अहिल्याबाई होळकर यांचा जन्म बीड जिल्ह्यातील चोंडी येथे दिनांक ३१ मे १७२५ साली झाला. वडील माणकोजी शिंदे यांच्याकडे चोंडी गावाची पाटीलकी होती. अहिल्याबाई ह्यांचा वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या खंडेराव या मुलाशी विवाह झाला. त्यांना पुढे भालेराव आणि मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली. सन १७५४ साली खंडेराव लढाईत मरण पावले. तेव्हा अहिल्याबाई होळकर यांनी मल्हारराव होळकरांच्या सांगण्यावरून सती जाण्यास नकार दिला. वैधव्य आले असताना राजकीय सत्तेची सूत्रे हाती घेऊन त्यांनी निर्भिडपणे राज्यकारभार केला.
अहिल्याबाई होळकरांवर इंदूर संस्थांनच्या सुभेदारीची जबाबदारी पडली. कोणत्याही प्रसंगाला न डगमगता त्या स्वतः दौलतीचा कारभार पाहू लागल्या. सत्तेची धुरा सांभाळत असतांनाच अहिल्याबाईंनी राज्यातील तत्कालीन आर्थिक स्थितीचा विचार करून कर पद्धतीमध्ये जनतेस सवलत दिली. उत्पन्नानुसार शेतसारा घेण्यास सुुरवात केली. गावोगावी न्ययपंचायती स्थापन केल्या. त्यांनी भिल्ल, गोंड या आदिवासी जमातींना पडीत जमिनी वाहितीसाठी दिल्या. या बदल्यात त्यांच्यावर राज्याच्या विशिष्ट भागांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली. अहिल्याबाई होळकर यांनी बारा ज्योतिर्लिंगाचा जिर्णोध्दार केला. बनारस, त्र्येंबकेश्वर येथे घाट बांधले, घृष्णेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर, उज्जैनचा महाबळेश्वर, रामेश्वर, भीमाशंकर, आदी ठिकाणी अन्नछत्रे उभारण्याचे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्रातील पंढरपूर,कोल्हापूर, नाशिक, जेजुरी, चिंचवड,अशा ठिकाणी नवीन मंदिरे व घाट बांधले. द्वारका,बद्रिनारायन, जगन्नाथपुरी आदी ठिकाणी बाग, कुंड , आदी सुविधांची सोय केली, अन्नछत्रे उभारली. गरिबांना अन्नदान, सणावारास कपडे, थंडीच्या दिवसांत गरिबांना गरम कपड्यांचे वाटप, गोरगरीबांना राहण्या – खाण्याच्या सुविधा पुरविण्याचे कार्य अहिल्याबाईंनी केले, यामुळेच त्यांना पुण्यश्लोक ही पदवी देण्यात आली. अतिशय दानशूर, कर्तृत्ववान,धर्मपरायण , कुशल व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून लोकप्रिय असलेलं हे महान व्यक्तीमत्व दिनांक १३ ऑगस्ट १७९५ रोजी काळाच्या पडद्याआड गेले.