अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रेरिकांनाही भाऊबीज मिळावी महाराष्ट्र श्रमिक सभेची मागणी
मुंबई, १० : अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रेरीकांना (सीआरपी) दिवाळी भाऊबीज भेट देण्याची मागणी महाराष्ट्र श्रमिक सभा या संघटनेने केली आहे.
बचत गटांची चळवळ राज्यभर पसरली असून या गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी उमेद अभियानाअंतर्गत सरकारने प्रेरीकांची (सीआरपी) नियुक्ती केली आहे. या प्रेरीकांना राज्य सरकारतर्फे अवघे ६,००० रुपये मानधन देण्यात येते. त्यातही विविध कारणे पुढे करून कपात करण्यात येते.
राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतीस यांच्या मानधनात लक्षणीय वाढ केली आहेच, शिवाय त्यांना दिवाळीत भाऊबीज भेट म्हणून दरवर्षी दोन हजार रुपये देण्यात येतात. यावर्षीही अशी भाऊबीज देण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे.
अंगणवाडी सेविकांप्रमाणेच प्रेरीकांचे कामही महत्वाचे आहे. बचत गटातील महिलांमध्ये उद्योजकता निर्माण करण्याचे काम प्रेरीका करीत असतात. अगदी गावविकासाचा आराखडा तयार करण्यातही त्यांचा सहभाग असतो.
त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या बरोबरीने त्यांना मानधन मिळावे, तसेच दिवाळीला भाऊबीज भेट मिळावी, अशी महाराष्ट्र श्रमिक सभेची मागणी आहे. समाजातील सर्वच घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महोदय प्रेरीकांनाही आपण न्याय द्याल, असा विश्वास आहे.
यावाबत दिवाळीपूर्वी निर्णय व्हावा, अन्यथा राज्यभरातील प्रेरीकांना आपल्या मागण्यांसाठी ऐन दिवाळीत आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे महाराष्ट्र श्रमिक सभेचे अध्यक्ष प्रभाकर नारकर व सरचिटणीस केतन कदम यांनी म्हटले आहे .