- 32
- 2 minutes read
आपले संविधान… राज्यपद्धतीच नव्हे, तर जीवनपद्धती.
आपले संविधान… राज्यपद्धतीच नव्हे, तर जीवनपद्धती.
🌷 हमारा अभियान हर घर-हर मन संविधान
🌼 भाग – २३ 🌼
🌷 भाग-दुसरा : नागरिकत्व 🌷
आपण आपल्या राज्यघटनेच्या भाग-दोन मध्ये असलेल्या नागरिकत्वाबाबतच्या तरतुदींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या भागात आपण अनुच्छेद-८ च्या अनुषंगाने विदेशात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी ‘P.I.O.’ आणि ‘O.C.I.’ नावाचे जे दोन कार्ड लागू केले होते, त्याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. सोबतच भारतीय नागरिकत्व कधी रद्द होऊ शकते, याविषयी माहिती देणाऱ्या अनुच्छेद-९ विषयी देखील थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अनुच्छेद-८:-मुळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणा-या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क-
सर्वसाधारणपणे विविध कारणांनी विदेशात राहणाऱ्या भारतीय मूळ वंशाच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या दृष्टीने हे अनुच्छेद-८ खूप महत्त्वाचे आहे, हे या अगोदरच्या दोन भागांमधून आपण बघितले. या अनुच्छेद-८ च्या अनुषंगाने मुळचे भारतीय असलेल्या, परंतू काही कारणास्तव विदेशात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठी भारत सरकारने ‘P.I.O.’ आणि ‘O.C.I.’ असे दोन प्रकारचे कार्ड लागू केले होते. ‘P.I.O.– Person of lndian Origin म्हणजे ‘मूळ भारतीय वंशाची व्यक्ती’. म्हणजेच अशी व्यक्ती की, जी किंवा तिच्या पूर्वजांपैकी कोणीही एक ‘भारतीय नागरिकत्व’ धारण करणारी होती. परंतु आता ती दुसऱ्या देशाची ‘नागरिक’ आहे. अशा व्यक्तींसाठी २००२ मध्ये ‘भारत सरकारने’ ‘P.I.O. कार्ड’ देण्याची योजना सुरू केली होती. अशा कार्डधारकांना भारतात १५ वर्षांसाठी व्हिसाची आवश्यकता नव्हती. शिवाय त्यांना भारतातील सात वर्षानंतरच्या वास्तव्यानंतर अर्ज केल्यास ‘भारताचे नागरिकत्व’ देखील मिळू शकत होते.
O.C.I.– Overseas Citizen of India म्हणजेच, भारताचा परकिय नागरिक कार्डधारक. मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी ही योजना २००५ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नोंदणी ‘भारताचा परकीय नागरिक’ म्हणून भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ च्या ‘सेक्शन ७-अ’ अन्वये करण्यात येते. परदेशी नागरिकांना O.C.I. कार्ड देणे म्हणजे भारताच्या दृष्टीने दुहेरी नागरिकत्व नव्हे. काही ठराविक देशातील नागरिकांना, त्यांचं नागरिकत्व तसेच ठेवून भारताचे ‘मर्यादित नागरिकत्व’ बहाल करण्यात आलेले आहे. भारतीय नागरिकांना परदेशी नागरिकत्व मिळविण्याची संमती नाही. O.C.I. कार्डधारकांना आजीवन भारताचा व्हिसा देण्यात येतो. ते कितीही वेळा भारतभेटीवर येऊ शकतात. शिवाय त्यांना कार्ड नोंदणी नंतर पाच वर्षांनी अर्ज केल्यास व सलग एक वर्षे भारतात वास्तव्यास असल्यास ‘भारतीय नागरिकत्व’ देखील मिळू शकते.
९ जानेवारी २०१५ पासून ‘P.I.O. आणि O.C.I.’ हे दोन्ही कार्ड एकत्र करण्यात आलेले असून आता एकच O.C.I. कार्ड देण्यात येते. हा बदल करण्यासाठी २०१५ साली ‘भारतीय नागरिकत्व कायदा-१९५५’ मध्ये सुधारणा देखील करण्यात आली.
