• 77
  • 1 minute read

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

मला लहानपणापासूनच पुस्तकांची प्रचंड आवड. वडिलांनी घरात एका रॅक वर पुस्तके रचून ठेवली असायची. तीच माझी सर्वात पहिली संपत्ती. रॅक साफ करणे, जी काही थोडी पुस्तके होती त्यांना झटकून पुन्हा व्यवस्थित लावणे आणि सुट्टीच्या दिवशी वाचत राहणे हा माझा दिनक्रम ठरलेला. हळू हळू पुस्तके वाढत गेली आणि जिथे जिथे माझी बदली होत गेली, ही पुस्तके माझ्या बरोबर फिरू लागली. नाशिक ला स्थिरस्थावर झाल्यावर मात्र घरी पुस्तकांचे लाकडी कपाट मुद्धाम बनवून घेतली. सुट्टीच्या दिवसांत, पुस्तकांना कव्हर लावणे (हे कागद नाशिकच्या होलसेलर दुकानातून इतके विकत घेतले की त्याचा सगळं स्टॉक संपला),विषयावर पुस्तक लावून ठेवायला आवडते. टूर वर जाताना एखादे पुस्तक न्यायचो मात्र येताना 10-15 पुस्तकांचा गठ्ठा हमखास यायचा…

माझ्या या पुस्तकांमध्ये कुठला धर्म आडवा येत नाही की कोणती कोती मानसिकता! कुराण, भगवद गीतेला खांदा देते, आणि कांनींघमला साथ द्यायला हुयान त्संग आहे….धम्मपद आणि बायबल देखील हितगुज करतात ज्ञानेश्वरी आणि ओशो बरोबर! राहुल संकृत्यायान असतात अश्वघोष आणि असंग बरोबर..कबीर ही आहेत उपनिषदांबरोबर, गोनिदा बोलतात नामदेव ढसाळांबरोबर आणि ‘अक्करमाशी’ साथ देते ‘मला उध्वस्त व्हायचे’, विवेकानंद आहे धम्मापालांबरोबर तर शेक्सपियर असतो कुसुमाग्रजांबरोबर…संपूर्ण आ ह साळुंखे आहेत एका कप्प्यात…! गौरवचे “साखळीचे स्वातंत्र्य” सल्लामसलत करतात Buddhist Economics बरोबर, Carl Sagan असतो आचार्य नागर्जूनांच्या शून्यावादा शेजारी! रशियाचे Defence Missile Technology हितगुज करतात अभिधम्माशी तर विविध देशांतील भाषांचे धम्मपद आपसात चर्चा करतात भाषांतरातील त्रुटींवर! बाबासाहेबांच्या विचारांचे एक वेगळे कपाट आहे, तर समग्र ज्योतिबा फुले कानगोष्टी करतात राजर्षी शाहू महाराजांबरोबर! काणेंचे धर्मशास्त्र शोध घेते आचार्य नरेंद्र देवांच्या बौद्ध धर्मदर्शनचे! सुरेश भटांचा एल्गार साथ देतो गालिबला….पालि आणि संस्कृत भाषेचे व्याकरण ‘संधी’ साधत एकमेकांना खेटून उभी आहेत…. संविधानाच्या मूळ हस्तलिखिताची रंगीत मुद्रित प्रत दिमाख्याने उभी आहे या सर्वांना कवेत घेऊन!

मजा असते पुस्तकांच्या दुनियेत….पुस्तके वाचायला आणि जमवायला सुरू केली नसेल तर सुरुवात करा…ज्ञान हे एखाद्या अथांग महासागरासारखे आहे…. आपली काही बोटं त्यात भिजवली तरी आयुष्य आंतर्बाह्य बदलून जाईल….

-अतुल भोसेकर

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *