महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-१३
ब्राम्हणी तत्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती ते शूद्र आणि स्त्रिया, या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारला होता. त्यामुळे, या वर्गावर असा परिणाम झाला की, आपल्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था झाली आहे, हे त्यांना कळत नव्हते. ब्राम्हणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते, हे त्यांना समजले नव्हते. त्यामुळे, या तत्वज्ञाना विरोधी बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त झाले व त्याचा पुरस्कार करू लागले.
विशेष म्हणजे, चातुवर्णावर आधारलेली समाज व्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात असल्याने ती बदलता येणे शक्य नाही, अशी लोकांची पक्की समजूत झाली आहे. हे बुध्दांना माहिती होते. बुध्दांने ईश्वराचे अस्तित्व नाकारून, चातुवर्ण समाजव्यवस्था मानव निर्मित आहे व ती बादलवता येते, हे स्पष्ट केले. ही समाज व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला. चातुवर्ण व्यवस्थेप्रमाणेच बुध्दांना यज्ञाचा सिद्धांत देखील मान्य नव्हता. अशा प्रकारे बुध्दांनी वेद, ब्राम्हणे, उपनिषदे, या सर्वच धार्मिक ग्रंथांना तीव्र विरोध केला होता. कारण, हे सर्व ग्रंथ विषमता, आत्मा, ब्रम्ह, यज्ञयाग, आदि गोष्टींचा पुरस्कार करणारे असून, त्यात समता, विचार-स्वातंत्र्य, कर्तुत्व यांना कोणतेच स्थान नव्हते.
बुध्दांने काल्पनिक, दैवी, आत्मा, चातुवर्ण, ईश्वर, मोक्ष, पुनर्जन्म, यज्ञयाग आदि सर्व गोष्टी आणि त्याचा पुरस्कार करणाऱ्या इतर सर्व गोष्टींचा विरोध केला. आणि, वास्तविकता, सत्य, सामाजिक समता, विचार स्वातंत्र्य, सर्वांचे हित या गोष्टींनाच महत्व दिले.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (३६) या ग्रंथातून)