अनेकांचा असा समज आहे की सामाजिक विषय आणि आर्थिक, वित्तीय विषय हे जणुकाही वॉटर टाइट कंपार्टमेंट मध्ये कार्यरत असतात. आर्थिक /वित्तीय प्रश्नांवर काम करणाऱ्यांना सामाजिक प्रश्न समजून घेण्याची गरज नसते. आणि सामाजिक कार्यकर्ते वेगळे, ज्यांनी जनतेच्या आर्थिक / वित्तीय प्रश्नांचा अभ्यास करण्याची गरज नसते. खरेतर तर तसे नाहीये. कधीही नव्हते. भारतासारख्या देशात तर खचितच नाही.
_____
आपल्या देशांत कोट्यावधी नागरिकांवर धार्मिक, जातीय समाजांचा, अंधश्रद्धांचा पगडा आहे. धार्मिक, जातीय रूढी पाळल्या नाहीत तर आपले काहीतरी गंभीर बरेवाईट होईल अशी भीती त्यांना घातली गेली आहे. ती भीती कमी न होता अजून वाढत आहे. वाढवली जात आहे.
त्याचे एक महत्वाचे कारण प्रचलित अर्थव्यवस्था देखील आहे. ज्यात प्रौढ स्त्री-पुरुष प्रचंड अनिश्चितता आणि तणावाखाली जीवन कंठत असतात. मानसिक संतुलन ठेवणे कठीण होऊन बसते. ते सहज बळी पडू शकतात. फक्त दोन क्षेत्रे, मुलांची शिक्षणे आणि आरोग्य याबाबतीत सार्वजनिक स्त्रोतांतून प्रौढ स्त्री-पुरुषांना हमी मिळाली तर त्यांचे निम्मे टेन्शन कमी होऊ शकते. म्हणून आर्थिक तत्त्वज्ञान महत्वाचे.
प्रतिसाद देत अनेक प्रौढ स्त्री पुरुष जन्म, मृत्यू , विवाह, निरनिराळे सण, बोललेले नवस यावर बराच खर्च करत असतात. खिशात किंवा साठलेले पैसे नसतात. मग त्यासाठी कर्जे काढतात. ती त्यांच्या मासिक / वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत नेहमीच जास्त असतात. ती त्यांना अनेक वर्षे फेडत रहावी लागतात. न फेडता आल्यामुळे नवीन कर्जे काढावी लागतात. एका दुष्ट चक्रात अडकतात ते.
गेली शेकडो वर्षे कोट्यवधी गरिबांच्या कमी न होणाऱ्या कर्जबाजारीपणाच्या अनेक प्रमुख कारणांपैकी एक आहे अनेक अंधश्रद्धेमधून त्यांनी धार्मिक विधीवर केलेले न झेपणारे खर्च.
गाडगे बाबांपासून अनेक संतांच्या शिकवणी “सामाजिक” सदरात घातल्या जातात. पण त्यापैकी अनेकांनी आर्थिक, भौतिक, वित्तीय शिकवणी दिल्या आहेत. वायफळ खर्च करू नका, कर्मकांडावर खर्च करू नका, आपल्या मिळकतीचे अंथरूण पाहून खर्चाचे हातपाय पसरा, मुलांना शिकवा, कर्जे काढू नका इत्यादी.
_____
आपल्या देशात वित्तीय साक्षरता / फिनान्शियल लिटरसीचा प्रचंड बोलबाला आहे. अक्षरशः शेकडो कोटी रुपये या मोहिमांवर खर्च होत असतात.
पण यापैकी कोणत्याही मोहिमेत गरिबांमधील धार्मिक रूढी किंवा अंधश्रद्धा यावर काहीही बोलले जात नाही. झेपतील तेव्हढीच कर्जे काढा असे स्पष्टपणे हे या मोहिमा सांगणार नाहीत. कारण आजच्या वित्त भांडवलाला कोट्यवधी गरिबांमध्ये लाखो कोटींची कर्जे पाणी मुरवावे तशी मुरवायची आहेत.
राहणीमानाच्या आकांक्षा आपल्या आर्थिक कुवतीच्या मर्यादेत ठेवा असे ते सांगणार नाहीत. कारण कोट्यावधी कुटुंबांनी सतत निरनिराळा औद्योगिक माल विकत घ्यावा हेच त्यांचे मिशन आहे.
______
खरेतर शुद्ध आर्थिक / शुद्ध वित्तीय असे काही अस्तित्वात नसते; मानवी समाजाच्या बिगर आर्थिक / बिगर वित्तीय अंगाशी त्यांचा जैव संबंध असतो , ही धारणा धारण करणे महत्वाचे आहे. गरिबांमध्ये, विशेषता गरीब स्त्रियांमध्ये, काम करणाऱ्या सर्वांनी आर्थिक / वित्तीय विषय समजून घेण्यासाठी वेळ काढावा.
पुन्हा एकदा डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतींना अभिवादन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक मुळे पकडू दे ही सदिच्छा.
संजीव चांदोरकर (२१ ऑगस्ट २०२५)