/ संविधानातील “बंधुता” या तत्वाची मुळे, ही मानवतावादी तत्वज्ञानामध्ये आहेत. बंधुतेचे तत्व हे लोकांच्या पारस्पारिक संबंधांच्या विचार विनिमयाचे एक असे तत्व आहे की, ज्यामुळे लोकांमध्ये प्रेम आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत होते.
संविधानातील “बंधुता” या तत्वाची मुळे, ही मानवतावादी तत्वज्ञानामध्ये आहेत. बंधुतेचे तत्व हे लोकांच्या पारस्पारिक संबंधांच्या विचार विनिमयाचे एक असे तत्व आहे की, ज्यामुळे लोकांमध्ये प्रेम आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत होते.
महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-५०
‘समता (Equality)’, नंतर डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक मानवतावदाचा, ‘बंधुता (Fraternity)’’, हा तिसरा आधार आहे. बंधुता ही वैयक्तिक प्रवृत्ती आणि सामाजिक व्यवहाराचा एक भाग आहे. व्यवहारात आत्म-संयम, स्वार्थी कार्यावर प्रभावी निर्बंधाची आवश्यकता आहे. ज्यामुळे सामाजिक व्यक्ति सामाजिक सुदृढतेच्या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी समर्थ होऊ शकेल. प्रत्येक व्यक्तीकडून अशी अपेक्षा, ‘बंधुता’, हे तत्व करीत असते. प्रत्येकाने संपूर्ण समाज व राष्ट्राविषयी आपलेपणाची भावना बाळगली पाहिजे. बंधुता या तत्वाच्या आदर्शामध्ये एक भावनात्मक दृष्टिकोण अंतर्भूत आहे की, ज्याचे लक्ष हे लोकांना आपुलकीच्या संबंधामध्ये गोवणे हे आहे.
संविधानातील बंधुता या तत्वाची मुळे ही मानवतावादी तत्वज्ञानामध्ये आहेत. हा एक सकारात्मक सिद्धांत असून, मानवाबाबतच्या प्रेमावर आधारित आहे. सर्व मानवांमध्ये प्रेम आणि मैत्रीची भावना हा बंधुत्वाचा अर्थ आहे, ज्याच्या आधारावर सर्व लोकं मिळून शांतीने राहतात. देशामध्ये एकतेची भावना ही बंधुतेमुळे निर्माण होते. भारतीय राज्यघटनेचे स्वातंत्र्य आणि समता या दोन तत्वांबरोबरच “बंधुता’ हे एक महत्वाचे तत्व आहे. बंधुता या शब्दाचा अर्थ स्पष्ट करतांना बाबासाहेब म्हणतात की, “बंधुताचा अर्थ सर्व भारतीयांमध्ये आपलेपणाची भावना होय. बंधुता हे असे तत्व आहे की, जे सामाजिक जीवनास एकता आणि सुदृढता प्रदान करते. बंधुता हे तेव्हाच एक तथ्य बनू शकेल, जेव्हा ते एक राष्ट्र असेल. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समतेला अर्थ नाही”. बंधुत्वाचा आदर्श एकात्मतेच्या चेतनेला सुदृढ करतो. त्याशिवाय कोणतेही राष्ट्र जीवंत राहू शकत नाही. कोणत्याही समुदायास संघटीत करणारी बंधुता, हे एक महान तत्व आहे. त्यामुळेच, बाबासाहेबांनी बंधुतेचे तत्व सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवहाराकरिता एका मार्गदर्शकाच्या रूपात भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केले आहे.
सामाजिक गतीशीलतेचा बंधुता या तत्वाशी घनिष्ट संबंध आहे. बाबासाहेब या संदर्भात स्पष्ट करतात की, “आदर्श समाज गतिमान असावा. संपूर्ण समाजाने जाणीवपूर्वक एक दुसऱ्याला हातभार लावावा, असे हितसंबंध आदर्श समाजात असावेत. इतर प्रकारच्या सामाजिक संस्थांशी संबंध ठेवण्यासाठी अनेक प्रकारची आणि सुलभ अशी व्यवस्था असावी. दुसऱ्या शब्दात, सामाजिक एकसूत्रीकरण झाले पाहिजे. हीच बंधुता आहे”.
थोडक्यात, बंधुतेचे तत्व हे लोकांच्या पारस्पारिक संबंधांच्या विचार विनिमयाचे एक असे तत्व आहे की, ज्यामुळे लोकांमध्ये प्रेम आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत होते. बंधुता ही राष्ट्रांशी संबंधीत आहे. एकराष्ट्र याचा अर्थ राष्ट्रातील सर्व लोकं बंधुभावाने राहतात असा आहे. . बाबासाहेब आंबेडकरांच्या बंधुतेच्या तत्वामध्ये व्यक्तीवाद आणि समाजवाद, राष्ट्रवाद आणि मानवतावाद आणि भौतिकवाद यांच्या समन्वयाचा समावेश असल्याचे आढळून येते.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)