यानंतर आपण एखाद्या भारतीय व्यक्तीने जर परकीय देशाचे नागरिकत्व स्विकारले, तर त्याच्या भारतीय नागरिकत्वावर नेमका काय परिणाम होईल, याविषयी माहिती देणाऱ्या अनुच्छेद-९ विषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करुया…
अनुच्छेद -९:-परकिय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे-
कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकिय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल तर, ती व्यक्ती अनुच्छेद-५ च्या आधारे भारताची नागरिक असणार नाही, अथवा अनुच्छेद-६ किंवा अनुच्छेद-८ च्या आधारे भारताची नागरिक आहे, असे मानले जाणार नाही.
अनुच्छेद-९ चे शीर्षक व कायदेशीर वाक्य बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलेच असेल की, ज्या भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्तीने आपल्या इच्छेनुसार जर इतर परकीय देशाचे नागरिकत्व स्विकारले असेल, तर त्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व त्याच वेळी रद्द होते. ती व्यक्ती आता भारतीय नागरीक म्हणून गणली जात नाही. अशा व्यक्तीला अनुच्छेद-५, ६ किंवा ८ नुसार भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात असलेल्या तरतुदी लागू होणार नसल्याचे ह्या अनुच्छेद-९ मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. अनुच्छेद-५, ६ आणि ८ मध्ये करण्यात आलेल्या नागरिकत्वाबाबतच्या तरतुदींविषयी आपण या अगोदरच्या भागांमध्ये सविस्तरपणे बघितलेले आहे.
आपल्या राज्यघटनेने एकल नागरिकत्व स्विकारलेले आहे. म्हणजेच कोणतीही व्यक्ती आपल्या भारताची नागरिक असतांना, त्याच वेळी अन्य इतर कोणत्याही परकीय देशाची नागरिक असू शकत नाही. आणि म्हणूनच जर भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्तीने परकीय देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने स्विकारले, तर तिचे भारतीय नागरिकत्व रद्द केले जाते. आणखी कोणकोणत्या कारणांनी भारतीय नागरिकत्व रद्द होऊ शकते, याविषयी ‘भारतीय नागरिकत्व कायदा-१९५५’ मध्ये विस्ताराने माहिती देण्यात आलेली आहे. आपण पुढे ती बघणारच आहोत….
क्रमशः…
🌹 प्रश्नमंजुषा क्रं. २३ :- 🌹
१) भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्तीने …….. देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने स्विकारले, तर तिचे भारतीय नागरिकत्व रद्द केले जाते.
२) …….. कार्डधारकांना आजीवन भारताचा व्हिसा देण्यात येतो.
३) …….. कार्डधारकांना भारतातील सात वर्षानंतरच्या वास्तव्यानंतर अर्ज केल्यास ‘भारताचे नागरिकत्व’ देखील मिळू शकत होते.
👉 इच्छुकांनी सदर प्रश्नमंजुषेची उत्तरे 7276526268 ह्या माझ्या व्हाट्सअप नंबर वर आपले नाव, गाव व जिल्ह्याच्या नावासह आज रात्री पर्यंत पाठवावी. संविधानिक आदर्श व मुल्ये जाणून शिखरावर बसलेल्या एका व्यक्ती पेक्षा, ही आदर्श व मुल्ये जाणून कर्तव्यपालनासाठी हजारो नागरिकांच्या समूहाने उचललेले एक पाऊल जास्त परिणामकारक ठरणारे आहे. आणि म्हणूनच संविधान जनजागृतीसाठी एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या ह्या पोस्ट ज्या वर्षभर अतिशय मेहनतीने तयार करून आपल्यापर्यंत पोहच केल्या जात आहेत, त्या आपण प्रथमतः स्वतः वाचाव्यात आणि नंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून ह्या प्रयत्नात आम्हास सहकार्य करावे, ही विनंती.🙏
✍️ नुरखॉं पठाण
गोरेगाव रायगड