- 70
- 1 minute read
महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद सप्टेंबर २०२५- महिला साहित्य संमेलन.
स्त्रीवादी चळवळीच्या पुनर्मांडणीची गरज असल्याचं प्रतिपादन,सानिया यांनी काल ‘महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदे’ने आयोजित केलेल्या ठाणे येथील ‘महिला साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदावरून बोलताना केलं.
आजकालचा भवताल सामाजिक ध्रुवीकरणाच्या दिशेने वेगात वाटचाल करत असतानाच दुसऱ्या बाजूने या वेगाला थोपवण्यासाठी सगळ्याच समुदायातील परिवर्तनवादी मंडळी आत्मपरीक्षण करत, स्वतःच्या कामाला मॉडिफाय करू लागलीत ही चांगली गोष्ट आहे..
1975 च्या जागतिक स्त्रीमुक्ती चळवळीचा आवाज ऐकून महाराष्ट्रात शारदाताई साठे, छायाताई दातार आदींच्या नेतृत्वाखाली जी स्त्रीमुक्ती चळवळ सुरु झाली
त्याला या वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने स्त्री मुक्ती संघटनेने जी जागृतीची कामे हाती घेतली आहेत त्यातील महत्वाचं काम म्हणजे महाराष्ट्रात ज्या ज्या स्त्रीवादी चळवळी- संघटना कार्यरत आहेत त्या सर्वांना साद घालून ‘महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद’हा प्लॅटफॉर्म तयार करत ‘स्त्रीवादी समाज परिवर्तना’साठी कृती – कार्यक्रम हाती घेणे.गेल्या तीन -चार महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणावर जागृतीचं काम करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून काल ठाणे येथे भरवलेलं विभागीय महिला साहित्य संमेलन….
महाराष्ट्र साहित्य परिषद सुकाणू समितीच्या, शारदाताई साठे,डॉ. प्रज्ञा दया पवार, स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या वृषाली मगदूम आदींच्या पुढाकाराने या साहित्य संमेलनाची आखणी झाली.काल जेव्हा प्रत्यक्ष हे देखणं संमेलन अनुभवता आलं तेव्हा त्यातील सर्वसमावेशक प्रतिनिधित्व नजरेत भरलं ही माझ्यासारख्या कार्यकर्तीसाठी अतिशय महत्वाची आणि आनंददायी गोष्ट!कारण कालच्या चित्रातून स्त्रीवादी चळवळीच्या पुनर्मांडणीला सुरुवात होत असल्याचं आश्वासक feeling येऊन गेलं.
संमेलनाच्या उदघाटन सत्रातच अगदी सुरुवातीपासून शारदाताई,उषाताई आत्राम, सानिया आणि प्रज्ञा दया पवार यांनी आपापल्या भाषणातून जी मांडणी केली, त्यातून स्त्रीवादी चळवळ मध्यमवर्गीय जाणिवा ओलांडून, आपला परीघ सर्वसमावेशक करण्याच्या मार्गाला लागलीय याची प्रचिती येत होती.उषाताई आत्राम यांच्याकडून आदिवासी समाजाचे प्रश्न ज्या पोटतिडकीने मांडले गेले,ते मांडायला पांढरपेशीय संमेलनातून कधी संधीच दिली जात नाही.काल इथे ते प्रश्न गांभीर्याने ऐकणारा समूह होता हेही महत्वाचं.अध्यक्ष म्हणून सानिया यांनी जी सर्वसमावेशकतेची मांडणी तीही अप्रतिम!प्रज्ञा दया पवार यांची तर नेहमीच व्यवस्थेच्या विरोधात टोकदार भूमिका असते. कालही तिच्या विवेचनातून हे जाणवलंच.. वृषाली मगदूम यांनी या सत्राचं संचलन केलं.
यानंतरच्या ‘पन्नास वर्षात मराठी साहित्यातील स्त्री चित्रण’ या परिसंवादात नीरजा, अश्विनी तोरणे, हिनाकौसर खान यांच्या मांडणीतून विविध स्तरातील स्त्रीचित्रणाची आजची वास्तवता आणि परिवर्तनासाठी भविष्यातील कोणत्या बदलांची गरज यावर विशिष्ट
समुदायांच्या प्रतिनिधी म्हणून सर्वांनीच नेटकी मांडणी केली. नवी दृष्टी देणारी ही मांडणी होती म्हणायला हरकत नाही.हे सत्र वृषाली विनायक हिच्या नेटक्या सूत्र संचलनाने देखणं झालं.
यानंतर अभिव्यक्तीस्वातंत्र्या वरील टॉक शो मध्ये इंदुमती जोंधळे, राही भिडे, चयनिका शाह,चिन्मयी सुमित. या सर्वांना शिल्पा कांबळे हिने त्यांच्या-त्यांच्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न विचारून छान पद्धतीने बोलतं केलं.राही भिडे यांनी व्यक्त केलेली मीडियामधील घुसमट आपण सर्व अनुभवतोच आहोत. ट्रान्स समुदाय, मराठी भाषा,विशिष्ट धर्म हे घटक आणि अभिव्यक्ती यांचे संबंध यावर इथे चांगलीच चर्चा झाली. वेगळा दृष्टिकोन मिळाला.
यानंतरचं बहारदार सत्र होतं कविसंमेलनाचं. किती वेगवेगळ्या बाजाच्या कविता!नीलम माणगावे पासून ते शारदा नवले, छाया कोरेगावकर, सुरेखा पैठणे, लक्ष्मी यादव, विद्या भोरजारे, वैभवी अडसूळ, संध्या लगड अशा वेगवेगळ्या समुदायांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या तीन पिढ्यातल्या कवयित्री परिवर्तनाचा सूर घेऊन जणू ‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा..’असाच संदेश देत होत्या. कविता मोरवणकर या कवयित्रीचं संचलन आणि अध्यक्ष प्रज्ञा दया पवार हिचं कविता सादरीकणासह, बदलाचा संदेश देणारं समारोपीय भाषण याने या सुंदर संमेलनाची सांगता झाली..
खूप आनंद देणाऱ्या या एका दिवसात कितीतरी मैत्रिणी भेटल्या, ज्या आम्ही गेली अनेक वर्षे भेटू शकलो नव्हतो. यात उषाताई आत्राम,दिल्लीच्या अनिता भारती, कुसुम त्रिपाठी या प्रमुख.अजून मुंबईतील उमा दीक्षित, कुंदा प्र. नि., राही भिडे, श्यामल गरुड, अनुराधा रेड्डी… कितीजणींची नावं घेऊ?
खूपजणी भेटल्या.. नेहमीच ‘माणूस’बनून परिवर्तनाच्या सुरात एकमेकींना बंधू पाहणाऱ्या ‘ आम्ही भारतीय .
Ashalata Kamble