प्रशांत रामचंद्र राणे ! याचं मूळ गाव कणकवली जवळ.कोकणी माणूस.जन्माने कर्माने मुंबईकर.पण गावाशी नाळ अजुन शाबूत.होळी,गणपती नाय तर मे महिन्याच्या सुट्टीत तरी बायको पोराला घेऊन गावी जाणारच.गणपती वर भारी श्रद्धा.एका मंदिराचा सेक्रेटरी पण होता.सर्व जाती धर्माच्या लोकांना आवर्जून पूजेला बोलवायचा.मंदिरात सगळ्यांना पुजारी ब्राम्हणच पाहिजे होता आणि तो तसा कोणी मिळत नव्हता.राणे म्हणाला लिंगायत ठेऊया.अर्थात याला सहजासहजी मान्यता मिळणं कठीणच होतं.पण राणे आपल्या भूमिकेवर ठाम असतो.ब्राम्हण मिळत नाही तर जाऊ दे म्हणत त्याने आग्रह धरून लिंगायत माणूस पुजारी म्हणून नेमून घेतला. मंदिरातील सेवक पण दलित.अशा गोष्टीवरून तेव्हा वाद व्हायचे पण ते मिटायचे.मात्र तथाकथित हिंदुत्ववादी लाटेने चित्र बदलत गेलं.हिंदू राणे विरुद्ध काही हिंदुत्ववादी असा सुप्त संघर्ष मंदिरात चालू झाला.जवळचे मित्रही कट्टरवादी भूमिका घेताना पाहून राणे अस्वस्थ होत गेला.चर्चा,संवाद यांना काही अर्थच उरेनासा झाला.एक दिवस राणे वैतागला आणि पदाचा राजीनामा देऊन मोकळा झाला. पद बिद नको म्हणाला. नावापुरताच प्रशांत.पण एकदा का भडकला तर कोणाच्या बापाला ऐकत नाही.राणे घाबरायचा फक्त स्वतच्या बापाला.कॉलेजला असतानाही समोरून बापाला येताना बघितला तर नाक्यावरून एखाद्या गल्लीत पसार व्हायचा.पण बापावर तेव्हढाच जीव.बापाच्या मागे त्यांची परंपरा याने चालू ठेवलीय.नित्य नियमाने पुजा अर्चा करतो.रोज सकाळी उठून कामाला जातो.आईची काळजी घेतो.भावाची काळजी घेतो.बायको मुलांना प्रेमाने वागवतो. असं सगळं रीतसर करणारा राणे मुलाने कोणता निबंध लिहू असं विचारल्यावर बाबासाहेब आंबेडकरांवर लिही असं सांगतो आणि आपल्या मुलाच्या डोक्यात पण वैचारिक लोच्या पेरून बसतो.
साधारण 1990 च्या थोडं आधी प्रशांत राणे युवा समिती मध्ये आला.संजीवनी नांगरे सोबत.आणि राणे समाजसेवेत रमला तो आजपर्यंत. आजुबाजूला सगळे शिवसैनिक असताना राणेंची दोस्ती झाली लोकांचे दोस्त सोबत.उत्कृष्ट कबड्डीपटू,मॅरेथॉन धावणारा राणे रस्त्यावर उतरून झिंदाबाद मुर्दाबाद करू लागला.दोस्तांच्या बरोबरीने शिवजयंती निमित्त कर्करुग्णांना चादर वाटप करतो आणि आंबेडकर जयंतीला बेभान होऊन नाचतो.हर सवाल का जवाब…बाबासाहब कार्यक्रमाला सुट्टी मिळाली नाही म्हणून राणे ऑफिस मधून दुपारी गायब झाला.हॉल वर येऊन कलाकारांच्या चहा नाष्ट्याची व्यवस्था करून परत गेला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पुन्हा येऊन कार्यक्रमाच्या बाकी व्यवस्था बघू लागला.एकदा राणेने जबाबदारी घेतली तर ती पूर्ण होणारच.दोस्तांच्या मीटिंग,कार्यक्रम,आंदोलन,पिकनिक सगळ्यांचा अघोषित व्यवस्थापक म्हणजे प्रशांत राणे. राजकीय जीवनात अनेक पदांची ऑफर असताना केवळ विचार पटत नाहीत म्हणून ते नाकारणारा राणे मैत्री मात्र सगळ्यांशी ठेवतो.राणे मराठा मोर्च्यात असतो,साई पालखी यात्रेत असतो,मंडळांच्या पूजेत असतो,सोसायटीच्या मीटिंगमध्ये असतो, ओबीसीबरोबर खातो पितो, मुस्लिमांसोबत काम करतो.राणे वारीत पण असतो आणि संघर्षातही.राणे खऱ्या अर्थाने आजच्या मराठी माणसाचे प्रतिबिंब असतो. इतकंच काय राणे ठाकरेंच्या शिवसेने बरोबर असतो तसा मनसे, आरपीआय,काँग्रेस,राष्ट्रवादी अशा विविध पक्षातील मित्रांच्या कार्यक्रमालाही हजेरी लावून येतो. त्यामुळेच निवडणुकीच्या काळात तर अनेकांना प्रश्न पडतो,राणे नेमका कोणाचा ? कोणी काही म्हणो,राणे मात्र सामान्य लोकांचाच.लोकांचा दोस्त ! तो स्टेजवर येत नाही,भाषण करत नाही.कार्यकर्ता म्हणून कसला आव आणत नाही.सर्व सामान्य माणूस.पण हा सामान्य माणूस कोरोनासारख्या महामारीत लोकांच्या गरजेला धावतो.वारंवार रक्तदान करतो. जात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांशी रक्ताचं नातं जोडत राहतो. आज राणे पन्नाशीत पदार्पण करतोय.राणे, वुई वॉन्ट सेंच्युरी ! अजुन बराच पल्ला गाठायचाय दोस्त !!