- 46
- 1 minute read
फक्त जिवंत राहण्यासाठी लढा!
मुख्यप्रवाहात कुठेही नसलेला हा समाज या समाजाच्या कष्टाबद्दल प्रश्नचिन्ह उभे रहावेत असा गोंधळ आजूबाजूला तयार केला जातोय.
वर्तमानकाळात भूमिहीन भटक्या जातींच्या श्रमाला श्रमाच्या मोजपट्टीत दुय्यम स्थान मिळावं किंवा स्थानही मिळू नये अशी परिस्थितीय.
गावोगावी भटकणारी ही माणसं पाल टाकून राहणारी माणसं फक्त जिवंत रहावं म्हणून राबतायत. ज्यांच्यासाठी जिवंत राहणं हिच प्रथम लढाई होऊन बसली आहे तिथं विकास करणं तर खूप लांबची गोष्ट आहे.
आपण इकडे आरक्षण आपल्या विकासासाठी मागतोय अस्तित्वासाठी नव्हे. या मागणीआडून स्वतःचे श्रम ग्लोरीफाय करणं चालय. यातून भूमिहीन भटक्या समूहाचे श्रम दुय्यम वाटावेत असे नॅरेटिव्ह सेट होतायत.
जिसकी जितनी संख्या भारी उतनी उनकी नॅरेटिव्ह सेट करने की जिम्मेदारी. असं काहीतरी आहे का तपासावं लागेल.
आपल्या बायांनी पहिल्यांदा गावची वेस ओलांडली ती वारीच्या निमित्ताने ओलांडली असावी. पण या भटक्या बाया कित्येक वर्ष फक्त आपल्या अस्तित्वासाठी भटकतायत. वारीला जाणाऱ्या बाया पुन्हा आपल्या गावच्या घरी आल्या तरी पण या भटक्या बाया भटकत राहिल्या देशोधडी.
गिसाड्याची बाई वीस किलोचा घण रपारप आपटून लोखंडाला आकार देते त्याला आपण श्रम म्हणणार आहोत का.? त्याला श्रमाच्या मोजपट्टीत कितवं स्थान देणार आहोत.?
पारधी गिसाडी वडार माकडवाले अस्वलवाले पोपटवाले नंदीवाले, पांगुळ वासुदेव गोसावी पोतराज लमान यांचे जगण्यासाठीचे श्रम आहेत विकासासाठीचे नाहीत. त्यांचे श्रम ही कला आहे. आपल्या श्रमाचं कलेचं भांडवल मात्र यांना करता आलं नाही. त्यांची कला चोरली गेली. पांढरपेशी समाज दलित आदिवासी भटक्या समाजाच्या कला चोरून मुख्य धारेत आलेला समाज आहे. या समाजाने अशा कथा रंगवल्या जणू तुमचं हे काम काहीतरी निकृष्ट दर्जाचं आहे.
आणि आपल्याच कष्टाची आपल्याच कलेची आपल्याला लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण केली गेली.
गोंदन काढणाऱ्या बाईचे श्रम आपण मोजले नाहीत. तिच्या श्रमाला कला म्हणून आपल्याकडे बघितलं गेलं नाही. पण शॉपमध्ये टॅटू काढणाऱ्यांना आपण कलाकार म्हणतो हा विरोधाभास. त्या शॉपमध्ये गिसाड्याची बाई नसते हे दुःखदय. गोंदनाऱ्या बाईची कला आपण शॉपमध्ये कैद केली आणि तिला अपमानित केलं.
आपल्याकडे सालगड्याला ऊसतोड कामगारांना शेतकरी म्हंटल जात नाही. मालकाला दहाफूटसुद्धा जवळ येऊ न देणाऱ्या बैलाला सालगडी वेसण धरून गाडीला जुंपतो पण त्याला आपण शेतकरी म्हणत नाही.
ऊसतोड एका झटक्यात ऊस मोकळा करून त्याची मोळी बांधतो. त्याची बायको ट्रॉलीला लावलेल्या शिडीवर कमरेत प्राण आणून चढते पण त्यांना आपण शेतकरी म्हणत नाही.
उलट मागे हात बांधून बांधावरून शेत पाहणाऱ्याला शेतकरी म्हणतो.
