- 37
- 1 minute read
बुद्धिप्रामाण्यवादी क्रांतीकारक भगतसिंग !
बुद्धिप्रामाण्यवादी क्रांतीकारक भगतसिंग !
वयाच्या विशीतच ज्यांच्याकडे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील परिपक्वता आलेली होती, असे महान देशभक्त क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी आताच्या पाकिस्तानातील व पूर्वीच्या अखंड भारतातील पंजाब प्रांतातील बंगा, जिल्हा लालपुर येथे एका सधन कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशनसिंग तर आईचे नाव विद्यावती होते. संपूर्ण परिवार हा स्वातंत्र्यविचाराने भारावलेला होता. आजोबा,वडील, चुलते अजितसिंग हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रभागी होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गदर पार्टीमध्ये ते सक्रिय होते. भगतसिंगाचे जन्म नाव भाग्यवंत असे होते. त्यांच्या आजीने भाग्यवंत असे नाव ठेवले होते. भाग्यवंत याच नावाचा अपभ्रंश पुढे भगतसिंग असा झाला.
भगतसिंगाच्या घरचे वातावरण स्वातंत्र्याने भारावलेले असल्यामुळे स्वाभाविकपणे स्वातंत्र्यलढ्याचे बाळकडू भगतसिंगांना वाडवडिलांकडूनच मिळाले. बालवयापासूनच त्यांना दर्जेदार नियतकालिके, दर्जेदार ग्रंथ वाचण्याची संधी मिळाली. भगतसिंगाचे वाचन अफाट होते. त्यांच्या ज्ञानाचा परिप्रेक्ष केवळ एका जाती, धर्म, पंथ, प्रांत, देशापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या ज्ञानाचा व्यासंग वैश्विक पातळीवरचा होता. त्यामुळेच बालपणापासून ते छत्रपती शिवाजी महाराज, गॅरिबाल्डी, मार्क्स, लेनिन, मॅजिनी इत्यादी महापुरुष वाचू शकले.
भगतसिंग कुमार वयामध्ये जसे आक्रमक, भावनिक होते, तसेच ज्ञानाने आणि विचाराने अत्यंत परिपक्व होते. लाहोरच्या नॅशनल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना देशांमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा त्यांच्या कुमार वयावरती परिणाम होत होता. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ब्रिटिशांच्याविरुद्ध जालियानवाला बागेमध्ये क्रांतिकारकांचा मेळावा चालू असताना जनरल डायर या निर्दयी इंग्रज अधिकाऱ्यांने जालियानवाला बागेमध्ये देशभक्तावरती बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये असंख्य निरपराध स्वातंत्र्यप्रेमी मारले गेले. ही वार्ता ज्यावेळेस देशभर पसरली, या घटनेचा भगतसिंगांच्या मनावरती खोल परिणाम झाला.
आपल्या देशबांधवांना मारणाऱ्या निर्दयी इंग्रजांविरुद्ध आपण लढा उभारणार हा दृढनिश्चय भगतसिंगांनी केला. त्यांच्या गावापासून जवळच असलेल्या अमृतसर या ठिकाणच्या जालियनवाला बागेला भगतसिंग यांनी भेट दिली. तिथली क्रांतीची मूठभर माती मस्तकाला लावली. ती माती सोबत घेऊन आले. ती केवळ माती नव्हती तर क्रांतीची ज्वाला होती. महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या अहिंसक मार्गाच्या आंदोलनांमध्ये भगतसिंग सहभागी झाले. परंतु चोरीचौरा येथील घटनेमध्ये गांधीजींनी घेतलेल्या भूमिकेमुळे भगतसिंग आणि गांधी यांच्यामध्ये मतभेद झाले.
