- 34
- 1 minute read
आर्टिफिशियल इंटेलिजन्स: आपल्या कोवळ्या मुलामुलींपर्यंत येऊन थडकू शकतो.
कौटुंबिक आणि सामाजिक बंध तुटून तयार झालेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील पोकळीमध्ये, आधी सोशल मीडिया आणि आता, “आर्टिफिशल इंटेलिजन्स पर्सनल असिस्टंट” सारखी ॲप्स घुसत आहेत. भारतात यायला अजून काही अवधी जाईल कदाचित. पण अमेरिका युरोप मध्ये ही प्रक्रिया सुरू झाल्याचे रिपोर्ट्स आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे स्थूल अर्थव्यवस्थेतील रोजगारनिर्मितीवर होऊ शकणाऱ्या विपरीत परिणामांवर बरीच चर्चा होत आहे. ते प्रकरण गंभीर आहेच.
पण नागरिकांच्या, विशेषतः कोवळ्या वयातील तरुणांच्या व्यक्तिगत आणि भावनिक आयुष्यावर देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठ्या प्रमाणावर आघात करणार आहे, त्याची हवी तशी दखल घेतली जात नाही.
_______
लहान मुलांच्या हातात कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, स्मार्टफोन दिले जाणे आता न्यू नॉर्मल बनले आहे. पण अगदी अलीकडे पर्यंत लहान मुले मुली त्यावर कॉम्प्युटर गेम्स खेळत होती.
पण आता मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात नसलेल्या मानवाशी संवाद साधणारे इंटरऍक्टिव्ह ॲप्स तयार झाले आहेत. त्यांचा पूर येऊ घातला आहे. दहा वर्ष वयापुढील किंवा टिएज मधील मुले मुली या ॲप्सवर तासनतास घालवू लागली आहेत. अमेरिका युरोपियन देशांमध्ये याचे प्रमाण अर्थातच जास्त आणि वाढते आहे.
या वयातील मुलेमुली बोलत नाहीत पण त्यांच्या राहत्या कुटुंबातील ताण-तणावांचा परिणाम त्यांच्यावर होतच असतो. त्याशिवाय शाळेतील शिक्षकांचे वागणे, अभ्यास न झेपणे, सामाजिक कौशल्ये विकसित झालेली नसणे यामुळे या वयोगटातील मुलांची मानसिकता अशा तणावाच्या परिस्थितीपासून जास्तीत जास्त वेळ, जास्तीत जास्त दूर राहण्याची बनत जाते.
_____
पण प्रत्येक माणसाची मैत्रीची, संवादाची भूक त्याच्या डीएनए मध्ये कोरली गेली आहे. समाज atomized झाला म्हणून आपोआप व्यक्ती एकेकट्या जगू शकणार नाहीत. मग ती भूक भागवण्यासाठी ही मुले “आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्सनल असिस्टंट” सारखी ॲप्स वापरू लागली आहेत.
ही ॲप्स त्याच्याशी संवाद साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीगणिक प्रतिसाद कसा द्यायचा ते ठरवतात. संवाद साधणाऱ्याचे प्रत्येक म्हणणे शांतपणे ऐकून घेतात. त्याच्याशी तेवढ्याच शांतपणे संवाद साधू शकतात.
मुलांनी कोणताही मूर्खासारखा प्रश्न विचारला तरी मुलांना “काय मूर्खासारखा प्रश्न विचारतोस” म्हणून कमी लेखून जजमेंट पास करत नाहीत. अगदी पौगंडावस्थेमधील नैसर्गिक मानसिक ताण-तणावांना देखील प्रतिसाद देतात.
______
ए आय पर्सनल असिस्टंट बनवणाऱ्या कंपन्यानी त्यांच्या अशा ग्राहकांना अधिकाधिक खिळवून ठेवण्यासाठीच त्याचे प्रोग्रामिंग केलेले असते. याचे व्यसन लावले जाते.
ए आय दाखवले जाते तसे स्वयंभू नाही. त्याचा बोलावता धनी नफ्याची महाकाय भूक असणारी कॉर्पोरेट आहेत. हे सत्य पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे. हे उमगले की शासनामार्फत हस्तक्षेपाच्या जागा कळू लागतील. जनआंदोलनाच्या दिशा स्पष्ट होऊ लागतील.
______
जास्तीत जास्त वेळ पर्सनल असिस्टंट ची दोस्ती करणाऱ्या तरुणांची त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातील घरातील, नात्यातील, शाळा कॉलेजमधील, आजूबाजूच्या हाडामांसांच्या लोकांशी भावनिक बंध प्रस्थापित करण्याची क्षमता गमावून बसतात. आणि अजून अजून कोषात जातात. असे ते दुष्टचक्र तयार होते.
अमेरिकेत या वयोगटातील ए आय पर्सनल असिस्टंटचे व्यसन लागलेल्या तरुणांनी आत्महत्या केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा घटना तुरळक असल्या तरी प्रश्नाचे गांभीर्य प्रौढांना कळवण्यासाठी पुरेशा आहेत.
भारतातील प्रौढ नागरिकांना एकच आवाहन:
तुम्ही वयाने, अनुभवाने या वयोगटातील मुलामुलीपेक्षा/ तरुणांपेक्षा मोठे आहात. कोवळया वयातील/ तरुणांसाठी सर्व प्रकारच्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम तुमचे आहे.
युरोपियन युनियनने ए आय पर्सनल असिस्टंट उद्योगाला रेग्युलेट करण्यासाठी पावले उचलली आहेत. भारत सरकारने देखील या आघाडीवर प्रोऍक्टिव्हली कृती केली पाहिजे.
संजीव चांदोरकर (३ नोव्हेंबर २०२५)