• 166
  • 1 minute read

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड : आंबेडकरी चळवळीचा वैचारिक पाया मोडीत काढण्याच्या नियोजित योजनेचा व्यावहारिक भाग!

 

    ‌‌. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा, महाराष्ट्राचा वारसा सांगत उभे राहयचे, नेतृत्व मिळवायचे आणि सत्तेच्या पदांसाठी याच महापुरुषांचा अवमान, अपमान करीत हिंदुत्ववादी सावरकर व नथुराम गोडसे यांच्या गौरव यात्रा काढणाऱ्या शक्तीसोबत उभे राहयचे, ही अतिशय चलाखीने या महापुरुषांचा आणि त्यांच्या विचारांवर निष्ठा असलेल्या जनतेची घोर फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे. अन दुर्दैव हे आहे की ही फसवणूक फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेऊन सुरू आहे. महाराष्ट्र सरकार हे सेक्युलर नसून हिंदुत्ववादी सरकार आहे, हिंदूंच्या हितासाठी सत्तेवर आलेले सरकार आहे, असे जाहीर वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर असताना एकनाथ शिंदे यांनी केले होते. ते शिंदे आज डॉ. ज्योती वाघमारे यांचे आदर्श राजकारणी आहेत.
डॉ. ज्योती वाघमारे यांना शिंदे सेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. लाडक्या भावाची लाडक्या बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे, असे ब्राह्मणी संस्कृतीला शोभेल असे विधान या उमेदवारी संदर्भात ग्रेट आंबेडकरवादी डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले आहे. काँग्रेस पक्षात असे होत नाही. सर्वसामान्यांना डावलले जाते, असे त्या म्हणतात. पण सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. वडील दलित पँथरचे कार्यकर्ते. सोलापूर महानगरपालिकेत ते नगरसेवक ही राहिले आहेत. त्यामुळे राजकारणात प्रतिष्ठा फक्त शिंदे यांच्यामुळेच मिळाली आहे, हा दावा करने म्हणजे खोटारडेपणाचे लक्षण आहे. आंबेडकरी विचारांचा वारसा सांगताना हा खोटारडेपणा करू नये. स्वतःला मिळत असलेल्या पदासाठी आंबेडकरी चळवळीला धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याचे काम ज्योती वाघमारे यांनी करू नये.
     एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत वैचारिक मतभेद होऊन त्यांनी शिवसेना सोडली असती व फोडली असती तर ते संविधानाच्या चौकटीत मोडले असते. पण स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली. अन घटनाबाह्य पद्धतीने ती बळकावली. त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार व खासदारांना भाजपने खोके देवून विकत घेतले. खुद्द एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे घटनाबाह्य पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता उपमुख्यमंत्री आहेत. असा असंवैधानिक, संविधान व लोकशाहीचा आत्मा असलेल्या धर्मनिरपेक्षतेला न मानणारा एकनाथ शिंदे हा व्यक्ती संविधानाचा अभ्यास असणाऱ्या व त्यावर निष्ठा असलेल्या ज्योती वाघमारे यांचा आदर्श नेता कसा ठरू शकतो ? हा प्रश्न असून त्याचे उत्तर आंबेडकरी जनतेला माहित आहे. ते ज्योती वाघमारे यांनी द्यावे, ही अपेक्षा ही या जनतेची नाही. आंबेडकरी विचारांच्या चळवळीने जो वारसा दिला, नेतृत्व दिले. तो घेऊन आंबेडकरी चळवळीलाच संपविण्याचा हा धंदा अलिकडे काही लोक करीत आहेत. त्यात रोज भर पडत असून ज्योती वाघमारे यांच्यामुळे या यादीतील एक नाव वाढले आहे.
     संविधान, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता संपवून या देशाला हिंदू राष्ट्र बनविणे हा भाजप व संघाचा अजेंडा आहे. हे सत्य व वास्तव आहे. यास नाकारणारे लोक दांभीक, खोटारडे व सत्तेच्या पदासाठी आणि छोट्या मोठ्या लाभासाठी विकले गेलेले आहेत. हे ही वास्तव आहे. केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून संवैधानिक संस्था व परंपरांची दयनीय स्थिती निर्माण झालेली आहे. सर्व जग भारतीय संविधान व लोकशाहीची चिंता करीत असताना हे तथाकथित आंबेडकरवादी सत्तेच्या पदासाठी भाजपसोबत उभे राहत आहेत. हे चित्र संघाच्या हिंदू राष्ट्र निर्मितीच्या दिशेने सुरु असलेली यशस्वी वाटचाल समजायला हरकत