महात्मा गांधी यांच्या बद्दल आदर बाळगून भगतसिंगांनी सशस्त्र स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग स्वीकारला. महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्यांनी तरुणांचे संघटन उभारले. नवजवान भारत सभा या नावाची संघटना त्यांनी सुरू केली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या विचाराने भारावलेल्या तरुणांना त्यांनी देशभक्तीचे धडे दिले. इंग्रजांविरुद्ध आपण का लढायचे ? हे त्यांनी समजावून सांगितले. भारतीय शेतकरी उपेक्षित, वंचित, कामगार यांच्या प्रश्नावरती त्यांनी आवाज उठवला. भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी कीर्ती किसान पार्टीची स्थापना केली.
भगतसिंग यांनी चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू, बटुकेश्वर दत्त इत्यादी सहकाऱ्यांच्या मदतीने हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना केली. भगतसिंग जसे स्वातंत्र्ययोद्धे होते, तसेच ते समाजवादी, प्रागतिक, बुद्धीप्रामाण्यवादी, समतावादी विचारांचे होते. त्यांचा राष्ट्रवादी विचार हा सनातनी पायावरती उभा नव्हता, तर तो समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, समाजवादी या प्रागतीत विचारावरती उभारलेला होता. महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या परिवाराने जे कार्य केले, तेच भगतसिंग यांच्या परिवाराने पंजाबमध्ये केले.
भगतसिंग यांनी पत्रकारितेसाठी देखील लेखन केले. अकाली सारख्या नामांकित नियतकालिकासाठी त्यांनी लेखन केले. बेळगाव या ठिकाणी 1924 साली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनासाठी ते उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांचा वैभवशाली- क्रांतिकारक वारसा पाहण्यासाठी ते रायगडावरती आले. छत्रपती शिवाजीराजांच्या प्रति त्यांना नितांत आदर होता.
भगतसिंग यांची विचारधारा अत्यंत प्रागतिक होती. त्यांनी घेतलेले ननिर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतले होते. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याला तात्त्विक अधिष्ठान होते. हे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखातून, पत्रातून आणि पुस्तकातून स्पष्ट होते. त्यांची स्वातंत्र्याबाबतची संकल्पना अत्यंत व्यापक होती. शोषण करणारा ब्रिटिश जसा आपला शत्रू आहे ,तसाच एखादा भारतीय भांडवलदार-नेता जर का कामगारांचे शोषण करत असेल, तर तो देखील भारतीयांचा शत्रू आहे. ही भगतसिंग यांची भूमिका होती.
सरंजामदार-भांडवलदारांचे नव्हे तर इथल्या कष्टकरी, श्रमकरी, कामगारांचे राज्य आले पाहिजे, ही भगतसिंगांची महत्वकांक्षा होती. भगतसिंग हे अत्यंत प्रगल्भ विचारांचे होते.त्यांना झुंडशाही मान्य नव्हती.त्यांना भोळेपणा-भाबडेपणा मान्य नव्हता.त्यांना गुलामगिरी मान्य नव्हती.त्यांना व्यक्तिपूजा मान्य नव्हती.त्यांना घराणेशाही, भ्रष्टाचारी नेत्यांची लाचारी मान्य नव्हती. भारतीय नागरिक हा स्वाभिमानी, हिम्मतवान, निर्भीड, लढवय्या, स्वावलंबी, वैचारिक असावा हा त्यांचा आग्रह होता.
मी नास्तिक का आहे? या आशयाचे भगतसिंग यांनी पुस्तक लिहिले. भारतीय परिप्रेक्षात आस्तिक असण्यासाठी वैचारिकता असावीच लागते, असे नाही, आस्तिकपणा हा बहुतांश लोकांना वारश्यानेच मिळतो. मात्र नास्तिक असण्यासाठी प्रगल्भता, प्रामाणिकपणा, वैचारिकता, अफाट वाचन, तार्किकता, बुद्धिमत्ता अर्थात बुद्धिप्रामाण्य लागते. अनेकांना वारसानेच आस्तिक विचारधारा लाभते. परंतु नास्तिक असण्यासाठी कठोर वैचारिक परिश्रम करावे लागतात. ते कठोर वैचारिक परिश्रम भगतसिंग यांनी केलेले होते. आस्तिकता म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मान्य असे नव्हे, तर आस्तिकतेचा संबंध ग्रंथप्रामाण्याशी आहे. तात्पर्य आस्तिक असण्यासाठी अक्कल लागत नाही,पण नास्तिक असण्यासाठी मात्र ती निश्चितच लागते.
