महाराष्ट्राच्या मातीत लोकांना भुलवणारा अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटणारा बुवा, बाबा, अविद्या प्रचारक असा कोणीही हिंसेचा कधी बळी ठरला नाही. तसा इतिहासही नोंदलेला वाचण्यात येत नाही.
पण सर्व सामान्य बापड्या लोकांना, महिलांना, वंचिताना जागे करणारा, प्रबोधन करणारा, बहुजनांचे हित जोपासणारा, त्यांचा कैवारी मात्र प्रत्येक युगात प्रतिगाम्यांचा बळी ठरलेला आहे. त्याला जिवे मारण्यात आलेले, त्यावर जीव घेणे हल्ले झालेले मात्र बक्कळ मामले या महाराष्ट्रात सापडतात.
प्रबोधनकार, विज्ञान दृष्टी देणारा, व्यापक जनहित वाणी बोलणारा मग तो कोणत्याही पारंपारिक जातीचा, वर्णाचा, समुदायाचा असू दे त्याला इथल्या प्रतिगामी आणि संकीर्ण वृत्तीने सतत दडपून टाकण्यासाठी हिंसेचा हत्येचा मार्ग अवलंबलेला प्रकार सर्वत्र दिसून येतो. संत तुकाराम, बसवेश्वर ते दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश.
आणि आता अलीकडेच ताजे हल्ले करून विवेकी विचार दडपण्यासाठी, बहुजन जागृती रोखण्यासाठी जे हल्ले झाले त्यातील ज्ञानेश महाराव आणि प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील हल्ले जाणावे लागतील
यावरून हिंसा कोण करतेय आणि हिंसक कोण आहे हे इथल्या समाजाला, बहुजन वर्गाला सहज कळायला हवं पण तसेही होत नाही. विवेकी वर्ग मूठभर आहे त्याला कळतेय. तो बोलतो. पण फार मोठा समाज गारद आहे. त्याला गर्दीतले गार्दी अजूनही ओळखायला येत नाहीत.
ज्यांना थोडे ओळखता येतेय ते मौनात मस्त आहेत.हल्ल्यात गेला, बळी ठरला त्यात मी नाही, माझे नाहीत यात स्वतःला शाबुत मानतो आहे.आणि महाराष्ट्र मात्र या मूक अबोल समुदायामुळे रोज होरपळत आहे.
पण असे भोवताली मौनी लोकं असतानाही या महाराष्ट्री भूमीत पुन्हा पुन्हा विज्ञान वादी, लोक हितेशी, बहुजन वादी विचारी लोकं जन्माला येतातच ही मराठी मुलाखतली खरी चेतना आहे.
विठोबा, जोतिबा, बिरोबा, भवानी आईची लेकरं इथे निकराने वारसा चालवत आहेत.
तुकोबा, शिवबा, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा इथं जन्म घेऊन अव्याहत समाज कल्याणचे कार्य करतच आहेत.
अखेर मौनी बंटी बबली लोकांसाठी राहत इंदुरी साहेबांचा शेर स्मरणात आणावा असा आहे…. यहाँ हमाराही मकान थोडी है, लगेगी आग तो सबके घर जद मे आएंगे….
विद्वेषी वणव्यात आज नाही तर उद्या सर्वांचेच घर जळणार आहे. आगीच्या कल्लोळात किती दिवस भिंतीच्या आत मौनी सुरक्षित राहू शकतील बरं.
*आर एस खनके*