नाही. रामदास आठवले यांना भाजपने तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही रिपब्लिकन नेत्याला तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी आजवर मिळालेली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. पण त्यांना हे माहित नाही की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानाला संविधान निर्मितीच्या पहिल्या दिवसांपासून विरोध करणाऱ्या संघासोबत आंबेडकरीवादी विचारांचा कुठलाच नेता कधी गेला नाही. उलट तो संविधान विरोधी संघाच्या व जनसंघ ते भाजपच्या विरोधात सतत उभा राहिलेला आहे. मोदी देशासाठी प्रधानमंत्री आहेत, पण रामदास आठवले यांच्यासाठी बाप ही आहेत. अगदी संसदेत मोदींना बाप म्हणून घेण्यापर्यंतची लाचारी आठवले यांनी केलेली आहे. सारी आंबेडकरी जनता मोदींला संविधान व लोकशाही विरोधी म्हणत असताना आठवले त्यांना देशाचा बाप म्हणत असतील, तर तिसऱ्यांदा नाही, चौथ्यांदा ही राज्यसभा आठवलेंना मिळू शकेल. यात काही ही नवल नाही.
लोकशाहीची प्रतिष्ठित सभागृहे असलेल्या विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेतील आमदार व खासदारांचा घोडे बाजार भरवून पुरोगामी महाराष्ट्रात खोका संस्कृती निर्माण करण्याचे काम भाजपने केलेले असून शिंदेची साथ भाजपला मिळालेली आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रावर शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ एक कलंक ठरलेला आहे. विधिमंडळाच्या इतिहासात याची नोंद झालेली आहे. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे भले ही आज सत्तेवर आहेत. पण इतिहास या दोघांची नोंद व्हीलन म्हणूनच घेईल. अशा व्हिलन सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत उभे राहणे हा दांभीकपणा आहे.
     एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान व अपमान करण्याच्या अनेक घटना घडल्या. राजमाता जिजाऊचा अवमान झाला. पण एकनाथ शिंदे यांनी अवमान करणाऱ्यांवर कुठली ही कारवाई केली नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराज व राजे संभाजी यांच्यावर टीका करणाऱ्या सावरकर यांच्या गौरव यात्रा काढण्याचा प्रयत्न शिंदेनी केला. ते सावरकरवादी शिंदे कुणाचे आदर्श असतील, तर त्यांनाच लकलाभ. आंबेडकरी समाज, विचार आणि चळवळीसाठी ते आंबेडकर विरोधी, संविधान विरोधीच आहेत.
      देशात भाजपची सत्ता आल्यानंतर व मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर संविधानाला विरोध करणाऱ्या शक्ती मोकाट सुटल्या असून आजपर्यंत दबक्या आवाजात होणारा विरोध जाहीरपणे होऊ लागला आहे. अशा वेळी आंबेडकरी चळवळीतील चार डोकी सोबत असावेत म्हणून रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि ज्योती वाघमारे सारख्यांची भाजप व मित्र पक्षाला गरज आहे. त्यासाठी सत्तेचे काही तुकडे फेकावे लागतात. तेच तुकडे या नेत्यांना मिळाले आहेत. ज्योती वाघमारे यांना मिळालेली राज्यसभा ही यासाठीच मिळालेली आहे. यासाठी त्यांनी गद्दारीचा शिक्का बसलेल्या शिंदेसाठी खूप कष्ट घेतले आहे. संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सेक्युलर पक्षांना ही त्यांनी सोडले नाही. या जी हुजुरचे फळ त्यांना मिळाले आहे. या अगोदर अशा उमेदवाऱ्या आणि राज्यसभा अनेकांना मिळाल्या आहेत.नरेंद्र जाधव असेच एक नाव आहे.

– राहुल गायकवाड, प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र.

0Shares

Related post

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राजकीय समीक्षक पवारांचे आर्थिक लाभार्थी असल्याने सहा दशकांच्या राजकीय कार्यकाळाची समिक्षा होत नाही…?      …
असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड    देशभर कामगारांचा प्रचंड विरोध असतानाही अखेर सरकारने चार लेबर…
पीठ, मठ,आश्रम क्या अय्याशी और यौन शोषण के अड्डे है……?

पीठ, मठ,आश्रम क्या अय्याशी और यौन शोषण के अड्डे है……?

एक दशक के निरकुंश सत्ता; संघ और भाजप ने धर्म के ठेकेदारी पर भी कब्जा किया…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *