आंबेडकरी कवी कामगारांची दुःखे मांडतो. आंबेडकरी कवी कामगारांची घुसमट मांडतो. आंबेडकरी कवी कामगारांच्या वेदनांना शब्दरुप देतो. आंबेडकरी कवी कामगारांवर कविता लिहीतो. आंबेडकरी कवी त्यांच्यावरच्या अन्यायाविरोधात कवितेतून वाच फोडतो. मात्र कामगार कवी……….?
सूर्य नारायणा!
धर्मशाळेमध्ये, सरकारी रुग्णालयात, कचर्याच्या पेटीत, रस्त्याच्या कडेला जन्म घेऊन….. हजारो लावारिस अर्भकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हे अनाथ सूर्या! या सार्या अर्भकांहून तू कितीरे भाग्यशाली! एका बेनाम आईने नाळ कापून फेकून देताच दुसर्या अनामिक आईने तुला स्तनापाशी घेतले, तुला न्हाऊ माखू घातले, तुझी हगणी, मुतणी काढली, तुला ताडामाडासारखा वाढविले, अन्………. कामगारांच्या दुःखाशी, त्यांच्या जगण्याशी तुझी नाळ जोडून दिली. मग तू शिकत गेलास. बाबिण धोट्यात कशी घालायची, तार कशी लावायची. असच शिकता, शिकता, मुंबई तुझं विद्यापीठ झालं, मुंबई तुझी लावणी झाली. लोहाराच्या हाथोड्यासारखा घडत गेलास, भांडवलशाहीच्या विरोधात लढत गेलास. कामगार मैदानात तुझी कविता बोलू लागली, गिरणगावच्या रस्त्याने चालू लागली, तळपत्या तलवारीचे घाव घालू लागली. याच मैदानात तुला मार्क्स भेटला, लेनीनने तुझ्या खांद्यावर हात ठेऊन तुझ्या हातात विळा हाथोडा दिला, अन्…… तुझ्या ओठातून डोंगरी शेत डुलू लागलं, कष्टक-यांचं गाणं बोलू लागलं. नेहरू गेले तेंव्हाची गोष्ट……..! तू कवितेत म्हणून गेलास……., ‘अंधाराने माणिक गिळलं.’ हे सूर्य नारायणा! हे लेनीनवर कविता लिहणा-या सूर्या!, हे मार्क्सला प्रमाण मानणार्या सूर्या!, हे नेहरूच्या मरणाने व्यथित होणार्या सूर्या!, हे लालबागच्या सूर्या! हे गिरणगावच्या सूर्या! सारस्वतांच्या उच्चासनावर बसताना घे आमचाही तुला निळा सलाम! या कौतुकशाली झगमगाटातून जर कधी फुरसत मिळाली, अन् आठवलाच जर तुला ……. भागवत जाधव, पोचिराम कांबळे, चंदर कांबळे, जनार्दन मवाडे, अंबादास सावणे अन्……. गौतम वाघमारे, तर……. लिहशील का रे, माझ्या बाबासाहेबांवर एक कविता?
(ज्या वेळी नारायण सुर्वे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यावेळी लिहलेली ही कविता. नारायण सुर्वेंच्या फिचर फिल्ममध्ये सुध्दा माझी ही कविता घेतली आहे. त्या काळात कामगार चळवळ फाॅर्ममध्ये होती. लाल बावटा जोरात होता. गिरण्या चालू होत्या. त्या काळात कामगार साहित्य संमेलन व्हायची. कित्येक कवींनी स्वतःला कामगार कवी म्हणून घोषितही केले होते. आता कामगारही राहिला नाही, कामगार चळवळही राहिली नाही आणि नारायण सुर्वेही राहिले नाहीत. संपूर्ण गिरणगाव उध्वस्त होऊन आता तेथे गगनचुंबी टाॅवर उभे राहिलेत. याच गिरणगावात माझा जन्म झाला. सिंप्लेक्स मिल समोर आमची चार चाळ होती. आज तीही नाही. कामगार हा आमच्या जिवाभावाचाच नव्हे तर रोजच्या जगण्याचाच विषय होता आणि आहे. त्यामुळे आम्ही कामगार विरोधी असण्याचे कारणच नाही. ही कविता वाचताना काहींचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला हे स्पष्ट करावेसे वाटते की ही कविता सुर्वेंवर टिका करणारी नाही. या कवितेतून सूर्वेंचं मोठेपण मान्य करुन फक्त एक खंत व्यक्त केली आहे. कामगारांच्या व्यथा वेशीवर मांडून व्यवस्थेला जाब विचारणा-या या थोर कामगार कवीच्या लढाऊ स्मृतीला विनम्र अभिवादन!)