आरक्षण विषयी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने उद्या समीक्षा बैठकीचे आयोजन
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय खंडपीठाने काल अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये दिलेला निर्णय अत्यंत धक्कादायक असून याचा दीर्घकालीन परिणाम या दोन्ही घटकांवर नकारात्मक स्वरूपाचा होणार आहे . सर्वोच्च न्यायालयापुढे केंद्र सरकार व विविध राज्य सरकार यांचे कायदेशीर प्रतिनीधी अनुसूचित जातींच्या अनुषंगाने बाजू मांडण्यात हेतूता कमी पडले असून त्यामुळेच हा निर्णय आलेला आहे. अशी टिका रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी केली आहे.
दरम्यान , या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवर विचार विनिमय सुरू असून त्याबाबतचा निर्णय येत्या आठवड्यात दिल्ली येथे आयोजित बैठकीनंतर घेतला जाणार आहे. असेही डंबाळे यांनी सांगितले.
आरक्षणाच्या निकालाच्या अनुषंगाने पुणे शहर परिसरामध्ये विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या बौद्ध कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक उद्या शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजता, नवयुग बँक्वेट हॉल , ढोले पाटील रोड , पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर बैठकीत आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या विविध पक्ष संघटनां समवेतच काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , भाजपा व इतर पक्षांमध्ये कार्यरत असलेले बौद्ध कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वाचन करून त्याची समीक्षा करण्यात येऊन यासंदर्भामध्ये पुढील नियोजन ठरवले जाणार आहे.
तरी सदर बैठकीस विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या बौद्ध प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहनही राहुल डंबाळे यांनी केले आहे.
– राहुल डंबाळे , (अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र)