भगतसिंग म्हणतात स्वर्ग-नरक, पूर्वजन्म-पुनर्जन्म, आत्मा, पाप-पुण्य, चौर्यांशी लक्ष योनीचे फेरे, मोक्ष या बाबीवर विश्वास ठेवणे, हा मूर्खपणा आहे. संकट समयी संकटाला सामोरे जाण्याऐवजी ईश्वराची भक्ती करणे हा पळपुटेपणा आहे. स्वातंत्र्यासाठी लढणे हा जिवंतपणा आहे आणि गुलामगिरीमध्ये राहणे हाच खरा मृत्यू आहे. स्वातंत्र्यासाठी लढा देणे हेच खरे शौर्य आहे. हे दुःखं आमच्या नशिबातच आहे असे म्हणणे, हा शुद्ध भित्रेपणा आहे. असे भगतसिंगांचे प्रागतिक विचार आहेत.
देशाची सत्ता श्रमकरी, कष्टकरी, कामगारांचा हाती राहिली पाहिजे, ती भांडवलदार किंवा नवसरंजामदार यांना उपभोगण्याचा अधिकार नाही, कारण कामगार, शेतकरी, श्रमकरी हाच वर्ग उत्पादक वर्ग असतो. नवसरंजामदार, भांडवलदार आणि सनातनी लोक हे ऐतखाऊ असतात, त्यामुळे त्यांना सत्ता गाजवण्याचा-वापरण्याचा नैतिक अधिकार नाही, असे अत्यंत दयाळू विचार भगतसिंगांचे होते. भगतसिंग जसे जुलमी इंग्रजांच्या विरुद्ध होते तसेच ते भारतातील नवसरंजामदार आणि भांडवलदारांच्या देखील विरोधात होते. ते जसे नास्तिक होते, तसेच ते समाजवादी, दयाळू, कम्युनिस्ट आणि प्रागतिक विचारांचे होते.
वेगवेगळ्या माध्यमातून ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडणे, समाजामध्ये जनजागृती करणे, हे भगतसिंगाचे कार्य सुरू होते. दरम्यानच्या काळात 1928 साली सायमन कमिशन भारतात आले. भारतीय लोकांना सत्तेतील वाटा द्यावा, हा त्यांचा हेतू होता. परंतु त्या सायमन कमिशनवरती एकही भारतीय सदस्य नव्हता. त्यामुळे भारतातून सायमन कमिशनला विरोध झाला. गो बॅक सायमन ! हा नारा भारतीयांनी दिला. या कमिशनविरुद्ध पंजाबचा सिंह लाल लजपतराय पुढे आले. ब्रिटिशांनी आंदोलनकर्त्यावर लाठीमार केला. त्यामध्ये लाला लजपतराय जखमी झाले आणि पुढे त्यातच त्यांचा अंत झाला. याविरुद्ध देशभर मोठा असंतोष निर्माण झाला. या घटनेने भगतसिंग आणि त्यांचे सहकारी प्रचंड अस्वस्थ झाले.
लाठीहल्ला करणाऱ्यांना धडा शिकवायचा या उद्देशाने भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी सॉंडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केला, त्यातच या ब्रिटिश अधिकार्याचा अंत झाला. केंद्रीय कायदे मंडळात भारतीयांच्या विरोधात काही कायदे पास होत होते, याला विरोध करण्यासाठी भगतसिंग आणि त्यांचे सहकारी दिल्लीतील सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले.कोणीही जखमी होणार नाही, कोणालाही दुखापत होणार नाही, अशी खबरदारी घेऊन भगतसिंगांनी त्या ठिकाणी बॉम्ब टाकले आणि पत्रके भिरकावली. पळून न जाता भगतसिंग आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी थांबले. त्या बॉम्ब हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी भगतसिंगांनी ही कारवाई केली होती.
इंग्रज पोलिसांनी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना पकडले. पुढे त्यांच्यावरती खटला दाखल झाला. न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी होऊ नये, यासाठी महात्मा गांधी आयर्विनला भेटले. अनेक शिष्टमंडळाने इंग्रज सरकारवरती दबाव आणला, पण ब्रिटिश न्यायव्यवस्था आणि प्रशासन फाशी देण्यावरती ठाम होते. फाशी रद्द करण्यासाठी इंग्रजांना साकडे घालणे भगतसिंग यांना मान्य नव्हते.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू दोन वर्ष तुरुंगात होते. तुरुंगात असताना भगतसिंग यांनी अफाट वाचन केले, लेखन केले, पत्र लिहिली. आपण स्वातंत्र्यासाठी लढलो, आपल्याला फाशी होणार आहे, याबद्दल त्यांना यत्किंचितही पश्चाताप नव्हता, जराही भीती नव्हती. ते अत्यंत निर्भीड, बाणेदार, स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ होते. भगतसिंग यांनी तुरुंगात असताना साठ दिवसाचे उपोषण केले.
भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना 24 मार्च 1931 रोजी फाशी देणार होते. परंतु त्याच्या आदल्या दिवशीच 23 मार्च रोजी फाशी देण्याचा निर्णय ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घेतला. लाहोरच्या जेलमध्ये ज्या ठिकाणी फाशी देण्यात येणार होते, त्या ठिकाणचे अधिकारी पहाटे भगतसिंग यांना उठविण्यासाठी गेले, तर भगतसिंग जागेच होते. ते लेनिनचे चरित्र वाचत होते. अधिकार्यांनी भगतसिंग यांना सांगितले “चला फाशीची वेळ झालेली आहे” तेव्हा भगतसिंग निर्भिडपणे त्या इंग्रज अधिकाऱ्यांना म्हणाले “थांबा, दोन क्रांतिकारकांचा संवाद सुरू आहे” ते लेनिनचे चरित्र वाचत होते. शेवटची दोन पानं राहिली होती. भगतसिंग यांनी ती वाचून पूर्ण केली. वाचून झाल्यावर ते फासाकडे निघाले. ते रात्रभर न झोपता, निराश, हताश न होता देशासाठी निर्भीडपणे शेवटपर्यंत लढले.
इंग्रजांनी फाशी देण्यापूर्वी भगतसिंग यांनी आपल्या आईला सांगितले होते की “आई, तू माझे पार्थिव नेण्यासाठी येऊ नकोस, कारण तू आलीस तर माझे पार्थिव पाहून तू रडशील आणि मग लोक म्हणतील की भगतसिंगाची आई रडते! रडणाऱ्या आईचा हा पुत्र? त्यामुळे तू पार्थिव नेण्यासाठी येऊ नकोस.”
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी दिले. हे तीन देशभक्त हसत-हसत आनंदाने भारतीय स्वातंत्र्यासाठी फासावरती चढले. याप्रसंगी भगतसिंगाचे वय फक्त 23 वर्षाचे होते.भगतसिंग म्हणाले होते की “मृत्यूनंतर आत्मा देखील तिथेच मरतो, तो पुनर्जन्म घेत नाही.याच जन्मामध्ये कर्तृत्व गाजवा”, असा क्रांतिकारक, प्रगल्भ विचार देणारा तरुण महामानव म्हणजे भगतसिंग ! यांच्या जयंतीनिमित्ताने या तरुण महायोद्ध्याला विनम्र अभिवादन !
– डॉ श्रीमंत कोकाटे