मुंबई : फक्त एक पाऊस झाला आणि आणि मुंबईची तुंबई झाली. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बीएमसीवर ट्विट करून निशाणा साधला आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बीएमसीला वर्षानुवर्षे लुटले आणि भ्रष्टाचाराने तिला पोखरून टाकली आहे. तसेच, त्यांच्या सामूहिक भ्रष्टाचाराचा, दुर्लक्षितपणाचा आणि नाकर्तेपणाचा परिणाम म्हणजे रस्त्यांवरील खड्डे, बेकायदा होर्डिंग्ज आणि मुंबईतील पूर असा झाला असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
आंबेडकर यांनी व्यवस्थेला जाब विचारताना म्हटले आहे की, मुंबईत दरवर्षी पाऊस पडतो. मग वर्षानुवर्षे पावसाच्या व्यवस्थापनासाठी बीएमसी कशी तयार नाही ? BMC दरवर्षी अनभिज्ञ का समजली जाते? पूर व्यवस्थापनासाठी BMC ला आजपर्यंत दिलेल्या 1000 कोटी रुपयांचे काय झाले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
बीएमसीला याची पर्वा नाही! कारण या लुटारूंच्या अक्षमतेची आम्हाला पर्वा नाही आणि त्यांच्याकडून आम्ही जवाबदारी मागत नसल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आंबेडकर यांनी म्हटले आहे की, जून महिन्यात, बीएमसीने जयभीम नगर, पवई येथील झोपडपट्टी पाडली, ज्यामुळे 700 हून अधिक कुटुंबे बेघर झाली. या पावसात छप्पर नसलेल्या कुटुंबांची कल्पना करा. असं म्हणत त्यांनी BMC च्या कारभारावर हल्ला चढवला.