- 398
- 1 minute read
मनुस्मृती जाळणारे जितेंद्र आव्हाड सच्चे भीमसैनिक – पैगंबर शेख
जितेंद्र आव्हाडांकडून चुकून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. ती चूक त्यांनी मान्य केली. ते पळून गेले नाहीत. त्यांनी यासाठी मीडियावर येऊन जाहीर माफी मागितली. ती माफी मागताना त्यांना कसलाही कमीपणा किंवा संकोच वाटला नाही. आणि वाटावा पण का ? कारण हा लढवय्या वाघ स्वतः विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पक्का अनुयायी आहे. आमच्या वैचारिक बापा बाबत आमच्याकडून काही चूक झाली तर ती आम्ही उघडपणे मान्य करतो आणि त्यासाठी जाहीर माफीही मागतो. ही माफी लोकांसाठी नाही. तर चुकून झालेल्या त्या कृत्याबद्दल मनापासून वाईट वाटले म्हणून माफी मागितली. पण हा लढा इथपर्यंत थांबणार आहे या गैरसमजात राहू नका. राज्यात अजूनही ठिकठिकाणी मनुस्मृती दहनाचे कार्यक्रम होणार आहेत. मनुवाद्यांच्या पोटात अजून गोळा आणला जाणार आहे…
भाजपा आणि त्याशी संबंधित पक्षांकडून आज जितेंद्र आव्हाडांचा निषेध केला जातोय. यांना खरच हक्क आहे का हे करण्याचा ? ज्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केली आणि या स्वतंत्र भारताला लोकशाहीवर आधारित असे संविधान देऊन या देशावर उपकार केले. त्याच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देऊन हे सरकार मनुस्मृती शालेय शिक्षणात आणत आहे ? त्याचा विरोध एका तरी भाजपच्या लाल ने केला का ? त्याशी संबंधित एका तरी पक्षाने केला का ? आज जितेंद्र आव्हाडां बाबत आपला ‘विवेक’ हरवून बसलेले नामधारी नेते त्यावेळी कुठे शेपूट घालून बसले होते ? होती का हिंमत पुढे येऊन यावर कृतिशील काहीतरी करण्याची ?
आम्हाला अभिमान आहे संपूर्ण महाराष्ट्रातून जितेंद्र आव्हाडां सारखा एक तरी ढाण्या वाघ रस्त्यावर मनुस्मृती जाळण्यासाठी उतरला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खऱ्या अर्थाने अनुयायी ठरला…
आज जे सगळे लोक बिळातून बाहेर आले आहेत त्या सगळ्यांची तोंडं व्यवस्थित पाहून घ्या. ज्यावेळी कोशारी सारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा धडधडीत अपमान करत होता त्यावेळी हे सगळे तोंडात मनुस्मृती घेऊन गप्प बसले होते. ज्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याकडून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान झाला त्यावेळी हे सगळे प्रकार आज बिळातून बाहेर आलेले लोक निमूटपणे पाहत होते. त्यांनी यावर साधा निषेध देखील व्यक्त केला नाही. पण आज जितेंद्र आव्हाडांकडून चुकून एक कृती झाली तर सगळेच्या सगळे आज महाराष्ट्राच्या अनाजी पंतांशी किती एकनिष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी बाहेर पडले आहेत. जणू यांच्यात कोण किती पंतांशी एकनिष्ठ हे दाखवण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे.
मित्रांनो, एक लक्षात घ्या. बाबासाहेबांचा चुकून फाडला गेलेला फोटो ही यांची पोटदुखी अजिबात नाहीये. आज मनुस्मृती पुन्हा जाळली गेली ही यांची खरी पोटदुखी आहे. त्यामुळे संविधानकर्त्यांचा विचार मान्य नसणारे लोक आज चुकून घडलेल्या गोष्टीचे भांडवल करत आहेत. जेणेकरून अजून कोणीही मनुस्मृती जाळू नये. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रात अजूनही जिवंत आहेत ही यांची पोटदुखी आहे. हा अंडर करंट संपवण्यासाठी हे सगळं भांडवल केले जात आहे. हा मनुवाद समजून घ्या…
माझं उघड आवाहन आहे. भाजप आणि त्याशी संबंधित लोकांना. तुम्ही या रस्त्यावर आणि मनुस्मृती जाळून दाखवा. बघू तुमच्या रक्तात किती भीमराव शिल्लक आहेत ते… #समजलंतरठीक
जय भीम, जय भीम, जय भीम…✊
– पैगंबर शेख
(शिव-फुले-शाहू-आंबेडकरी या वैचारिक वास्तदांच्या तालमीतला पठ्ठ्या)