• 170
  • 3 minutes read

भाजप युतीला ( एनडीए )अधिक डॅमेज करून विधान परिषदेच्या 3 ही जागा जिंकण्याची मविआला संधी…!

भाजप युतीला ( एनडीए )अधिक डॅमेज करून विधान परिषदेच्या 3 ही जागा जिंकण्याची मविआला संधी…!

                महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणुक होत असून 4 जागा निश्चितपणे निवडून येत असताना भाजपने पाचवा उमेदवार उभा केला आहे, तर संख्याबळ नसताना शिवसेना (शिंदे ) अन राष्ट्रवादी पार्टी (अजित) या भाजपच्या मित्र पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. भाजप युतीचे एकत्रित संख्याबळ लक्षात घेता त्यांच्या 11 पैकी 8 जागा सहज निवडून येतात. पण सत्तेचा माज, मस्ती अन घमेंड असल्याने युतीने 9 वा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे. आता हा माज, मस्ती उतरविण्याची फार मोठी संधी महा विकास आघाडीकडे चालून आली आहे. त्या संधीचे सोने करून हा माज उतरविला पाहिजे.मविआमधील काँग्रेस 37, उद्धव ठाकरे 15 अन एक अपक्ष अशी 16 मतं आहेत. अन राष्ट्रवादी (शरद पवार ) 13 मतं आहेत. ही एकूण मतं 66 इतकी होतात. ठरलेल्या 23 मतांच्या कोट्यानुसार मविआचे दोन उमेदवार सहज निवडून येऊन आघाडीकडे 20 मतं शिल्लक राहतात. तर समाजवादी पार्टी व एममायएमकडे प्रत्येकी 2 आमदार आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडे एक आमदार आहे. ही हमखास भाजप आघाडीच्या विरोधातील मतं आहेत. ही एकूण 5 मतं अन शिल्लक 20 मतांमुळे तिसरा ही उमेदवार सहज निवडून येतो.

        त्या शिवाय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहारचे ही 2 अन हिंतेन्द्र ठाकूरच्या बहुजन विकास आघाडीकडे 3 आमदार आहेत. ही मतं मिळविण्यात मविआला यश आले तर तिसरा उमेदवार निवडून आणून भाजप युतीला डॅमेज करण्यात आघाडी यशस्वी होऊ शकते.पण बच्चू कडू अन हिंतेन्द्र ठाकूर यांनी या संदर्भातील आपली भुमिका अद्याप स्पष्ट केलेली नाहीं. मात्र मविआचे नेते या संदर्भात एकत्रित प्रयत्न करताना ही दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात 2 जागाबाबत उलट सुलट चर्चा आहे. शिवसेना (उबाठा ) ने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वतः उद्धव ठाकरे व काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. तसे जयंत पाटील यांच्या उमेदवारीबाबत घडले नाही. अथवा तसे घडताना ही दिसत नाही.
         शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शेकापची कसली ही ताकद नसताना, विधानसभेत एक ही आमदार नसताना तीन वेळा ते विधान परिषदेवर निवडून गेले आहेत, ते केवळ अन केवळ राजकीय सौदेबाजी व धनाचा वापर करूनच. त्यांच्या याच करामतीचा विचार करून शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली असणार. यात काहीच शंका नाही. मात्र जयंत पाटील यांना उमेदवारी देताना पवारांनी मविआतील घटक पक्ष व त्यांच्या नेत्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे जयंत पाटील मविआचे नव्हेतर केवळ शरद पवार यांचे उमेदवार आहेत, असेच चित्र या निवडणुकीच्या तोंडावर ही दिसत आहे. या तिसऱ्या जागेबाबत शिवसेना (उबाठा ) अथवा काँगेस नेते स्पष्टपणे बोलताना दिसत नसले तरी आपल्याकडील अतिरिक्त मतं ते जयंत पाटील यांनाच देतील उर्वरित मतांची जोडणी शरद पवार व जयंत पाटील कशी करतात, यावरच या तिसऱ्या जागेचे भवितव्य आहे.
         लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजप व राष्ट्रवादी पार्टी ( अजित ) ला नाकारल्यामुळे भाजप व या मित्र पक्षांच्या आमदारांमध्ये चालबिचल सुरु झाली असून शिंदे व अजित पवार यांच्या सोबत गेलेले अनेक आमदार स्वगृही येण्यासाठी तयार आहेत. या निवडणुकीची संधी साधून ते स्वगृही आले तर जयंत पाटील सहज विजयी होऊ शकतात. शरद पवार यांना हाच विश्वास असल्याने त्यांनी ही उमेदवारी अतिशय आत्मविश्वासाने जाहीर केली असावी.
         लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची कसर भरून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस भाजपचे 5 ही उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करतील. यावेळी भाजपच्या एका ही जागेबाबत दगाफटका झाला तर ते फडणवीस व त्यांच्या टोळीला अतिशय महाग पडू शकते. याची जाणीव स्वतः फडणवीस यांना असल्याने ते सत्ता व घोडेबाजार करून भाजपा युतीच्या सर्वच्या सर्व 9 जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करतील. मविआ नेत्यांनी व स्वतः शरद पवार यांनी अतिशय सजग राहण्याची गरज आहे. गेल्या 5 वर्षात फडणवीस यांनी अनेक वेळा दगाफटका करून मविआची मतं फोडली आहेत. हे विसरून चालणार नाही.
        लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप युतीच्या विरोधात जे वातावरण तयार झाले आहे, त्याचा फायदा उठवून भाजप युतीला अधिक डॅमेज करण्यासाठी मविआने संयुक्तपणे तीन उमेदवार जाहीर केले असते व समाजवादी, एमआयएम, सीपीएम व अन्य छोट्या पक्षांना विश्वासात घेतले असते, तर त्यामुळे भाजप, शिंदे व अजित गट अधिक डॅमेज झाले असते. पण आलेल्या संधीचा फायदा उठविण्यात मविआ मागे का पडते ? हा नेहमीचाच प्रश्न असून त्यामुळे राजकीय वर्तुळात मविआबाबतच उलट सुलट चर्चा सुरु असते. अन ही चर्चा भाजप युतीसाठीच लाभदायक ठरते.
       सत्ता, तपास यंत्रणा अन धन शक्तीचा गैर वापर करून भाजपने देशभरातील संसदीय राजकारणाला व परंपरांना पायंदळी तुडविण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकार, शिवसेना व राष्ट्रवादी पार्टीची तोडफोड ही याची ठळक उदाहरणे आहेत. याचा मविआने अशा निवडणुकांच्या माध्यनातून विरोध केला पाहिजे. संविधान विरोधी कृती करणाऱ्या भाजप व मित्र पक्षांना अधिक डॅमेज करण्याची संधी या निवडणुका उपलब्ध करून देतात. त्याचा फायदा घेतला पाहिजे. पण तसे राजकारण मविआ करताना दिसत नाही. उलट या साठी भाजप नेते सतत सजगपणे प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती आहे.
………………

– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *