- 226
- 2 minutes read
बातमी खरी असेल तर……
रामकृष्ण गवई : समाजाला प्रस्थापितांच्या दावणीला बांधून पदे मिळवणारा नेता!
दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा कमल रामकृष्ण गवई या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावती शाखेच्या दसरा महोत्सवाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती राहणार असल्याचे वृत्त खरे असेल तर ते भयानक आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसऱ्याच्या दिवशी विषमतावादी हिंदू धर्माचा त्याग करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मुक्कामी जे धम्मचक्र प्रवर्तन केले त्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेत असलेला हा बदला आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्माला ज्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेने नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, त्या धर्म व्यवस्थेचा ठेका आज संघाकडे असून संघांचे मुख्यालय नागपुरात आहे. याच नागभूमीत म्हणजे बुद्ध भूमीतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची आपल्या लाखो अनुयायांसोबत दिक्षा घेऊन धम्म चक्र गतिमान केले. ऐतिहासिक आणि जगभराने दखल घेतलेली ही युग प्रवर्तक घटना आहे. ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या जिव्हारी लागलेली ही घटना असल्याने तिला प्रतिक्रांतीच्या दिशेने घेऊन जाण्याचा हा संघाकडून होत असलेला प्रयत्न आहे. गवई आणि अन्य आंबेडकरी चळवळीतील नेते त्याचा धागा बनत आहेत. हे फार खेदाने बोलावे लागते.

रामकृष्ण सूर्यभान गवई यांच्या पत्नी आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री इतकीच कमल गवई यांची ओळख आहे. यापेक्षा कुठलेही भरीव कार्य त्यांच्या नावावर नाही. तसे पाहिले तर रामकृष्ण गवई यांच्या ही नावावर परिवर्तनाच्या दृष्टीने काही भरीव कार्याची नोंद नाही. आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षाला व समाजाला प्रस्थपितांच्या दावणीला बांधून आमदारकी, खासदारकी, विधान परिषेतील विरोधी पक्षनेता, सभापती व राज्यपाल ही पदे मिळविणे ही कर्तबगारी नाहीतर दलाली आहे. आयुष्यभर त्यांनी ती केली. अन तीच शिकवण त्यांनी आपल्या परिवाराला ही दिली असून इमाने इतबारे ते पार पाडीत आहेत.

युग प्रवर्तक ठरलेल्या आंबेडकरी चळवळीसाठी गवई हे नाव अजिबात भूषणवह नाही. रामकृष्ण गवई यांच्या मृत्यूसोबतच हा परिवार काळाच्या पडद्या आड गेलेला आहे. गवईचे राजकीय वारसदार राजेंद्र गवई यांना अनेक वेळा सौदेबाजी करून ही साधे नगरसेवक ही होता आलेले नाही की, आपला परिवार ही सांभाळता आलेला नाही. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा वारसा असलेल्या दिक्षा भूमीला ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या घशात घालण्यात मात्र ते यशस्वी होत आहेत. तर त्या बदल्यात अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या परिसरात राज्यातील भाजप सरकार गवईचे भव्य दिव्य असे स्मारक उभारत आहे. स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्यावेळी भूषण गवई हे ही उपस्थित होते.

अमरावती येथील दारापूर हे गवईचे गाव. या गावात त्यांच्या शैक्षणिक संस्थेचे महाविद्यालय असून त्या ठिकाणी संघ, भाजप व अन्य हिंदुत्ववादी नेत्यांशी संबंधित अनेकांच्या जयंत्या व पुण्यथित्या मोठ्या उत्साहात साजरा ही होत आहेत. दीन दयाल उपाध्याय यांच्यावर व्याख्याने होत आहेत. रामकृष्ण व कमल गवई यांच्या कन्या, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या भगिनी व संस्थेच्या अध्यक्षा किर्ती गवई अर्जुन या हे सर्व स्वतः पुढाकार घेऊन करताना दिसतात. त्या बदल्यात त्यांच्या संस्थेला ही सरकारकडून फुल आणि फुलांच्या पाकळ्या मिळत आलेल्या आहेत. वर्षा गणिक संस्थेच्या शिरपेचात एखाद्या नव्या फॅकल्टीची भर पडत असेल तर हे सारे काही करायला त्यांना काहीच वाटत नसावे.
बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांसाठी जितके पवित्र व महत्त्वाचे आहे, तितकेच नागपूरची दीक्षा भूमी ही पवित्र व महत्त्वाची आहे. पण तिचे तीन तेरा वाजविण्यात राजेंद्र गवईने कुठली ही कसर सोडलेली नाही. आंबेडकरी जनतेच्या हे लक्षात आले असून त्याची किंमत जरूर गवई परिवाराला भोगावी लागणार आहे. गवई सारखेच अन्य काही दलित नेत्यांना सत्तेचे तुकडे टाकून संघ व भाजपने आपले गुलाम केले असून डॉ. आंबेडकर यांना सोडून त्यांनी मोहन भागवत व मोदीला बाप म्हणायला सुरुवात केली आहे
ब्राह्मणी धर्म व मनुवादी व्यवस्था गाडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जे काही केले आहे, ते नष्ट करण्याचा संघाचा अजेंडा आहे. ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिलेल्या बौद्ध धम्माला ही असेच संपविण्यात ब्राह्मणी व्यवस्थेला यश आले होते. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या युग प्रवर्तक कार्याला संपविण्याचा प्रयत्न करीत असून असे गद्दार त्यांना साथ देत आहेत.
एखाद्या महोत्सवासाठी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात यावे, इतक्या कमल रामकृष्ण गवई मोठ्या नाहीत. पण त्यांचे चिरंजीव डॉ. राजेंद्र गवई दीक्षा भूमी संघाच्या घशात घालत आहेत. त्यांच्या कन्या आपल्या महाविद्यालयात संघ, भाजप नेत्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करीत आहेत व भूषण गवई हे त्यांचे आणखी एक चिरंजीव देशातील न्याय व्यवस्थेचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना मुख्य अतिथी म्हणून बोलाविण्यात आले आहे.
मात्र महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर बंदी घालण्यात आलेल्या, हिंदू राष्ट्राचा उघडपणे पुरस्कार करीत त्यासाठी अजेंडा राबविणाऱ्या, देश विरोधी, संविधान विरोधी, भारतीय संविधानाच्या चौकटी, कायदे न मानणाऱ्या बेकायदेशीर मनुवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महोत्सवाला देशाच्या न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्चपदावरील व्यक्तीच्या आईने जाणे हे ही संविधान व देशविरोधी कृत्य आहे. या निमंत्रणा प्रकरणी भूषण गवई यांना जरूर कल्पना असावी. भूषण गवई यांच्या अनुमती शिवाय हे निमंत्रण आले नसावे व स्वीकारले ही नसावे. पण गवई परिवाराने भाजपच्या प्रतिक्रांतीला साथ देण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना त्यांची प्रतिक्रांती लखलाभ……!
…………..
राहुल गायकवाड,
प्रवक्ता व महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश