‘ऑनर किलिंग’साठी ‘सैराट’ हा परवलीचा शब्द बनून प्रत्यही वारंवार घडू लागलेल्या उमलत्या वयातील तरूणाईच्या हत्या सवयीचा भाग होऊन एक सामाजिक बधिरता येऊ घातलीय.
समाजमाध्यमात अशा हत्यांचे समर्थन करण्यापर्यंत काही लोक गेले आहेत, याचे आश्चर्य वाटायला नको. कारण, कुठलाही सामाजिक अपराध हा त्या समाजातील लक्षणीय संख्येच्या सुप्त इच्छेचा अविष्कार असतो. उदाहरणार्थ, दलित-मुस्लिम व स्त्रियांवरील अत्याचार हे समाजात खोलवर रुजलेल्या दलित-मुस्लिम व स्त्रियांच्या द्वेषाचे प्रक्षेपण असते.
अशा हत्या झाल्या की उमटलेला निषेधाचा सूर हवेत विरुन जातो व उपायांचे कुणीही बोलत नाही.
खरेतर जातीबाहेर लग्ने आता लक्षणीय संख्येने होऊ लागली आहेत. फक्त ती दलित-सवर्ण अशी झाली की स्फोटक बनतात. सवर्णासवर्णात झाली तर स्वीकारली जातात.
ही बहुतांश तरूणाईने स्वतः ठरविलेली लग्ने असतात. ती मुख्यत: दोन प्रकारची असतात. एक, फिल्मी प्रेमाच्या प्रभावातील सवंग प्रकार तर दुसरा परिचयोत्तर एकमेकांना अजमावत थोडा प्रगल्भ जाणीवेचा प्रकार. पहिला प्रकार अतिव भावनिकच असल्याने कालांतराने कलहाचा विषय होतो. तर दुसरा प्रकार प्रगल्भतेमुळे यशस्वी होतो.
आजच्या घडीला, हा दुसरा म्हणजे परिचयोत्तर विवाह प्रकार सर्वोत्तम आहे. त्यात जातीचा विचार प्राधान्याने येत नसल्याने गळून पडतो व तो खऱ्या अर्थाने दोन समंजस जीवांनी घेतलेला सहजीवनाचा निर्णय ठरतो.
ही परिचयोत्तर विवाहाची संकल्पना अधिक विस्ताराने समजून घेऊ पुढील लेखात.