ब्रीजवाडीत वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा धडाका! प्रा.अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात
औरंगाबाद : शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचाराचा धडाका लावला आहे. शहरातील ब्रीजवाडी भागात प्रभाग क्रमांक ९ च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला नागरिकांनी तुफान गर्दी करत वंचितला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
सभेला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी स्थानिक प्रशासनावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, “शहराचा विकास केवळ कागदावर राहिला आहे. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आजही नागरिकांना संघर्ष करावा लागतोय. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने औरंगाबादचा कायापालट हवा असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.”
प्रभाग ९ चे अधिकृत उमेदवार सतीश पट्टेकर, शबनम कलीम कुरेशी, शहनाज सलीम पटेल आणि कलीम छोटू कुरेशी यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ब्रीजवाडीतील या सभेमुळे परिसरातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. या सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली होती. कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. प्रभाग ९ मध्ये वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या या आघाडीमुळे सर्वत्र चर्चा होत आहे.