माणूस आपल्या अन्नाचा शोध घेत असताना त्याचे चार टप्पे पडले आहेत. १) अन्नचयन – झाडपाला, फळे ओरबाडून किंवा कंदमुळे उकरून खाणे २) मृगया – शिकारीत पशू पक्षी मासे मारणे व खाणे ३) पशूपालन – दूध, अंडी व मांस मिळविणे ४) शेतीचा शोध व विकास – बारोमास हुकमी अन्न मिळाले.
• जैन तपस्वी कालौघात कंदमुळे खाऊन नव्हे तर घरोघरी जाऊन भिक्षा मागून निर्वाह करू लागले होते. • तो काळ शेतीच्या शोधाचा पूर्ण विकास झालेला नव्हता. अद्यापही पशू पक्षी यांची शिकार किंवा पाळीव पशू पक्षी यांचे मांस शिजवून खाण्यावरच अवलंबन होते. साहजिकच मांसविरहीत भिक्षा किती मिळत असणार ? • ब्राह्मणही यज्ञात पशूंचा बळी देत होते. त्या मांसाहाराचा समाचार घेत होते. • गोमांस व इतरही पशू पक्षांचे मांस मोठ्या प्रमाणात अन्नाचा मुख्य स्रोत होता. • म्हणजे जैन श्रमणांना देखील भिक्षेत मुख्यतः मांसाहारी अन्नच मिळत असणार. • जैनांच्या समजुतीनुसार जीवांच्या उत्पत्तीचे सहा भाग आहेत. १) पृथ्विकाय २) अपकाय ३) वायुकाय ४) अग्निकाय ५) वनस्पतिकाय आणि ६) त्रसकाय. ‘काय’ म्हणजे शरीर. जसे की पृथ्वीच्या कायेपासून – पृथ्वीकाय. पृथ्वीकाय म्हणजे पृथ्वीपरमाणु. पृथ्वीच्या उदरात डोळ्यांना दिसत नाहीत असे सूक्ष्म जीव. अप म्हणजे जल. जलाशयातील जीव. (प्राण)वायुपासून आणि अग्नि म्हणजे सूर्य. म्हणजे प्रकाश संश्लेषणापासून, वनस्पतिकाय म्हणजे वृक्षादिक वनस्पति. मिळून सगळे सजीव आहेत. त्रसकाय म्हणजे किडामुंगी ते हत्तीपर्यंत लहान मोठे सर्व प्राणी देखील सजीव आहेत. …. यांची हत्या होता कामा नये ! खबरदार ! • खरेतर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचतत्त्व सजीव सृष्टीच्या मूळाशी आहे याच धारणेचे हे जैनकृत सार. जे त्यांना अहिंसेशी जोडायचे होते. • परंतु उपासक म्हणजे गृहस्थी जीवन जगणारे जे जैन होते ते निर्वाहा करिता शेत नांगरीत, धान्य पेरीत आणि ते शिजवून अन्न तयार करीत. या कृत्यांत पृथ्वी, आप, तेज, वायु, वनस्पति आणि त्रस या सहाही प्रकारच्या जीवांचा संहार होत असे ! • पृथ्वी नांगरीत असतां पृथ्वीपरमाणुच नष्ट होतात असे नव्हे. तर किडे, मुंग्या इत्यादी बारीकसारीक लाखो प्राणी मरतात. धान्य शिजवतांना वनस्पतिकाय, अपकाय, अग्निकाय व वायुकाय या सर्व प्राण्यांचा संहार होतोच. • मग या जैन उपासक गृहस्थींनी शिजवलेले अन्न भिक्षा म्हणून जैन श्रमण घेतच होते व घेत आहेत. त्यात सजीवांची हत्या होतच आहे. मग थेट मांसाहारी अन्नाची भिक्षा घ्यायला काय अडचण आहे ? बौद्ध भिक्खू हे जैन श्रमणांचे समकालीन. बौद्ध भिक्खू असे मांसाहारी अन्न त्याज्य मानत होते का ? मानत नसावेत कारण, ‘आमगंधसुत्त’ नावाचे एक प्राचीन सुत्त आहे. ते बौद्ध काश्यपचे आहे असे म्हणतात. त्यापूर्वीचेही असू शकते. हे सुत्त काही मी वाचलेले नाही. पण त्याचा संदर्भ कुठे कुठे येतो. ज्यात शाकाहार ही भ्रांत संकल्पना आहे, असे विवेचन येते. सर्वच अन्न हे प्रायः मांसाहारच आहे. म्हणजे सापेक्षतः पाहिले तर शाकाहार असा काही प्रकारच नाही व म्हणून मांसाहार हा प्रकार देखील नाही ! मांसाहाराला मांसाहार सिद्ध करण्यासाठी काहीतरी शाकाहारी म्हणजे जीवांची हत्या नसलेले अन्न अस्तित्वात असायला हवे. ते जर नाहीच तर ना अन्न मांसाहारी आहे ना शाकाहारी ! अन्न हे फक्त अन्न आहे. बाकी काही नाही !