- 49
- 1 minute read
सत्तेच्या भिकेवर खुश होणाऱ्यांना, गुलामीच्या बेड्याही आवडू लागल्या!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 41
सत्तेच्या भिकेवर खुश होणाऱ्यांना, गुलामीच्या बेड्याही आवडू लागल्या!
मनुस्मृती ज्यास आपण मनुवाद म्हणतो त्याचे खरे स्वरूप जातीच्या नावाने माणसाचे विभाजन. वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून या मनुवादने इथल्या माणसांचे विभाजन केले. त्याला गुलाम बनवित असताना अनटचेबल व निर्धन केले. शूद्र व अतिशूद्र हा गुलाम वर्ग याच मनु व्यवस्थेने निर्माण करून माणसाच्या सर्व प्रकारच्या शोषणाची व्यवस्था निर्माण केली. या अमानवी व्यवस्थेला तोडण्याचे, गाडण्याचे काम अनेकांनी केले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक न्याय आंदोलनाने या मनुवादी व्यवस्थेला खिळखिळी करून तिला मुळासकट उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. अन संधी मिळताच संविधानाच्या माध्यमातून तिला पूर्णपणे उखडून ही टाकले.आज याच संविधानाच्या सर्व चौकटी उखडून हिंदू राष्ट्राच्या नावाखाली मनुवादी व्यवस्था स्थापित करण्याचा प्रयत्न संघ, भाजपच्या माध्यमातून करीत आहे. पुन्हा शुद्रादिशुद्र व्यवस्था निर्माणाचा अजेंडा संघ या देशात राबवित असून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्त केलेल्या जातीचे नेतेच सहकार्य करीत आहेत. आपल्या गुलामगिरीचे फास अन बेड्यात स्वतःच अडकत आहेत, हे अतिशय दुर्दैवी व प्रतिक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सावरकर यांची या राष्ट्रा विषयची भूमिका लपून छपून राहिलेली नाही. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून हा देश स्वातंत्र्य व्हावा, असे संघाला अन सावरकरांना वाटत नव्हते. अन झाला तरी नेहरू, गांधी अन विशेष करून स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नांतील भारत उभा राहू नये, अशी सरळ व जाहीर भूमिका संघ व सावरकरांनी उघडपणे घेत आपला हिंदू म्हणजे ब्राह्मणी राष्ट्राचा अजेंडा जाहीरपणे मांडला व त्यावर काम ही सुरु केले. आज याच फॅसिस्ट शक्तिच्या हातात देशाच्या सत्तेची सूत्रे आहेत. या देशाच्या सर्व नागरिकांच्या न्याय, हक्क व अधिकाराची सनद असलेले संविधान ही याच शक्तीच्या हाती आहे. अन त्याची तोडफोड राजरोसपणे सुरु आहे. ते बदलून मनुस्मृतीच्या कायद्यावर देश चालविण्याची योजना ही त्यांच्याकडे तयार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असते, तर एव्हाना हिंदू राष्टाची घोषणा ही झाली असती. अन मनुस्मृती कायद्याच्या अंमलाखाली हा देश ही आला असता. हे सारे लिहिण्याचा अर्थ संघ व भाजपला बदनाम करण्याचा नक्कीच नाही. हेच घडले असते. अन हेच संविधानावर निष्ठा असलेल्या जनतेला कळल्यामुळे या जनतेने भाजपला पूर्ण बहुमतापासून रोखले.
