- 44
- 1 minute read
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान व अवमान करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात निळा झेंडा

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान व अवमान करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात निळा झेंडा अन डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन रणमैदानात उतरलेल्या या आजीला एव्हाना आपण सर्वच जन विसरलेलो असू. पण ग्रामपंचायतेत भाजपची सत्ता असलेल्या सांगली जिल्ह्यातील बेडग गावची ही आजी…! या ग्रामपंचायतीने संविधानाचे शिल्पकार, जनक असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार असलेली कमान जातीय द्वेषातून जमीनदोस्त केली अन संपर्ण आंबेडकरी समाज या धर्मांध शक्तीच्या विरोधात मुंबईतील विधिमंडळावर चाल करून एक लॉंग मोर्चाच्या माध्यमातून निघाला. त्याच मोर्चातील ही आजी. मुंबई कुठे अन किती कोस आहे? हे ही कदाचित तिला माहित नसेल, पण अवमान, अपमानाच्या विरोधात व स्वाभिमानासाठी लढण्याचे बळ तिच्याकडे होते. अन इथे तर हे बळ देणाऱ्याचाच अवमान, अपमान धर्मांधानी केला होता. मग आजी गप्प कशी बसेल? या गावातील 150 कुटुंबं आपल्या घरादाराला कुलपं लावून लॉंग मोर्चात सामिल झाली.त्यातीलच एक ही आजी…! इतिहास घडवू पाहणाऱ्या या लॉंग मोर्चाला राज्यभरातून पाठींबा मिळू लागला….! हजारो लोक सामिल होऊ लागले…! धर्मांधांच्या सत्तेपुढे आव्हान उभे राहिले. अन मग झारीतील शुक्राचाऱ्यांनी या धर्मांधांशी साठगाठ करून हा लॉंग मोर्चा मुंबईच्या वेशीवर ही येवू दिला नाही. लॉंग मोर्चाचा अन आजीच्या भावनांचा सौदा झाला.
या घटनेला दोन वर्ष होत आलेली आहेत. पण आजी आठवणीतून जाता जात नाही. याच धर्मांध शक्ती व तिच्या ताब्यातील सत्तेने पोलिसा करवी संविधानाचे रक्षण, संरक्षण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी तरुणाचा बळी घेतला. सारा आंबेडकरी समाज बेडगमधील जनतेप्रमाणेच रस्त्यावर उतरला. पुन्हा लॉंग मोर्चात सामिल होऊन तो मुंबईच्या विधीमंडळावर धडक देण्यासाठी परभणीवरून निघाला आहे. पुन्हा राज्यातील जनतेचे जथ्येच्या जथ्ये त्यांना साथ देत लॉंग मोर्चात सामिल होत आहेत. अन पुन्हा झारीतील शुक्राचार्य धर्मांध शक्तीशी, सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांशी सौदेबाजी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.पुन्हा एकदा बेडगची पुनरावृत्ती होतेय की काय अशी भिती वाटू लागली आहे.
यंदाच्या वर्षीच झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संविधानाचे संरक्षण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या घडवून आणली. याच सत्तेने बीडमध्ये एका मराठा तरुण सरपंचांची ही हत्या घडवून आणली. संविधानावर चालणारी राज्य व्यवस्था संपवून ब्राह्मणी व्यवस्था पुन्हा या देशावर लादण्याच्या कट कारस्थातील कटाचा या दोन्ही घटना भाग आहेत. अन या कट कारस्थानात आंबेडकरी समाजातील दलाल ही या धर्मांधांनी स्वतःच्या बाजूला उभे केले आहेत. त्यामुळेच संविधान बदलण्याचा अजेंडा घेऊन निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या भाजपसाठी अनेकांनी आंबेडकरांचे नाव व हाती निळा ध्वज घेवून मतं मागितली. ज्यांच्यासाठी या दलालांनी मतं मागितली तेच आज सत्तेवर आहेत व त्यांनीच सोमनाथ सूर्यवंशीचा बळी Let’s आहे. त्यामुळे सोमनाथच्या हत्येसाठी जितके हे धर्मांध सरकार जबाबदार आहे, तितकेच हे दलाल ही. पण आज तेच निर्लज्जपणे सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचा जाब मागण्यासाठी मुंबईकडे येत असलेल्या लॉंग मोर्चाच्या स्वागताच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत.
लोकसभा व विधानसभेसाठी भाजप व मित्र पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी ज्यांनी भाजपकडून धन घेऊन तनमनाने काम केले तेच आज भाजपच्या सत्तेला जाब विचारण्यासाठी येत असलेल्या लॉंग मोर्चाच्या स्वागतासाठी समित्या स्थापन करीत आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे. एका बाजूला स्वागत समित्या स्थापन करायच्या व दुसऱ्या बाजूला सत्तेशी मध्यस्ती करायची असा दुहेरी उद्देश या लोकांचा आहे. हे स्पष्ट दिसत आहे. त्या शिवाय हे खबरेगिरी ही करीत आहेत. सत्तेचे दलाल जे करतात ते सारे हे करीत आहेत.
सत्याग्रह व लॉंग मोर्चा हे आंबेडकरी चळवळीसाठी नवीन नाही….!
सत्याग्रह, लढे, संघर्ष व लॉंग मोर्चा आंबेडकरी चळवळीसाठी नवीन गोष्ट नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी महाड येथे 20मार्च 2017 रोजी सत्याग्रह झाला. दोन वर्षांनी त्यास शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. चवदार तळे सत्याग्रह म्हणून हा सत्याग्रह जागतिक इतिहासात नोंदविला गेला आहे. नेमके तेच स्थान इतिहासाच्या पानांवर काळाराम मंदिर सत्याग्रहाचे आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला लॉंग मोर्चा व त्यातील ” कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय? ” ही घोषणा आज ही प्रत्येकाच्या मुखात आहे. पण ही सर्व आंदोलने व सत्याग्रह क्रियावादी होते. सत्याग्रह, लॉंग मोर्चे हे समग्र परिवर्तनासाठी व सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक बदलासाठी झाले होते. त्या क्रिया होत्या अन परिवर्तन नाकारणाऱ्या शक्ती विरोधात उभ्या होत्या. आजचे लढे हे प्रतिक्रियावादी झालेले आहेत. अन्याय, अत्याचार झाल्यावर आम्ही जागे होतो व न्याय मागण्यासाठी संघर्ष करतो. त्याची गरज ही आहेच. पण क्रियावादी संघर्ष करण्याची, लढे उभारण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. दुर्दैव आहे, ते होताना दिसत नाही.
सोमनाथ सूर्यवंशी हत्येंनंतर सरकारने दिलेली 10 लाख रुपयांची मदत सोमनाथच्या आईने नाकारली, ही या धर्मांध शक्तींच्या तोंडावर मारलेली चपराक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला स्वाभिमान आंबेडकरी जनतेच्या नसानसात आहे. तो भाजप व मित्र पक्षांच्या वळचणीला सत्तेच्या एखाद्या हड्डीसाठी लाळ घोटत पडलेल्या नेत्यांमध्ये का दिसत नाही ? या लाळ घोट्या नेत्यांना ओळखले पाहिजे, कारण तेच आंबेडकरी जनतेचा अन त्यांच्या संघर्ष व आंदोलनाचा सौदा करीत आलेले आहेत. यांच्यापासून सावधान राहण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. हा लॉंग मोर्चा मुंबईत दाखल झाला, तर त्यात लाखो लोक सामिल होण्याची शक्यता आहे. आंबेडकरी जनतेचे व विचारांच्या लोकांचे असे एकत्र येणे, या धर्मांध शक्तिसाठी धोक्याचे आहे. त्यामुळे या शक्ती मुंबईच्या वेशी बाहेरच या दलाल नेत्यांना हाताशी धरून लॉंग मोर्चाची बोळवण करण्याचा प्रयत्न करतील, तो हाणून पाडण्याची नीती ही खऱ्या आंबेडकरी समाजाकडे असली पाहिजे.
बाकी प्रतिक्रियेतून का असेना मुंबईत दाखल होत असलेल्या परभणी ते मुंबई या लॉंग मोर्चाच्या स्वागतासाठी भारतीय संविधान व लोकशाहीवर निष्ठा असलेली जनता तयार आहे. मात्र बेडगप्रमाणे यावेळी ही धोका होऊ शकतो, यासाठी अधिक सावधान राहण्याची ही गरज आहे.
……………..
राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)