नेपाळात आम्ही फोटोत दाखवलेल्या नितांत सुंदर जागी अडकलो होतो. हे असं अडकणं कोणालाही आवडेल.
आम्ही पाच मित्र तीन तारखेला काठमांडूला पोहोचलो. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. काठमांडूत स्थिती अगदी सामान्य होती. भारताचे मुख्य न्यायाधीश माननीय भूषण गवई हेही काठमांडूत होते. हॉटेलच्या लॉबीत आम्ही उभ्या उभ्या त्यांना भेटलो.
सहा तारखेला पोखरा या दुसऱ्या पर्यटन स्थळाकडे निघालो. पोखरामध्ये तरुणांचे आंदोलन काठमांडूला होत आहे अशी खबर आम्हाला लागली. आंदोलन काही दिवसात संपेल असंच वाटत होतं कारण मागणी फक्त सोशल मीडिया सुरू करावा अशी होती. मात्र नेपाळ सरकारला दुर्बुद्धी सुचली आणि शांततेत चाललेल्या आंदोलनावर त्यांनी गोळीबार केला. 19 मुलांच्या हत्त्येनंतर आंदोलनाचं चित्र पालटलं. एक म्हणजे आंदोलन हिंसक झालं. आणि दुसरं म्हणजे फक्त काठमांडूत असलेलं आंदोलन संपूर्ण नेपाळमध्ये पसरलं.
नेपाळात आम्ही फोटोत दाखवलेल्या नितांत सुंदर जागी अडकलो (!) होतो. हे असं अडकणं कोणालाही आवडेल.
पण भीती एकच होती. आपलं रिसाॅर्ट कोण्या राजकारण्याचं असेल तर जाळलं जाऊ शकतं.
रात्री 11 वाजता एक फॅमिली चेक इन झाली. रस्त्यावर कर्फ्यू, विमानतळ बंद असं असतांना कुठून आले म्हणून शोध घेतला तर तीन किलोमीटरवर असलेलं ‘बड पिपल’ रिसाॅर्ट जाळलं म्हणून आले असं कळलं. पर्यटकांना एका कणानं त्रास दिला नाही ‘जेन झी’नं. या फॅमिलीसह सर्वांना दोन तासांची मुदत दिली. बिगर राजकारण्यांचे पर्यायी रिसाॅर्ट कोणते ते सांगितलं. ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती अशा परदेशी पर्यटकांना स्थानिक टेंपो वगैरेत बसवून दिलं. रिसाॅर्टचे कर्मचारी बाहेर काढले आणि मग रिसाॅर्ट जाळलं.
आम्ही आमच्या सुटकेसाठी कोणालाही कळवलं नाही. आमच्या रिसाॅर्टमध्ये एकूण पंधरा भारतीय होते. दूतावासाच्या सूचनेनुसार फक्त आमचा पत्ता देऊन ठेवला होता. सुटकेसाठी कोणाकडेही काहीही बोललो नव्हतो. (भाजपाच्या काही सोशल मिडीयावाल्यांनी ‘फडणवीसांकडे याचना करून सुटका करून घेतली’ असा अपप्रचार चालवला आहे म्हणून हा खुलासा. )
नऊ आणि दहा तारखेला इंटरनेट कनेक्टिव्हीटी खूपच मर्यादित होती. मित्र प्रशांत आहेर यांनी मुख्यमंत्री महोदयांना आम्ही अडकल्याचं कळवलं हेही रेंज आल्यावरच कळलं. त्यांचाही फोन आमच्यापर्यंत पोचू शकला नव्हता. मुख्यमंत्र्यांचे पीए मनोज मुंडे यांनी फोन करायचा भरपूर प्रयत्न केला पण रेंज आणि व्हाट्सॅप कनेक्टीव्हीटी नव्हती. रेंज आल्यावर देवेंद्रजींचा मेसेज दिसला, त्यांचे आभार मानले. उद्धवजींशीं देखील संपर्क झाला आणि आभार मानले. काहीही अडचण आली तर कळवा असं मुख्यमंत्री कार्यालयातून मनोजनं सांगितलं होतं पण कोणतीही अडचण आली नाही. बारा तारखेला पोखरा-काठमांडू- दिल्ली- पुणे असे तीन विमानप्रवास करून पुण्यात अगदी शांततेत पोचलो.