- 250
- 1 minute read
अजित पवारांनी सहकार क्षेत्र मोडीत काढून कवडीमोल भावाने खरेदी केले १३ साखर कारखाने….!
...... अन् आता व्हेंटिलेटर असलेल्या सहकार क्षेत्राची पवारांना चिंता...
राज्यातील सहकारी क्षेत्रा विषयी शरद पवारांनी नुकतीच चिंता व्यक्त केली. हे क्षेत्र सध्या व्हेंटिलेटर असल्याने त्याची चिंता होणे ही गरजेचे आहे. त्या चिंतेच्या चर्चेला पवारांनी तोंड फोडले हे बरेच झाले. पूर्वी राज्यात ८० टक्के सहकारी आणि २० टक्के खाजगी क्षेत्र असे चित्र असायचे. मात्र आता ५० % टक्क्यांहून अधिक खाजगी साखर कारखाने उभे आहेत. ज्यांनी सहकारी साखर कारखाने बुडीत काढले त्यांनीच ते कारखाने खाजगीरित्या विकत घेतले. सहकार क्षेत्रा विषयी चिंता व्यक्त करताना शरद पवारांनी हे स्पष्टपणे सांगितले. यात 100% टक्के सत्यता आहे. कारण हे सर्व शरद पवारांच्याच देखरेखीखाली झाले आहे. देशाचे कृषीमंत्री आणि राज्यातील सत्तेवर, सहकार क्षेत्रावर पवार व कुटुंबाची हुकमी सत्ता असताना सहकारी साखर कारखाने भ्रष्टाचार, पैशाची अफरातफर करून पहिल्यांदा त्यांना आजारी पाडले, नंतर ते कवडीमोल भावाने स्वतःच विकत घ्यायचे, हा उद्योग पवार कुटुंबियांचाच. राज्यातील अशा आजारी साखर कारखान्यांची संख्या 65 पेक्षा अधिक असून एकट्या अजित पवारांनी 13 कारखाने विकत घेतले आहेत. शरद पवार यांच्या आशीर्वादाने व नेतृत्वाखाली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि शिखर बँकेचे अध्यक्षपद सांभाळत असतानानाचा हा खरेदी विक्रीचा व्यवहार आहे.
राज्यातीलच नव्हेतर आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे 1950 साली पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व गाडगीळ यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीने उभा केला. या कारखान्याची मालकी सभासद शेतकऱ्यांकडे होती. तसेच शेतकऱ्यांचे प्रशासनच हा कारखाना चालवित होते. 1969 मध्ये शंकरराव मोहिते पाटील पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे असाच एक सहकारी साखर कारखाना सुरू केला. या सहकारी कारखान्यांमुळे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्नाचा स्त्रोत मिळाला, यामुळे कृषि क्षेत्रात व शेतकरी वर्गात सुबत्ता आली. यामुळे बँका आणि शिक्षण क्षेत्राचा विकास झाला. पुढे विठ्ठलराव विखे पाटील व शंकरराव मोहिते पाटील यांचा आदर्श घेवून राज्यभर सहकारी साखर कारखाने, बँका अन् शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. सहकारी क्षेत्राने शेतकऱ्यांची गरिबीची दूर केली. सुबत्ता आली व राज्याची प्रगती झाली. याच सहकारी क्षेत्राच्या जोरावर महाराष्ट्र देशात नेहमीच नंबर एकवर राहिला.प्रगतीशील राज्याचा किताब नेहमीच राज्याच्या शिरपेचात राहिला.