या सालगड्यांचे ऊसतोड कामगारांचे श्रम कसे मोजावेत.? सालगडी म्हणताना किंवा ऊसतोड म्हणताना त्या एकट्या पूरुषाला मोजलं जात नाही त्यामध्ये बाईलाही मोजलं जातं. दोघांना मिळून ती उचल दिली जाते.
नॉस्टॅल्जियाचा अनुभव यावा म्हणून आपल्याला वाटतं पुन्हा पिंगळा यावा बहुरूपी यावा वासुदेव, पोतराज यावा तशा रिल्सही वायरल व्हायरल होत असतात पण त्यांच्या श्रमाचा मोबदला म्हणून आपण त्यांना काय देणार आहोत.? का पुन्हा त्यांच्या पदरी अपमानच पडणार आहे
भटक्या समाजाने ब्राम्हणी सगळं नाकारलं. ब्राम्हणी कलाशास्त्र सौंदर्यशास्त्र सगळं नाकारून यांनी स्वतःच्या कला निर्माण केल्या. यांनी स्वतःची श्रद्धास्थानं निवडलेली आहेत ती अब्राम्हणी आहेत. पण आपन आपलं नाकारून अभिजन होण्याकडे वाटचाल केलेले लोक भटक्यांना सतत अपमानित करत आलो आणि ब्राम्हणी कला स्वीकारत आलो. आपल्या तुलनेने भटका समाज बराच पुढारलेला आहे. या पुढरलेपणाला वर्तमानात मागासलेपण म्हणून हिनवलं जातं.
या समाजाला आजही चोर म्हणून कित्येक वर्ष आतमध्ये टाकलं जातं. मारहाण केली जाते. चोरीचे खोटे आरोप केले जातात. मराठा जातीतल्या मुलीबरोर लग्न केलं म्हणून खून केला जातो. भटक्यांचे आजवर किती लैंगिक छळ केले असतील.? या सर्व प्रश्नावर चिंता व्यक्त केली जात नाही. चिंता यावर व्यक्त केली जाते ती श्रम कोणाचे जास्त आहेत शेतकऱ्यांचे की भूमीहीन भटक्यांचे
मुख्यप्रवाहात कुठेही नसलेला हा समाज या समाजाच्या कष्टाबद्दल प्रश्नचिन्ह उभे रहावेत असा गोंधळ आजूबाजूला तयार केला जातोय.
स्वतःच्या शेतावर राबणं आणि दुसऱ्याच्या शेतावर राबणं यामध्ये तुलना करता आली पाहिजे.
भटक्या समुदायाच्या मागण्या त्यांचे प्रश्न यावर आपले नेते बोलत नाहीत. टीव्हीवर याबद्दल एकही बातमी चालवली जात नाही. भटक्यांचे प्रश्न डिस्प्ले होतील असा प्लॅटफॉर्मचं नाही. खरंतर या समुदायाबद्दल आपल्यामध्ये सर्वात जास्त चर्चा व्हायला हवी पण तसं होत नाही. उलट आर्थिक मागासलेपण वाट्याला येईल का काय याची भीती असणाऱ्याबद्दल सगळीकडे चर्चा होत आहे यातून भटका समाजाचे प्रश्न पूर्णपणे नजरेआड झालेले आहेत किंवा ते नजरेस पडू दिले जात नाहीत.
महात्मा फुल्यांनी स्वतःवर धावून आलेल्या भटक्या समाजातल्या लोकांचा अपमान न करता त्यांना नेतृत्व म्हणून पूढे आणलं. फुल्यांचा हा आदर्शवाद आपण किती घेतला.? गावच्या पुढाऱ्यांच्या हातून माईक सुटत नाही. स्टेजवरून खाली उतरायला मागत नाहीत ही मंडळी आणि हे काय नेतृत्व देणार.? उलट तमाशाला एखादं वडराचं पोरगं नाचलं म्हणून मारायला पुढं असतात
जो भूमिहीन भटका समाज स्वतःच्या श्रमाचासुद्धा लाभार्थी होऊ शकत नाही त्यांच्या या श्रमाचं मूल्यमापन कसं करणार आहोत आपण हा प्रश्नय. चालू घडीला आपण इतके असुरक्षित भुकेले आहोत की आपण आपलं ताट संभाळून दुसऱ्याचं ताटही ओरबाडायला कमी करत नाही त्यामध्ये या भटक्या समाजाच्या भुकेचा विचार करणं तर खूप लांबय.
निलेश भाऊसो साठे