भागीदारी मिळविली आहे. १९८९ मध्ये भाजपसोबत युती करून राज्य विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपद मिळविले, तर पुढच्या ५ वर्षात मुख्यमंत्रीपद मिळविले. हे करताना संघ व भाजपचे हिंदुत्व ही भाजपला स्विकारावे लागले असून त्याच भाजपच्या शत प्रतिक्षत अजेंड्यामुळे सेनेची आज ही दुर्दशा झालेली आहे.  पण या या ३० वर्षांच्या युतीच्या काळात सेनेने हिंदुत्वाबाबत अतिशय कट्टर भूमिका घेतलेली आहे. ही घेताना संविधान व लोकशाही विरोधी ही भुमिका घेतली आहे. दलित, अल्पसंख्यांक व मुस्लिमांच्या विरोधात अगदी जाहीरपणे सेनेने अनेक वेळा भुमिका घेतल्या आहेत. त्यातल्या मुंबईची दंगल,  रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड आणि बाबरी मशिदी शहीद या ठळक गोष्टी आहेत.
         अतिशय मोल्ड भुमिका घेत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण राज ठाकरेसोबत आल्यानंतर त्या बदललेल्या चेहऱ्याचे काय होणार ? तसेच ज्या नेतृत्वाच्या कारणामुळे राज ठाकरे बाहेर पडले आहेत ? त्या नेतृत्वाचा प्रश्न कसा सुटणार ? हे प्रश्न तर उपस्थित होणारच. पण मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी ते तितके महत्त्वाचे ही नाहीत. ते एवढ्यासाठी महत्त्वाचे नाहीत, की हे दोन ठाकरे एकत्र नसताना ही मराठी माणूस जिवंत आहे व तो आपल्या अस्मितेसाठी लढतो आहे. ठाकरे नसतील तर संपेल, अशा भ्रमात कुणी असतील, तर भ्रम त्यांनी दूर करावा. मराठी माणसांनी पंडित नेहरू, सरदार पटेल, यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील, मोरारजी देसाई यांच्या विरोधात लढून संयुक्त महाराष्ट्राची लढाई जिंकलेली आहे. अन् ती लढाई लढलेले समाजवादी व डावे पक्ष आज ही महाराष्ट्रासाठी लढत आहेत. महाराष्ट्राला केवळ ठाकरेंची गरज आहे, या राजकारणाने तर मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. 
    
      ठाकरे सत्ताबाह्य केंद्र व सत्तेवर असतानाच मराठी भाषा व माणसांची पिछेहाट का झाली ? जाब कोण व कुणाला विचारणार ?
 
      दोन दशकाच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी सत्ताबाह्य केंद्र स्थापन करून मुंबई व महाराष्ट्रावर राज्य केले. या काळात चित्रपट सृष्टी, उद्योग जगत आणि बांधकाम व्यवसाय यावर नियंत्रण ठेवले. पण सत्ताबाह्य केंद्र असून व राज्याच्या सत्तेच्या चाव्या ही हात असताना मुंबई व परिसरातून मराठी भाषिकांच्या कमी होणाऱ्या टक्क्यांवर त्यांना नियंत्रण ठेवता आले नाही. महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या हाती असताना ही मराठी भाषिक शाळा जतन करता आल्या नाहीत. मराठी माणसांना उद्योग व रोजगार देता आलेला नाही. या अपयशाचे धनी कोणता ठाकरे होणार ? याचे उत्तर कुणी देणार नाही व त्यांना कुणी विचारणार ही नाही ? कारण हे कल्चर आपल्या मराठी माणसांकडे नाही. आपण फक्त संस्कृतीच्या गप्पा मारतो.
      मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मराठी माणूस जागरूक आहे हे दिसले. तो पेटून उठला, हे ही दिसले. पण तो लगेच विझतो. हे आपण अनेकवेळा पाहिले आहे. अशी पेटणारे अनेक नेते आज भाजपात आहेत. अथवा भाजपसोबत असून मोदी व अमित शहा या महाराष्ट्राच्या विरोधकांना ते स्वतः बाप बनवित आहेत. हे ही आपण पाहत आहोत. ही परिस्थिती निश्चितपणे भूषण करण्यासारखी नाही.
          बाकी दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे काय होईल, हे या पुढील काळात ते कसे एकत्र राहतील ? त्यांच्या एकत्र राहण्याचा अजेंडा काय असेल ? मोदी, शहाच्या सीबीआय,ईडी प्रेम प्रेम नोटीशीच्या माध्यमातून आल्यानंतर राज ठाकरे काय करतील ? महाराष्ट्र द्रोही भाजपला बिनशर्ट पाठिंबा देतील की विदाऊट पँट पाठिंबा देतील, हे कळेलच. पण turt तरी या एकत्र येण्याचा फायदा भाजपला बिहार विधानसभा निवडणुकीत होणार आहे. अन त्याचे कारण राज ठाकरे यांचे परप्रांतीयांच्या विरोधातील राजकारण आहे. थोडक्यात हे एकत्रिकरण बिहार निवडणुकीपुरते तरी भाजपच्या अजेंड्याचाच एक भाग आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण बिहार विधानसभा निवडणुकीतील मराठीचा मुद्द्यावरून  बिहारींना मनसेकडून होणारी मारझोड हा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे. बाकी एकत्रिकरणाच्या फायद्याच्या प्रतिक्षेत आपण राहू…..!
 
………………………
 
राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी,
 पार्टी महाराष्ट्र प्रदेश
 
 
 
 
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *