- 36
- 1 minute read
एका शिक्षिकेच्या निवृत्ती निमित्ताने.- शाम शिरसाट
तर,..खऱ्या अर्थाने आपण महासत्ता असणाऱ्या देशांच्या पंगतीमध्ये बसू शकू अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे हा लोकशाहीचा डोलारा कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
दि. 23/08/25 रोजी आयु. संगीता सुनील कदम मॅडमच्या निवृत्ती समारंभासाठी उपस्थित राहण्याचा योग आला. संगीता मॅडम या वडाळा बी पी टी कॉलनीमधील “मीनाताई कुरुडे मुलींच्या रात्रशाळेत “मुख्याध्यापिका” म्हणून कार्यरत आहेत. याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी मॅडमच्या कार्याचा गौरव करताना रात्रशाळांची सध्याची परिस्थिती सांगितली. यामध्ये रात्र शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती , त्यांच्यावरील जबाबदाऱ्या आणि विशेष म्हणजे त्यांच्या पालकांची शिक्षणविषयक समज हे अतिशय गंभीर वाटल्याने लिहिणे गरजेचे वाटले, म्हणून हा लेखप्रपंच.
एकीकडे लाखों रुपये फी भरणारे, सर्व प्रकारच्या सुविधा देणारे पालक मिळूनही विद्यार्थी शिकत नाहीत तर दुसरीकडे अगदी शहरातसुद्धा पालकांची अनास्था,आजूबाजूचे वातावरण शिक्षणासाठी पोषक नसूनही विद्यार्थी अशा शिक्षकांच्या मदतीने शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
त्यामध्ये आपल्या मायबाप शासनाने शिक्षण हा विषय अडगळीत टाकल्याने एकीकडे सरकारी शाळांची दुरावस्था, शाळा बंद होणे ही परिस्थिती तर दुसरीकडे खाजगीकरण वाढल्याने महागडी फी भरून शिक्षणाचा दर्जा सुमार अशा अवस्थेत सध्याचे पालक व विद्यार्थी सापडले आहेत. जर दिवसाच्या सरकारी शाळांची परिस्थिती वाईट असेल तर रात्र शाळांची अवस्था कशी असेल? एकेकाळी महाराष्ट्र हे शिक्षणात अग्रेसर राज्य होते. स्वतःचे शिक्षण मंडळ, बालभारती नावाची शैक्षणिक पुस्तके छापणारी जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था, मुंबई महापालिकेच्या स्वतःच्या शाळा, त्यामधील केवळ मराठी नव्हे तर हिंदी, उर्दू, तामिळ अथवा गुजराती असे विविध शिक्षण माध्यमे, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त रात्रशाळा हा आपला एकेकाळचा नावलौकिक!परंतु
आज मध्यम-उच्च वर्गाने खाजगी शाळांना प्रोत्साहन दिल्याने झोपदापट्टीमधील कनिष्ठ वर्ग दिवसांच्या शाळेत आपल्या मुलांना घालत असेल, तर रात्र शाळेसाठी मुले जमा करणे, ही किती कष्टची बाब असेल याचे या शिक्षकांनी सांगितलेले अनुभव उपस्थितांना नक्कीच अस्वस्थ करून गेले असतील.अशा परिस्थितीमध्ये MA, MED सारखी शिक्षण प्राप्त केलेल्या संगीता मॅडम या मुलींच्या शाळेत 1999 साली 8 दिवसांचा प्रकल्प करण्यासाठी जातात व तेथील अनुभवाने अस्वस्थ होऊन त्याच शाळेमध्ये पुढे 26 वर्षे नोकरी करून निवृत्त होत आहेत. या दरम्यान दिवसा पालक नोकरीला गेल्यानंतर घरी इतर भावंडना सांभाळण्यासाठी दिवसा शाळेत येऊ न शकणाऱ्या मुलींना रात्री शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्या पालकांची समजूत घालणे ही मोठी जबाबदारी त्यांच्यासारखे अनेक शिक्षक पार पाडत असतात. मुलींसाठी रात्रशाळा आणि शाळेसाठी गणवेश आवश्यक असणारी ही एकमेव रात्रशाळा असा नाव लौकिक.या कार्यक्रमात संगीता मंडमच्या भाऊ –बहिणी भेटल्या. ते सर्वजण सरकारी नोकऱ्यांमध्ये! केवळ शिक्षणावरील प्रेमामुळे त्यांनी या मुलींच्या रात्र शाळेतील नोकरी स्वीकारली.
गरीब कि श्रीमंत असो, मुले सर्वत्र सारखी असतात. फक्त पालकांच्या जाणीवांमध्ये फरक पडतो, यामध्ये संस्कृतीचा फार मोठा भाग असतो.फार पूर्वी ब्राम्हण समुदाय गरीब असला तरी सांस्कृतिक दृष्टया वरचढ असल्याने गरीब पालकसुद्धा आपल्या मुलांना शाळेमध्ये शिकण्यासाठी प्रोत्साहन देत होते. प्रसंगी या विद्यार्थ्यांना माधुकरी देऊन त्याला शिक्षणासाठी मदत करणारा त्यांचा समाज होता, त्यामधून अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी निर्माण झालेले आपल्या बघण्यात आहेत. याउलट बहुजन समाजात जातीतंर्गत व्यवसाय करण्याच्या संस्कृतीने मुलाला शिकण्याऐवजी व्यवसाय अथवा शेतीमध्ये जुपला जात असे तर मुलींची पाळण्यात लग्ने लावून चूल आणि मूल यापलीकडे त्यांचे अस्तित्व नव्हते.
पुढे स्वातंत्र्यानंतर संविधाना मुळे फुले -शाहू -आंबेडकर -भाऊराव पाटील इ. समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे बहुजन समाजातील मुले सरकारी शाळा, हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण पूर्ण करू लागली व त्यांची आज ही सामाजिक व आर्थिक भरभराट झालेली आपण पहातो.तात्पर्य, पुढील पिढ्यामध्ये शिक्षणविषयक जाणीवा निर्माण करून त्यांच्यामधून एक आदर्श नागरिक निर्माण होण्यासाठी समाज आणि शासन या दोघांची आवश्यकता राहणार आहे.त्यासाठी चांगल्या दर्जेदार शाळा व शिक्षक निर्माण करण्याची आवश्यकताआहे.
युरोपमधील अनेक राष्ट्रे, जपान पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांमध्ये बेचिराख झाली. तरीही त्यांनी त्यामधून पुन्हा फिनिक्स पक्षांप्रमाणे पुन्हा मोठी प्रगती केल्याचे आपणांस आढळून येतो, यामध्ये त्यांनी स्वतःमध्ये व आपल्या नागरिकांमध्ये निर्माण केलेल्या संस्कृतीचा मोठा वाटा आहे. युरोप किंवा जपानमध्ये पूर्वी राजेशाही व धर्माचे प्राबल्य होते. परंतु 14-16 व्या शतकात शतकात तेथील सुशिक्षित मध्यमवर्गाने पुनःजाग्रणाची (renaissance) सुरू केलेली चळवळ. यामधून तेथे राजा व धर्माची सत्ता समाप्त होऊन तर्कवाद व विज्ञानवादाचे युग सुरु झाल्याने शिक्षणातून अनेक शोध लागल्याने औद्योगीकरणाला चालना मिळून ही राष्ट्रे महासत्ता होऊन जगावर राज्य करू लागली. हा कालखंड 200- 300 वर्षाचा असल्याने तेथे एक संस्कृती निर्माण झाल्याने आजही हे देश प्रगत लोकशाही म्हणून गणले जात आहेत. यामध्ये नागरिकांच्या हिताला प्राधान्य मिळत असल्याने हे देश सर्व कसोट्यावर आज पुढे आहेत.केवळ किती क्रमांकाची अर्थव्यवस्था हा तेथे मापदंड मानला जात नाही.
आज खऱ्या अर्थाने आपल्या देशात कायदा व लोकशाही अस्तित्वात येऊन उणीपुरी 75 वर्षे झाली आहेत.तेव्हा विकास म्हणजे सर्वांसाठी आरोग्य, शिक्षण व जगण्याच्या सर्वोत्तम संधी सर्वांसाठी आपण उपलब्ध करू शकलो, तर खऱ्या अर्थाने आपण महासत्ता असणाऱ्या देशांच्या पंगतीमध्ये बसू शकू अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे हा लोकशाहीचा डोलारा कोसळण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा किमान सुशिक्षित मध्यमवर्ग जो या व्यवस्थेचा लाभार्थी झाला आहे, तो यासाठी पुढाकार घेईल काय?
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बहुसंख्यक सुशिक्षित मध्यमवर्ग आज धर्माभिमानी, दैववादी व सोयीचा विज्ञानवादी झाल्याचे दिसून येते.आर्थिक समृद्धी आल्याने कमालीचा तो कुटुंब केंद्री झाल्याचे आपणास आढळून येत आहे .त्यामुळे एखादा मंत्री बिनधास्त त्यांच्या मुलांना जगातील पाहिला अंतराळवीर म्हणून हनुमान असल्याची लोणकढी थाप मारत असल्याचे वैषम्य त्याला वाटत नाही.देशात जातीव्यवस्था नष्ट होण्याऐवजी प्रत्येकाला आज आपल्या प्रगतीसाठी जर आरक्षणाची आवश्यकता वाटत असेल तर आपली प्रगती कुठल्या दिशेने होतं आहे, याचा या निमित्ताने प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.