मोदींच्या नेतृत्वाखाली संघ या देशाशी जाहीरपणे द्रोह करायला ही तयार आहे. मात्र हा द्रोह फसला तर ??? संघ संविधानावर निष्ठा असलेल्या हिंदूंची पण सहानुभूती हारवून बसेल. ही भिती संघाला आहे. त्यामुळे तो सावध पावले उचलत आहे. संघ व भाजपला मिळणारी मतांची टक्केवारी 30 ते 32 टक्क्याच्या पुढे जाताना दिसत नाही. अन महत्वाचे म्हणजे यामध्ये काँग्रेस व विरोधी पक्षांच्या विरोधात असणाऱ्या मतांचा ही समावेश आहे. भाजपला मिळालेली मतं हिंदू राष्ट्रासाठी मागितल्याने मिळालेली नाहीत. संविधानाला विरोध करीत हिंदू राष्ट्रासाठी भाजपने मते मागत निवडणुकीच्या मैदानात उतरावे म्हणजे संघ व भाजपला त्यांची खरी औकात कळेल. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या ही जागा निवडून आणता येणार नाहीत. संविधानाला हात लावणार नाही, हे सांगत कौल मागायचा व सत्तेवर येताच संविधान बदलाच्या बाता मारायच्या हा धंदा संघ, भाजपचा आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना स्वाभिमानाने जगायला शिकविले त्यांच्यातील काहींना हा धंदा समजत नाही. सत्तेच्या मिळणाऱ्या भिकेवर ते इतके खुश आहेत की, गुलामीच्या बेड्या ही त्यांना आवडू लागल्या आहेत. त्यामुळे अशा भिकारी नेत्यांची एक फौज तयार करून या फॅसिस्ट शक्तींनी त्यांना आपल्या दावणीला बांधले आहे. भाजपसोबत असलेल्या आंबेडकरी पक्ष व नेत्यांच्या यादीवरून नजर फिरवली तर हे स्पष्ट दिसते.
15 लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार, 400 रुपयाला घरगुती गॅस देणार, 2 करोड बेरोजगार तरुणांना रोजगार देणार, शेतकऱ्यांना हमी भाव देणार, महिलांना सुरक्षितेची हमी देणार, महागाई कमी करणार अन आरक्षणाला हात लावणार नाही, या साऱ्यांची गॅरंटी देत मत मिळवून सत्तेवर येताच या साऱ्यांना जुमला म्हणणारी भाजप पुन्हा – पुन्हा सत्तेवर येतेच कशी ? हा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर आहे, मत विभाजन…! भाजप आपल्या कामाच्या आधारावर मत मागत नाही. अथवा त्यावर निवडून ही येत नाही. संघ, भाजपच्या धर्मांध राजकारणाला ही जनता विटली आहे. आता भाजप निवडून येत आहे, ते फक्त मत विभाजनाच्या फार्म्यूल्यावर. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यात भाजपने वंचित, बसपा व एमआयएम यासारख्या बी टीम यासाठी तयार केल्या आहेत. ज्या सेक्युलर मतांमध्ये विभाजन करतात. याचा फायदा भाजपला होतो. 2019 व 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालावरून नजर टाकली, तर हे स्पष्ट होते. त्याशिवाय या बी टीम स्वतः ही याबाबतचा दावा करतात. आमच्यामुळे भाजपच्या विरोधातील अमुक अमुक इतके उमेदवार पडले. हा त्यांचा दावा असतो. अन हे काम ते येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत करीत आहेत. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ही हेच होत आहे.
राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट भाजप, शिंदे सेनेसोबत आहेत. तर बसपा, बसपापासून विभक्त झालेल्या नेत्यांचे बहुजनवादी पक्ष, वंचित व वंचितपासून वेगळे झालेल्या नेत्यांनी सेक्यूलर मतांमध्ये विभाजन करण्यासाठी अनेक आघाड्या या निवडणुकीच्या तोंडावर उभ्या केल्या आहेत. या साऱ्यांना एक तर सरळ भाजपची मदत अन पाठबळ आहे. अथवा स्थानिक उमेदवार या आघाड्यांच्या उमेदवारांना सांभाळत आहेत. हे चित्र राज्यभर दिसत आहे. या आंबेडकरी पक्षांच्या आघाडीचे 700 उमेदवार तर बौद्ध समाजातील शेकडो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून निवडून येणे नाहीतर मत विभाजन करणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे.
सत्तेच्या भिकेसाठी आपल्या सोबत असलेल्या रिपब्लिकन नेत्यांपेक्षा बी टीम व सेक्युलर मतांमध्ये विभाजन करणाऱ्या विविध आघाड्यावर भाजप व मित्र पक्षांची भिस्त असून त्यांना ते जपत आहे. हे भाजपच्या व्यवहारावरून दिसत आहे. असे असले तरी लोकसभेप्रमाणेच या निवडणुकीत ही जनताच संघ, भाजपसारख्या फॅसिस्ट शक्ती विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकीचा निकाल निवडणुका जाहीर होताच महाविकास आघाडीच्या बाजूने लागला आहे. हे सांगण्यासाठी आता निवडणूक तज्ञाची गरज राहिलेली नाही.
………….
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
0Shares