• 14
  • 1 minute read

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष....!

       मुंबई, ठाणे आणि नवीमुंबई सह राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक महानगरपालिकांवर सत्ता असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भाजपने इतकी बिकट अवस्था करून टाकली आहे की, २९ पैकी राज्यातील केवळ परभणी महानगरपालिकेवर ठाकरेंच्या सेनेचा भगवा काँग्रेसच्या फडकलेला आहे. परभणी महानगरपालिकेतील ६५ जागांपैकी 25 जागा उबाठाला मिळाल्या असतानाही तेथे जनतेचा कौल नसताना आपलाच महापौर बनविण्याचा प्रयत्न भाजपचाने केला. तो उबाठाचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील यांनी उधळून लावला.  चंद्रपूर महानगरपालिका भाजपने असाच प्रयत्न करून काँग्रेसच्या हातातून उबाठाच्या मदतीने महापौर व उप महापौपद हिसकावून घेतले आहे, तशी काँग्रेसच्या मदतीने उबाठाच्या हातातून परभणीची महानगरपालिका हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात भाजप होती. परभणी महानगरपालिकेत महापौर निवडूण आणण्यासाठी उबाठाची मदार काँग्रेसच्या १२ नगरसेवकांवर होती. काँग्रेस ही यासंदर्भात सकारात्मक होती. अन महापौर उबाठाचा झाला. 
             राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी २७ महानगरपालिकांच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत, अथवा तेथील चित्र स्पष्ट आहे. यापैकी २० महानगरपालिकांमध्ये भाजपचे महापौर निवडून आले आहेत. तर तीन महानगरपालिकेत शिंदे सेनेचे महापौर निवडूण आले आहेत. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी, अहमदनगरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर  मालेगावमध्ये इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीचे महापौर उपमहापौर निवडूण आले आहेत. लातूर एकमेव महापालिका काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व समाजवादी पार्टीचे महापौर आणि उपमहापौर निवडूण येण्याची शक्यता आहे. पण भाजपकडून दगा फटका होण्याची शक्यता ही तितकीच असल्याने  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व समाजवादी पार्टीने अधिक सावधपणे राहण्याची गरज आहे. भाजप सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. आणि ते चंद्रपूर येथे दिसले ही आहे.
              तीन दशकांच्या मैत्रीशी गद्दारी करीत ज्या भाजपने शिवसेनेला फोडले, तोडले, उद्धव ठाकरेंना सत्तेवरून खाली खेचले, त्याच भाजपशी हात मिळवणी करून उद्धव सेनेने भाजपला चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौरपद मिळवून दिले आहे . ६६ सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडूण आले आहेत, तर काँग्रेसशी युती असलेल्या जनविकास आघाडीचे ३ नगरसेवक असल्याने काँग्रेसकडील संख्याबळ ३० आहे. ६ नगरसेवक असलेल्या उद्धव सेनेसोबत सकारात्मक वाटाघाटी करून काँग्रेसला आपला महापौर सहज निवडूण आणता आला असता. पण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील गटबाजी उफाळून आल्याने व वाटाघाटी सकारात्मक न झाल्याने उद्धव सेनेच्या ६ नगरसेवकांनी भाजपशी वाटाघाटी करून यशस्वी तोडगा काढला. भाजपचे २३, उद्धव सेनेचे ६ , शिंदे सेनेचा १ आणि काँग्रेसचे २ बंडखोर असे ३२ संख्याबळ भाजपकडे झाले, तरी ही महापौर निवडूण आणणे कठीण होते. पण भाजपने वंचितच्या २ नगरसेवकांना हातमिळवणी करून मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवले. सभागृहात गैरहजर राहण्याचे सांगितले. तसेच झाले. त्यामुळे बहुमताचा आकडा ३३ ऐवजी ३२ वर आला. तर देणेघेणे झाल्याने एमआयएमचा एकमेव नगरसेवक उपस्थित असून ही तटस्थ राहिल्याने भाजपला ३२, तर काँग्रेसला स्वतःचे २७, जनविकास आघाडीचे ( शेकाप) ३ आणि बसपाचे १ अशी ३१ मते मिळाली व भाजपचा महापौर पदाचा उमेदवार एका मताने विजयी झाला.
              राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप अनेक प्रकारचे घोटाळे करून जिंकत आहे. निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर निवडणूक प्रक्रिया राबवित आहे. प्रशासन यंत्रणा आणि EVM मशीनमध्ये घोटाळे करून वोट चोरी केली जात आहे. यावर मात करून मतदार काँग्रेसला मतदान करीत असेल व जिंकुन देत असेल, तरी अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस निर्णायक लढतीत पराभूत होत आहे, हे चंद्रपूरमध्ये स्पष्ट दिसून आले. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केल्यानंतर ही याच अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागलेला आहे. ही गटबाजी इतक्या चव्हाट्यावर आली नसती तर, काँग्रेस उमेदवार सहज विजयी झाला असता. हे मात्र नक्की.
           डाव्या, समाजवादी व आंबेडकरी पक्षांचे अपयश आणि एमआयएमला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेले यश यावरून स्पष्ट होत आहे की, मतदार भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणामुळे प्रभावित झालेला आहे. धार्मिक कट्टरता मग हिंदुत्ववाद्यांची असो की मुस्लिम कट्टरतावादी असतील यशस्वी होताना दिसत आहेत. या धार्मिक कट्टरतावादांमुळे डावे, समाजवादी व आंबेडकरवादी या सारख्या सेक्युलर पक्षांचा दारूण पराभव होत आहे. संघ, भाजपचा हाच अजेंडा असल्याने एमआयएमला सर्व त्या प्रकारची मदत भाजपकडून केली ही जात आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करीत आहे. त्यामुळे ही सेक्युलर पक्षांची निवडणुकीच्या मैदानात नाकेबंदी करण्यात आली आहे.या नाकेबंदीत डावे, समाजवादी व आंबेडकरवादी पक्ष अस्थित्वहीन झाले आहेत. संवैधानिक संस्थांचा व मार्गाचा गैरवापर करूच भाजप हे करीत असल्याने भाजपला रोखणे कठीण झाले आहे. पण देशासाठी, संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी रोखणे ही महत्वाचे झाले आहे. 
       