सहकारी क्षेत्र म्हणजे केवळ सहकारी साखर कारखाने नव्हेत, तर सहकारी बँका, पुढे शिक्षण संस्था, दूध संघ व कृषि उत्पन्न बाजार समिती अशा विविध अंगाने हे क्षेत्र विकसित होत गेले. या विकसित क्षेत्राने मग राज्यातील राजकीय क्षेत्रावर ही आपला प्रभाव पाडला. ज्याच्या हाती सहकार क्षेत्राच्या नाड्या त्यांच्याच हाती महाराष्ट्राच्या सत्तेचे सूत्रे, हेच सूत्र झाले. नेमके याच वेळी शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व राज्याला मिळाले. मग त्यांनी राज्याच्या सत्तेवरच नाहीतर या सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, या बँकांची शिखर बँक, शिक्षण संस्था, दूध संघ, कृषि उत्पन्न बाजार समित्या या सर्वांवर कब्जा करायला सुरुवात केली. कब्जा होताच सभासद शेतकऱ्यांच्या हितापेक्षा राजकारणासाठी अधिक वापर मग या क्षेत्राचा होऊ लागला. तसा शेतकरी देशोधडीला लागला. शरद पवारांच्या राजकारणाचा चढता आलेख जसा सुरू झाला, तसा या क्षेत्रातील अनागोंदी कारभार वाढला. भ्रष्ट्राचार वाढला. मग पवार कुटुंबातील दुसरी पिढी अजित पवाराच्या रूपाने सत्तेच्या राजकारणात पुढे आली व हे क्षेत्रच त्यांनी अगदी मोठ्या पवारांच्या नजरेसमोर धुवून खाल्ले.
राज्याचे राजकारण नियंत्रित करण्याची क्षमता या क्षेत्रात असल्यामुळे हे क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी निवडणुकीच्या वेळी शेतकरी सभासदांची खरेदी विक्री सुरू झाली. कारखाना, बँक, शिक्षण संस्था, बाजार समिती अथवा दूध संघ ताब्यात आल्यावर त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार सुरू झाला. या संस्थेच्या नफ्यावर संचालकांची ऐयाशी सुरू झाली. अन पुढे यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वकांक्षी म्हणून उभे राहिलेले सहकारी साखर कारखाने बुडीत काढून ते खाजगीरित्या विकत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्यावर आता नुकतीच शरद पवारांनी चिंता व्यक्त केली.
सहकारी साखर कारखान्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा, संचालकांना गाड्या, बंगले द्यायचे, कारखान्यांच्या पैशाने विदेश दौरे करायचे. यामुळे कारखाने बुडीत निघतील व ते बुडीत निघाले की किरकोळ व कवडीच्या भावाने विकत घ्यायचे. हे या राज्यकर्त्यांचे धोरण. बर हे सर्वच राज्यकर्ते शरद पवार साहेबांच्याच तालमीत तयार झालेले आहेत. अजित पवारांना तर घरातूनच बाळकडू मिळाले आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्हा बँका, त्या बँकांची शिखर बँक, बाजार समित्या, शिक्षण संस्था आदी सर्व ठिकाणी लुटमार चालविली आहे. आतापर्यंत त्यांनी 13 सहकारी साखर कारखाने विकत घेतले असून ते त्यांनी शरद पवारांसोबत असताना त्यांच्या नजरेसमोर विकत घेतले आहेत.
आजारी व बुडीत सहकारी साखर कारखाने विकत घेण्याची पद्धत फारच गंमतीदार आहे. आपण एक गोष्ट म्हणून त्याकडे पाहू…..
कोरेगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, आजारी, बुडीत निघालेला. या कारखान्याचे क्षेत्रफळ 214 एकर, कारखान्यात करोडोंची मशिनरी आहे. कामगारांची वसाहत आहे. संचालकांचे बंगले आहेत. कार्यालयाची इमारत आहे. या सर्वांची किंमत सरकारने 40करोड रुपये ठरविली. अन या कारखान्याच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या. अनेक निविदा आल्या. मात्र केवळ 63 करोडची वार्षिक उलाढाल असलेल्या अजित पवारांच्या नातेवाईकांच्या गुरु कमाँडिटीज याकंपनीला हा कारखाना 65 कोटीला विकला. मग या कंपनीने या कारखाना सुरू करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे रितसर कर्ज मागितले. कारखान्याची जमीन तारण म्हणून ठेवली. यावेळी या 214 एकर जमिनीची किंमत 400 कोटी इतकी झाली. म्हणजे अजित पवारांच्या नातेवाईकांनी कारखाना खरेदी करताना या जमिनीची किंमत 40कोटी ही नव्हती. मात्र कारखाना 65 कोटीला खरेदी करताच त्या जमिनीची किंमत 400 कोटी झाली. अन कर्ज मिळाले. या कंपनीने कर्ज मिळाल्यावर कारखाना सुरू ही केला नसता तरी 335 कोटी रुपयांच्या फायद्यात ही कंपनी होती.
तर अशाच पद्धतीने अजित पवारांनी 13 बुडीत सहकारी साखर कारखाने विकत घेतले आहेत. बाकी बाकी 52 बुडीत कारखाने अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विकत घेत सहकारी क्षेत्राला श्रदांजली वाहण्याचे कार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वकांक्षी म्हणून उभ्या राहिलेल्या या क्षेत्राची अंताकडे अशा पद्धतीने वाटचाल सुरू आहे.
65 सहकारी साखर कारखाने विकल्यानंतर ही आणखी 70 सहकारी साखर कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांना ही आजारी पाडून ते विकत घेण्याच्या तयारीत राजकीय पक्षांचे नेते आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याच संचलित सहकारी साखर कारखान्यात कर्जमाफी प्रकरणी 9कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. या अशा प्रकरणानंतरच कारखाने आजारी पाडून ते विकत घेतले जातात.
सहकार क्षेत्र पवारांच्या नजरेसमोर मोडीत निघाले…!
शरद पवार कृषिमंत्री असताना देशातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले. हे ठोसपणे सांगता येत नसले तरी देशभरातील किसान आपल्या मालाला हमी भाव मागताना रस्त्यावर दिसत होता. खताच्या वाढत्या किंमती व टंचाईबाबत आंदोलन करीत होता. अन कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या ही करीत होता. हे चित्र देशातील प्रत्येक राज्यात दिसत होते. महाराष्ट्र ही त्यास अपवाद नव्हता. राज्यातील जे सहकारी साखर कारखाने बुडीत काढून त्यांची खरेदी विक्री झाली, त्यातील 80% टक्के कारखाने शरद पवारांच्या जवळच्या आणि परिवारातील लोकांनीच कवडीमोल भावाने खरेदी केले आहेत. ही वस्तुस्थिती असून स्वतः ते ही हे नाकारणार नाहीत. मग आपल्या नजरेसमोर सुरू असलेला हा गैरव्यवहार व सहकार क्षेत्र मोडीत काढणारी कृती होत असताना ते गप्प का बसले ? तर तो त्यांचा स्वभाव आहे. राजकारणाची पद्धत आहे.
शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात जी टीम उभी राहिली, त्या सर्व टीम वरून नजर फिरविली तर सर्वच्या सर्व टीम ही महाराष्ट्राचे पुरोगामित्व फाट्यावर मारणारी आहे. सत्तेसाठी विचारधारा या टीमसाठी रंडी बाजारासारखी आहे. ही टीम फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली फळली व फुलली, हे तसे नवलच. याच टीमने राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँकां, दूध संघ, शिक्षण संस्था अन् कृषि उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढून शेतकऱ्याची लुटमार केली आहे. मग हे स्वतःच्या नजरेसमोर होत असताना पवार गप्प का होते ? व आता बोलायला का लागले ? हा प्रश्न त्यांनीच सहकार क्षेत्रा विषयी चिंता व्यक्त करून उपस्थित केला आहे. आता त्यांच्या बोलण्याला तशी काही किंमत ही उरलेली नाही. बाकी शेतकरी सभासद व मालक असलेले उरलेले ७० सहकारी साखर कारखाने कधी आजारी पडतात, बुडीत निघतात, अन त्यांची खरेदी विक्री होतेय, ते ही कळेल लवकर….!
……………………….
राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी,
पार्टी महाराष्ट्र प्रदेश