सर! तुम्ही कितीही पटवून सांगा आता तुमचे पटतच नाही मला तुमच्या शब्दांचा रोख उजागर करतो तुमच्या मेंदूतले कुटील कारस्थानं अन् तुम्हाला सांगू का? नाही! तुम्ही म्हणत असाल तर मी सांगून टाकतो एकदाचे
सर! आता काळ खूप बदलला आहे म्हणून जाणव्यातल्या जीर्ण जाणीवा थोडी बाजूला ठेवून आले पाहिजे तुम्ही माणसांच्या जगात प्रायश्चित्त म्हणून!
सर! तुमचा तो दंडुकेशाहीचा काळ संपला आम्हाला जोहरा घालायला लावणारा आता काळ आमच्या बाजूने ऊभा आहे आमच्याच इशाऱ्यावर करतो तो चाल! म्हणून तुम्ही तुमची चाल सोडली पाहिजे
सर! जर तुम्ही बदलत नसाल तुम्ही पुन्हा करत असाल मनुला जिवंत तुमच्या लबाडीने तर तुम्ही लुप्त पावाल डायनॉसॉरसारखे तुमचे अवशेषही विसर्जित करतील लोक काळाच्या प्रवाहात कायमचे
सर तुम्ही काल म्हणाला मला मी विष घेऊन फिरतो डोक्यात हे तर असे झाले की कसायनेच करावे प्रवचन अहिंसेवर! एकूण हास्यास्पद हे सारे!
सर! हे जग अजिबात नाही आपल्या घराच्या कंपाऊंडएवढे अन् आपल्या चष्म्याच्या फ्रेमइतके नाही संकीर्ण ज्ञानही! हे टाळक्यात भरून घ्या!
सर! तुम्हाला सांगून टाकतो तुम्ही थांबवू शकत नाही आमचा उजेडाचा उत्सव कारण कालचे सर्वच काजवे आज सूर्य झाले आहेत !