- 51
- 1 minute read
बहिष्कृत हितकारणी सभेच्या १०० वा वर्धापन दिन त्यानिमित्त…
महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-४३ (२० जुलै २०२४)
(बहिष्कृत हितकारणी सभेच्या १०० वा वर्धापन दिन त्यानिमित्त – बहिष्कृत वर्गाच्या उन्नतीस उपसर्ग करणाऱ्या कारणांचा नायनाट झालाच पाहिजे. तर, दुसरीकडून ज्या कारणांनी त्यांचा उत्कर्ष होईल, अशा कारणांचीही अभिवृद्धि करणेही जरूरी आहे.)
व्यापार, नौकरी व शेती हे जे धन संचयाचे तीन मार्ग आहेत, ते बहिष्कृत लोकांना म्हणण्यानुसार मुळीच खुले नाहीत. विटाळामुळे गिऱ्हाईक कमी आणि गिऱ्हाईकांच्या कमतरतेमुळे त्यांना व्यापराची सोय उरली नाही. शिवा-शिवीमुळे खालच्या दर्जाच्या नौकाऱ्या मिळत नाहीत. तर, इतर लोकं त्यांच्या हाताखाली काम करण्यास कमीपणा समजत असल्यामुळे गुणवान असूनही त्यांना वरच्या दर्जाच्या नौकाऱ्या मिळत नाहीत. याच कारणांमुळे, लष्करी खात्यांतून त्यांचा कसा उठाव झाला हे सर्वश्रुत आहे. शेतीच्या मानाने त्यांची तशीच दशा आहे. येवून जावून गावाची नौकरी करून गावात भीक मागून जगण्यापलीकडे या बहिष्कृत वर्गास दुसरी कोणती गतच उरली नाही. इंग्रज सरकारच्या आमदानीत कोणाच्याही मानवी हक्काची पायमल्ली होत नाही. सर्वांना सारख्या प्रमाणात विदयेची द्वारे खुली आहेत. सर्वांना सार्वजनिक सोईचा उपयोग करून घेता येतो वगैरे वगैरे ठोकून सांगण्यात येते. तरीपण इंग्रज लोकांना येथील सामाजिक परिस्थितीच्या तंत्राने वागावे लागत असल्यामुळे हिंदू लोकांच्या अमानुष आचार विचारांपूढे अन्याय होत आहे. असे धडधडीत दिसत असूनही त्यांच्या हातून बहिष्कृत वर्गाची मानवी हक्कांचे संरक्षण होत नाही, हे अगदी उघड आहे.
अशा बिकट परिस्थितीत बहिष्कृतोन्नतीचे कार्य घडवून आणणारा प्रथमतः त्यांच्यात जागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणताही समाज झाला तरी त्याची उन्नती होण्यास प्रारंभी त्यांच्यात जाणीव उत्पन्न झाली पाहिजे. कोणी एकाने म्हटल्याप्रमाणे गरिबांस त्यांची गरीबी तर नडतेच, पण त्यांच्या मार्गातील खरी अडचण म्हटली म्हणजे त्यांची शिथीलता व त्यांचे औदासिन्न. या शिथीलतेपासून व औदासिन्यापासून त्यांची सोडवणूक करण्यास त्यांच्यात चैतन्याचा व होत असलेल्या अन्यायाच्या चिडीचा संचार झाला पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या उन्नतीस उपसर्ग करणाऱ्या कारणांचा नायनाट होणार नाही. इतक्यानेच मात्र भागणार नाही. एकीकडून त्यांना उपसर्ग करणाऱ्या कारणांचा लय तर झालाच पाहिजे, पण दुसरीकडून ज्या कारणांनी त्यांचा उत्कर्ष होईल अशा कारणांची अभिवृद्धि करणे जरूर आहे.
नवलाची गोष्ट ही की, आज ज्या काही संस्था समाजसेवेसाठी उदभूत झाल्या आहेत त्यात अशी एकही नाही की, जिने आपल्या कार्यक्षेत्रात बहिष्कृतोन्नतीस अग्रस्थान दिले आहे. मग त्या कार्यास सर्वस्वी वाहून घेणे तर दुरवरच राहिले. मुंबई इलाख्यापुरते पाहू गेले तर सोशल सर्विस लीग, सेवासदन, महिला विद्यालय, इत्यादि संस्था आहेत, व खरे म्हटले असता बहिष्कृतासारख्या खालावलेल्या वर्गाला त्यांच्या कामगिरीची अत्यंत जरूरी आहे. परंतु, खेदाची गोष्ट आहे की, त्यांची चळवळ जे मध्यम वर्गाचे लोकं आहेत त्यांच्यात फक्त आहे. कनिष्ठ वर्गास त्यांच्या मुळीच फायदा होत नाही. तेव्हा बहिष्कृत वर्गातच काम करणारी व सर्वस्वी त्यांचे हितसंरक्षण करणारी अशी एखादी स्वतंत्र संस्था असणे जरूरी आहे. ही उणीव भरून काढण्याकरिता, “बहिष्कृत हिटकारिणी सभा”, या नावाची एक संस्था बहिष्कृत वर्गातील काही जाणत्या माणसांनी स्थापन केली आहे. संस्थेचे उद्देश व नियम सोबतच्या पत्रकात छापले आहेत. त्यावरून या संस्थेच्या कार्याची दिशा व मर्यादा सहज कळू शकेल. या पत्रकातील काही भाग खाली देण्यात येत आहे.
“आम्ही वरिष्ठ वर्गांनाही अशी विनंती करतो की, त्यांनी आपले सर्वस्व राजकारणात खर्च करतांना बहिष्कृतोन्नती सारख्या सामाजिक कार्यालही हातभार लावणे इष्ट आहे. नव्हे, त्यांच्यातील काहींच्या आकुंचीत ध्येयाच्या दृष्टीने जरी पाहिले तरी त्यांनी तशा प्रकारचा हातभार लावणे जरूर आहे. आधी राजकीय मग सामाजिक ही मीमांसा अगदी नादानपणाची आहे, हे आता सिद्ध झाले आहे. कारण इतके दिवस नुसते राजकारण भिजत घातल्यानंतर जर राजकीय ध्येयाच्या आड कोणती एखादी बाब येत असेल तर ती सामाजिक होय. सामाजिक प्रश्न इतका महत्वाचा आहे की, त्याला कितीही भिजत पडू दे म्हटले असता तो दत्त म्हणून पुढे उभा राहातोच. ज्या राजकारणी धुरंधर पुरुषांनी सामाजिक प्रश्न बाजूला ठेवून नुसते राजकारण हाती घेतले व इतरांस घेण्यास लावले त्यांनी काहीच साधले नाही. इतकेच
नव्हे, तर सामाजिक प्रश्न बाजूला टाकल्यामुळे त्यांच्या राजकीय धेय्याची साध्यता त्यांची त्यांनीच बिकट करून टाकली. यांस आजची परिस्थिति साक्ष देत आहे. ही तेढ व दुही नाहीशी करण्यास या देशात घडत असलेले सामाजिक अन्याय दूर करणे अव्वल महत्वाचे कार्य आहे व ते दरेक हिन्दी जनाने आपले पवित्र कर्तव्य म्हणून बजावल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण, जोपर्यंत अशा प्रकारची दुही या देशात माजत राहणार तोपर्यंत राजकीय ध्येय दु:साध्य तर राहणारच, पण इतर दिशेनेही या देशाची उन्नती होणे कठीण पडणार आहे”.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. चांगदेव भ. खैरमोडे यांच्या, डॅा. भीमराव रामजी आंबेडकर, खंड २ या ग्रंथातून)