- 48
- 1 minute read
“मला काय होतंय? अरे वाघ आहे मी वाघ! असले छाटछूट रोग आपल्याला नसतात होत…”
बोलायला किती मस्त वाटतं ना? मी सुद्धा हीच वाक्ये अनेकांना तोंडावर फेकून मारत असे. वयाच्या एका विशिष्ट वयापर्यंत प्रत्येकालाच असं वाटतं की मी अगदी आरोग्यसंपन्न आहे. मला काहीच होणार नाही. खा, प्या, मजा करा… पण जेव्हा खरोखर एखादा शारीरिक प्रॉब्लेम समोर येतो तेव्हा मात्र स्वतःच्याच आत्मविश्वासावर हसायला येते.
थोडक्यात सांगायचं तर, माझी लाइफस्टाइल म्हणजे मनात येईल तेव्हा कुठेही भटकणे, वाट्टेल ते खाणे नि पिणे. मिनरल वॉटरच हवं असा हट्ट नाही. अगदी रस्त्याच्या कडेच्या गाड्यावरचे पदार्थ खाऊन तिथेच मगातले पाणी पिऊन ढुंगणाला हात पुसणे वगैरे असल्या आमच्या सवयी.
मग वयाची चाळीशी जवळ आली आणि निमित्त झाले ते पावसात बाईक स्लिप होऊन पडण्याचे. मांडीजवळ दुखतंय होईल नीट म्हणून दोन दिवस असेच काढले. नंतर दुखणे असह्य झाल्यावर तपासणी केली आणि आयुष्यात चक्क पहिल्यांदा फ्रॅक्चर दिसले. ते सुद्धा साधे हेअर लाईन नाही तर फिमर बोनचा पार तुकडाच! डॉक्टरांनी बेल्ट बांधायला दिला आणि बजावून सांगितले की किमान 3 महिने तरी बेडरेस्ट हवीच. कसे बसे पंधरा दिवस बेडवर काढले. आता वाटलं झालं नॉर्मल… पण अचानक पायाच्या शिरा ओढल्या जाऊ लागल्या आणि समजलं की मणका पण सरकला आहे. या शिरा ओढल्या जाणे आणि चमक उठणे भयंकर त्रासदायक असते. हे अजूनही सहन करतोय.
पण अंगात मस्ती किती असते बघा… परत बाईक चालवायला सुरू केली आणि परत एकदा धडपडलो. या वेळी छातीच्या बरगड्या तोडून घेतल्या. रिब नंबर 3 ते रिब नंबर 8 छाती आणि पाठ दोन्ही क्रॅक! छातीचा पिंजरा पण जागेवरून हलला. आता? आता परत बेडरेस्ट! छातीचा बेल्ट बांधा आणि पडून राहा… ही एक शिक्षाच. देव पण म्हणत असेल की बेट्या, इतकी वर्षे मजा मारलीस त्याचे सगळे उट्टे एकदाच काढणार बघ. शरीरात नेमके कुठे दुखत आहे हेच कळत नाही अशी अवस्था.
हे एवढ्यावरच थांबलं नाही… मागच्या महिन्यात 12 सप्टेंबरला करेक्ट चाळीस वर्षांचा झालो तेव्हा लक्षात आलं की च्यायला अंगावरच्या जखमाच भरत नाहीयेत. साधं खरचटलं तरी आठवडाभर त्यातून पस बाहेर येतोय… हे काय नवीनच? मग डॉक्टरांनी शुगर असेल असा अंदाज काढला. लॅब मध्ये ब्लड टेस्ट, शुगर टेस्ट, LFT, KFT सर्व टेस्ट केल्या. सुदैवाने बाकी नॉर्मल आल्या तरी ब्लडने मात्र धोका दिला. निदान निघालं ब्लड इन्फेक्शन! बोंबला!
मग असंख्य अँटीबायोटिक वगैरे घेऊन इन्फेक्शन कंट्रोल मध्ये आणलं खरं… पण आता चाळीशीत एक नवीन गिफ्ट मिळालंय… हाय बीपी!
“मला काय होतंय?” या मानसिकतेपासून “काहीही होऊ शकतं” या मानसिकतेपर्यंत मी आता आलोय. 😅 आणि हा सगळा घटनाक्रम मागच्या अवघ्या सहा महिन्यातला आहे बरं का. सहा महिन्यात वक्त बदल गये, जजबात बदल गये…
करायला गेलो टीपी आणि घेऊन बसलो हाय बीपी. 😂
या काळात असंख्य एक्स रे, सिटी स्कॅन, एम आर आय, अनेक फिजिओथेरपी सेशन्समधून गेलोय. नॉर्मल पाण्यापेक्षा सलाईनचे पाणी शरीरात जास्त आहे. इंजेक्शन आणि टॅब्लेटस किती घेतले असतील याची गणतीच नाही.
माझे दोन्ही व्यवसाय ठप्प झाले. या सर्वातून बाहेर निघण्याची धडपड करतोच आहे. ही जिद्द माझी फॅमिली आणि तुम्ही सर्वजण मला देत आहात याबाबत आभारी आहे. अनेकांनी फोन मेसेज करून धीर दिला, मानसिक, आर्थिक मदत केली हे विसरू शकणार नाही. आयुष्यातला बॅड पॅच म्हणून हा काळ गृहीत धरतोय आणि लवकरच नवीन उभारी घेईन ही खात्री देतोय.
एकच सांगतो मित्र मैत्रिणींनो… पस्तिशीनंतर स्वतःच्या तब्येतीला जपा. ज्या चुका माझ्याकडून कळत नकळत झाल्या त्या तुम्ही करू नका. बीपी किंवा शुगर सारखे आजार कायमचे अंगाला चिटकवून घेऊ नका आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक 3 महिन्यांनी टेस्टस करत राहा.
-अनुभवातून आलेला शहाणपणा सांगणारा #अनुपानंद