    निडणुकीत भाजपसाठी लाभदायक भूमिका घेणे, अथवा भाजपशी युती करणे म्हणजे आंबेडकरी विचार व चळवळीशी द्रोह….!
 
                   देश, संविधान व लोकशाही व्यवस्थेवर निष्ठा असणाऱ्या सेक्युलर पक्षांची व विशेष करून आंबेडकरी विचारांच्या पक्ष, संघटनाची नाकेबंदी करून, गरज पडल्यास त्यांना सोबत घेऊन अथवा साधने पुरवीत त्यांना बी टीम म्हणून उभे केले जात आहे. इतकेच काय, सत्ता स्थापन करताना ही या पक्षांच्या निवडून आलेल्या सदस्यांशी हात मिळवणी करून ही भाजप सत्ता स्थापन करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही उदाहरणे लाजिरवाणी आणि आंबेडकरी विचारांशी द्रोह करणारी आहेत. हे या पक्षांच्या नेतृत्वाने समजून घेतले पाहिजे. पण ते हे समजून घेताना दिसत नाहीत. हे अतिशय गंभीर  आहे. स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेताना या विचारांशी द्रोह करणे अथवा धार्मिक कट्टरतवादी अजेंडा राबविणाऱ्या भाजपच्या सोबत युती करून उभे राहणे, या लाज वाटणाऱ्या गोष्टीची जरा भी शरम या नेतृत्वाला वाटेनाशी झालेली आहे. हे इतके दारुण चित्र आज आंबेडकरी चळवळीचे आहे. आंबेडकरी विचार, चळवळ आणि सामाजिक न्याय आंदोलनाच्या या आजच्या दयनीय स्थितीला जबाबदार असलेल्या आंबेडकरी पक्ष, नेत्यांना धडा शिकविण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे.
         गेल्या एका दशकात लोकशाही राज्य व्यवस्थेला, संविधान व संविधानाच्या सर्व चौकटी आणि परंपरांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सुरु असून सत्तेवर असलेल्या संघ व भाजपचा तोच अजेंडा आहे. निवडणुका या लोकशाही राज्य व्यवस्थेचा आत्मा आहेत. त्यामुळे गैर व्यवहार, घोटाळे करून, निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणुका जिंकण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. यामुळे निवडणुका व पर्यायाने लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडत चालला आहे. हे फारच गंभीर असून हा विश्वास पूर्ण उडाला तर संविधान व लोकशाही व्हेन्टेलिटर अखेरचा श्वास घेत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या दोन्हीं गोष्टी या देशाला दिलेल्या आहेत. त्यामुळे संघ, भाजप सारख्या सांप्रदायिक शक्ती संविधान व लोकशाहीच्या विरोधात आहेत, हे संविधान व लोकशाहीवर निष्ठा असलेल्या आंबेडकरवादी व सेक्युलर पक्षांनी समजून घेतले पाहिजे व या शक्तींच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.
……………
 
राहुल गायकवाड,
प्रवक्ता, महासचिव, समाजवादी पार्टी 
महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …
श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता श्री.विद्याधर…
विपश्यना : आत्मक्रांतीचा विज्ञान आणि मनाच्या मुक्तीचा महामार्ग

विपश्यना : आत्मक्रांतीचा विज्ञान आणि मनाच्या मुक्तीचा महामार्ग

विपश्यना : आत्मक्रांतीचा विज्ञान आणि मनाच्या मुक्तीचा महामार्ग आजचा मनुष्य बाह्य जग जिंकण्यात गुंतला आहे; पण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *