• 68
  • 1 minute read

फुले वंशजांची करूण कहाणी

फुले वंशजांची करूण कहाणी

राजाराम सूर्यवंशी लिखित यशवंत फुले चरित्र पुस्तकाचे सार

चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित ” ” “डॉक्टर यशव़तराव जोतीराव फुले ” यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.

या पुस्तकाची अर्पण पत्रिका

” अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणाऱ्या ( यशवंताच्या दृष्टीने )अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण…” किती बोलकी आहे पहा.

निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या पंचवीस वर्षाच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो.

जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठाव ठिकाणा शोधायचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. फुले दांपत्याच्या जीवनात यशवंत याचा प्रवेश कसा झाला, त्यांचे संगोपन,संस्कार, शिक्षण आदी कार्य या जोडगोळीने कसे पार पाडले याचे सह्रदयी वर्णन लेखकांनी लिलया पद्धतीने केले आहे. महात्मा फुले व सावित्रीबाईंच्या यशवंतास दत्तक घेतल्यामुळे ज्योतीरावांच्या भावंडांप्रमाणे सावित्रीबाईंच्या भावंडांनी देखील फुले दाम्पंत्याशी संबंध तोडल्यामुळे ओतूरचे भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील हेच त्यांना आपले मामा वाटू लागले. अखेरपर्यंत उभयतांचा स्नेह कमी झाला नाही.

ज्ञानोबा ससाने यांचा स्वतःचा विवाह सत्यशोधक पद्धतीने झाला होता. आपली मुलगी राधा ही त्यांनी यशवंतास कबूल केली व फुले दांपत्यांनी आपल्या शेकडो सत्यशोधकांच्या उपस्थितीत हा विवाह लावला.जात पंचायतीचे चटके भोगलेल्या ससाणेंनी पुन्हा एकदा धैर्य दाखवून फुले घराण्याला आपली कन्या देऊन वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न केला.राधा उर्फ लक्ष्मीबाई ही या उभयतांची सून झाली. 1890 साली पितृशोक, 1897 साली मातृशोकाचे आघात तसेच आपली प्रिय पत्नी राधा उर्फ लक्ष्मी हिने ही 6 मार्च 1895 रोजी जगाचा निरोप घेतला.

लक्ष्मी उर्फ राधे राधाबाईंच्या मृत्यूने मोठी पोकळी यशवंतराव व सावित्रीबाई समोर निर्माण झाली.त्यात पुन्हा 1897 मध्ये आपल्या प्रिय आई सावित्रीबाईंच्या निधनाने तर डोंगरच त्यांच्यावर कोसळला परंतु परिस्थितीशी डॉक्टर यशवंताने दोन हात करत कशी मात केली हे वाचता वाचता वाचकांच्या डोळ्याला धारा लागतात हे कळत नाही.

1897 मध्ये प्लेगच्या साथीत सावित्रीबाईं बरोबर डॉक्टर यशवंताने कसे काम केले.नगरहून मिलिटरीतील नोकरीतून सुट्टी घेऊन आपल्या आईच्या प्लेगनिवारणार्थ कार्यात कसे झोपून दिले, हा दैदिप्यमान इतिहास आज महाराष्ट्र विसरला आहे.कोविड-19 चा कालखंड अनुभवल्यामुळे संसर्गजन्य किती भयाण असू शकतो याचे भान आम्हास आहे.अशाही कालखंडात मुंबई पुणे येथे सत्यशोधकांनी केलेले कार्य ; प्रसंगी सावित्रीबाई व रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे समर्पित जीवन व बलिदान आम्ही विसरलो आहोत याची जाणीव हे चरित्र वाचतांना पानो पानी जाणवते. मिलिटरीतल्या पहिल्या वर्षाचा संपूर्ण पगार प्लेग निवारणार्थ देणार्‍या डॉक्टर यशवंतरावास आम्ही काय दिले? याची उत्तरे समग्र महाराष्ट्राने द्यायची आहेत.त्याच बरोबर सावित्रीबाई फुले, डॉक्टर यशवंतरा फुले व नारायण मेघाजी लोखंडे यांची समग्र जीवन दर्शन करुन देणारी स्मारके आम्ही का बांधू शकलो नाहीत? या प्रश्नांच्या उत्तरातच आजची अधोगती महाराष्ट्राची का झाली याची उत्तरे आहेत. संवेदनशील मनाला चटका लावणारा इतिहास मान. राजाराम सूर्यवंशी यांनी लिलया उभा केला आहे.

सत्यशोधक चळवळीकडे दुर्लक्ष करुन त्याचे ब्राह्मणेतर चळवळीत रुपांतर झाले. म. फुलेंचा खरा वारसा विसरल्यामुळे पुढे डॉक्टर यशवंतराव फुले यांची दुसरी पत्नी चंद्रभागाबाई यांच्यावर समाजाने व काळाने कसा सुड उगवला, डॉक्टर यशवंताच्या मृत्युनंतर संसार विकून संसाराचा गाढा चालविण्याची वेळ चंद्रभागाबाईंवर का आली, ब्राह्मण्यग्रस्त माळी समाज व तत्कालीन समाज व्यवस्था याचा दुष्फरिणाम फुले वंशजांवर कसा झाला, त्याचे चटके आजही त्यांचे वंशज कसे भोगताहेत याची करुणकहाणी म्हणजे मान् राजाराम सूर्यवंशी लिखित प्रस्तुत चरित्र होय. मुळातून हे चरित्र सर्वांनी वाचले पाहीजे.

प्रा. सुदाम चिंचणे. 8788164760. संभाजीनगर महाराष्ट्र

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *