• 29
  • 1 minute read

मतदार होतो, ‘माणूस’ नव्हतो ?

मतदार होतो, ‘माणूस’ नव्हतो ?

लोकसभेचं मतदान शांततेत पार पडलं. निकालाचे कवित्व ॲंकर चेकाळून पार पाडत होते. दुसऱ्या दिवशी विजयाचा गुलाल उधळला जात असताना मायानगरी मुंबापुरीत पवईला जयभीमनगरमध्ये बुलडोझरशी, पोलिसांच्या दंडुक्याशी गरीब मतदारांची झुंज सुरू होती. व्यवस्था बलशाली. तिच्या पाशवी पंजाखाली दुर्बलांचा कितीसा निभाव लागणार ? सोबतचे फोटो पहा.
खेड्यांतून तीन पिढ्या आधीच ही माणसं शहरात आलेली. खेड्यात एक भारत आहे जिथल्या माणसांना तिथलीच माणसे माणूस मानत नव्हती. आजही किती मानतात ? शहरात या जातवर्गीय ओळखी मिटतात. बाबासाहेब म्हणाले होते – “शहरांकडे चला !” गांधीजींच्या स्वप्नातील खेडी गांधीजींना लखलाभ. खेडी हा विकासाचा केंद्रबिंदू नको. माणूस हाच केंद्रबिंदू ठेवा, हा आग्रह घटना समितीत बाबासाहेबांनी का धरला तर खेड्यात पारंपरिक उपेक्षितांना काहीच भवितव्य नव्हते.
ही शहरे ज्यांच्या कष्टावर इमले उभी करतात तिथला कष्टकरी अजूनही हक्काचा निवारा मिळवू शकलेला नाही. मग, आरोग्य, शिक्षण, बऱ्यापैकी राहणीमान, सामाजिक पत वगैरे गोष्टी तर किती दूर !
ऐन पावसाळ्यात कुणाचा निवारा का काढून घ्यावा ? बोरीवलीत असाच सरकारच्या तीन खात्यांनी एकत्रितपणे कोर्टात अर्ज असताना सकाळी सातलाच बुलडोझर आणून ऐन करोनाच्या काळात झोपडीतील माणसांना बेघर केले होते. ती दृष्ये पाहावत नव्हती. पुण्यात आंबील ओढा परिसरात झोपडपट्टी सुधार योजनेचे पुनर्वसन बाकी असतानाच वटपौर्णिमाच्या सणाचा मुहूर्त काढून धुवांधार पावसात बुलडोझर चालवले …
अशा कारवायांच्या बातम्यांमध्ये एक साधी प्रशासकीय कारवाई आहे, असे भासविले जाते. संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी काय बोलायचे, स्थानिक नेत्यांनी काय बोलायचे, राज्य सरकारच्या सचिवांनी काय बोलायचे यांचे स्क्रिप्ट बहुदा बिल्डरच्या ऑफिसमध्ये लिहून मगच कारवाई सुरू होत असावी.
पवई जयभीमनगरच्या कारवाईत कागदोपत्री ८०० कुटुंबावर हे संकट आलेले दिसते. असा दिवस उजाडत नाही की देशात कुठे कष्टकरी कुटंबांच्या निवाऱ्यावर बुलडोझर फिरला नाही.
संविधानाच्या उद्देशपत्रिकेत ‘आम्ही भारताचे लोक ‘ ७ टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार असतो. तेवढाच निवडणूकांचा काळ काय तो बुलडोझरविना जातो. काल ज्या घरातून ते मतदार होते तेच मतदान संपले, निकाल हाती आले की त्यांची घरे बेकायदेशीर होतात ? ते तुमच्या सार्वभौम स्वतंत्र देशात फक्त मतदार असतात. ‘सभ्य सुसंस्कृत’ लोक पॅनेल चर्चेत भाग घेताना जो ‘जनादेश जनादेश जनादेश ‘ शब्दाचा सतत उल्लेख करतात त्यात झोपडीत राहणारे ‘जन’ येत नाहीत का ?
जसिंता केरकेट्टा या आदिवासी तरुणीने रास्तच सत्य सांगितले आहे – ते आमच्या सभ्य सुसंस्कृत होण्याची व आम्ही त्यांच्या ‘माणूस’ होण्याची वाट पाहात आहोत ! सभ्य सुसंस्कृत समाजापाशी माणूसकी सोडून सर्वकाही आहे !

– किशोर मांदळे

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *