- 34
- 1 minute read
एका साहित्य संमेलनाचे ‘न झालेले’ एक अध्यक्षीय भाषण
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 44
एका साहित्य संमेलनाचे 'न झालेले' एक अध्यक्षीय भाषण
समता आणि समरसता हे समानार्थी शब्द आहे असे विपूल प्रमाणात भ्रमोत्पादन होत असलेल्या वर्तमानात मी जगतो आहे. समता आणि समरसता हे शब्द जर समानार्थी असतील तर समरसता हा वेगळा शब्द रुजविण्याची गरजच काय असा प्रश्नही पडू नये इतपत प्रश्नांची “नसबंदी” झालेल्या काळाचा मी साक्षीदार आहे. समतेची ” शंभरी” भरली व समरसतेने शंभरी पूर्ण केली या उत्सवी व उन्मादी वातावरणात मी सध्या वावरतो आहे. देशाला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले हा भ्रम असून खरेखुरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले हे वास्तव आहे हे कान किटवून घेण्याइतपत ऐकण्याची वेळ आलेल्या काळात मी जगतो आहे. १९४७चे स्वातंत्र्यच खरे नसेल तर त्या स्वातंत्र्यासाठी लढणारा नायक हा ” राष्टपिता” कसा असू शकतो? मग २०१४ च्या स्वातंत्र्याचा जनकच स्वाभाविकपणे “राष्ट्रपिता’ असणार. मग ते प. पू. हेडगेवार असू शकतीलवा प.पू. गोळवलकर गुरुजी असू शकतील किंवा नमो ही असू शकतात. पण ते निश्चितच महात्मा गांधी असणार नाही? अर्थात गांधी हत्येला ” वध” ठरवूनच त्यांनी या प्रश्नाचा सोक्षमोक्ष फार पर्वीपासून लावून ठेवलेला आहे आणि तो आम्ही स्विकारला ही आहे. एकवेळा गांधी हत्येला आम्ही “वध” म्हणून स्वीकारले असेल तर आम्ही गांधींचे ” खलनायकत्व ” व नथूरामा गोडसेंचे ” नायकत्व” मनोमन स्विकारले हे मान्य
करायला कां कू का ? एवढेच नव्हे तर गांधी ” वध” हा शब्द स्विकारला म्हणजे गांधी हा “राक्षस”‘ होता आणि त्याचा वध करणारा गोडसे हा पर्यायाने परमेश्वर होता हे आम्ही स्विकारलेले असते. रावणाचा वध होत असतो.कंसाचा वध होतअसतो.कारण ते राक्षस असतात.
रावणाचा वध करणारा राम हा परमेश्वर असतो.कंसाचा वध करणारा कृष्ण हा परमेश्वर असतो.त्याच न्यायाने गांधीचा वध करणारा गोडसे हा ही परमेश्वरच ठरतो. रामाचे मंदिर उभारणे असो वा कष्णाचे मंदिर उभारणे हे आक्षेपार्ह होत नाही त्याच न्यायाने मग गोडसे ह्यांच्या मंदिर उभारण्याला आक्षेप असण्याचे कारण काय’?
असा प्रश्न उपस्थित होतो. गांधी हत्येला “वध” म्हटल्या गेले त्या मागे गांधीला राक्षस ठरवणे. गोडसे ला परमेश्वर ठरविणे व गोडसेच्या मंदिर उभारण्याचा तात्विक मार्ग मोकळा करणे इतका “अनर्थ” वध शब्द स्विकारल्या मुळे होतो. समतेचा विरोध आणि समरसतेच समर्थन ते करतात पण समरसता म्हणजे काय याचा अर्थ कधी त्यांनी सांगितला नाही. आणि ते सांगणारही नाही. समरसतेचा अर्थ सोप्या भाषेत सांगायचा झाल्यास वाघाच्या तावडीत बकरी सापडली असेल तर बकरीने हातपाय झाडू नये. बे बे म्हणून ओरडू नये, बकरीने कोणताही प्रतिकार करू नये.शांतपणे, आनंदाने वाघाशी समरस होऊन जावे व आपल्या आयुष्याचे सार्थक झाले असे मानावे ही झाली समरसता.
उच्चवर्णीयांना वाघ मानले तर अन्यवर्णियांना बकरी समजणे ही ” समरसता'” समजुन घेता येते. “समरसता” वाल्यांनी शंभर वर्षे पर्ण केली आहेत. त्या निमित्ताने आरत्याही ओवाळल्या जात आहेत.राष्ट्रभक्तीने प्रेरीत व राष्ट्र समर्पित “समरसता” वाले स्वातंत्र्याच्या लढयात का व कोठे गहाळ होते हा प्रश्न मात्र क्वचितच विचारला जातो. स्वातंत्र्याच्या लढ़यात नसलेले हे लोक
स्वातंत्र्य लढ्याबाबत अनेक प्रश्न मात्र आवर्जून उपस्थित करतांना दिसतात. अहिंसेने कधी कोणाला स्वातंत्र्य मिळाले आहे का?” रणांगणातूनच पळ काढणारे विचारतात, “रणाविणा स्वातंत्र्य कुणा मिळाले?”
गांधींनी भगतसिंगासाठी काय केले? सरदार पटेलांना डावलून पंडित नेहरूंना गांधींनी का पंतप्रधान बनविले? नेताजी सुभाषचंद्र बोसांना गांधींनी कॉग्रेसच्या अध्यक्ष पदावरून कपट-कारस्थाने करून हुसकावून लावले. गांधी नेहरूंमळे फाळणी झाली. गांधी -नेहंरूंनी मूस्लिमांना लाडावून ठेवल्या मुळे मुस्लिम शेफारले असल्या कंडया ते आजपावेतो पिकवित आलेले आहेत. या प्रश्नांचे रान त्यांनी एवढया मोठया प्रमाणात पिकविले आहे की विचारता सोय नाहीं. लहान मुलांच्या हातून चूक झाली तर ते आईच्या रागावण्याच्या आधिच भोकांड पसरते अश्यातला हा प्रकार आहे.
या भोकांड पसरण्यामुळ, टिळकांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य
मागणारे गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ़याला का विरोध करत होते?
स्वातंत्र्य दिवस या समरसता वाल्यांनी “काळा दिवस” म्हणून का पाळला? राष्ट्र्वजाला यांचा विरोध का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयी राष्ट्रध्वज स्वातंत्र्या नंतर पंचावन्न वर्षे म्हणजे २००२ पर्यंत का फडकविल्या गेला नाही. २६ जानेवारी २००१ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर तीन तरुणांनी झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला. त्यांना तुरुंगात डांबून त्यांच्यावर खटला भरण्यात आला.१२ वर्षे हा खटला चालला.न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. ब्रिटिश राजवटीत झेंडा फडकविण्याबद्दल शिक्षा व्हायची तोच प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झेंडा फडकावण्याबाबत झाला. तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशप्रेमी! स्वातंत्र्य लढ़्यात लाठ्या खाणारे, बंदुकिच्या गोळीला बळी पडणारे, फासावर हसत हसत लटकणारे, तुरुंगवासात यातना भोगणारे ” देशद्रोही” आणि १९४२च्या आंदोलनाला विरोध करणारे, एवढंच नव्हे तर हे आंदोलन चिरडण्यासाठी जी काही आमची मदत लागेल ती आम्ही सहर्ष करु असे पत्र स्वातंत्र्य लढ्यात टिळकांच्या नेतृत्वात सहभागी असलेले बहुतांश उच्चवर्णीय महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यापासून दुर का पळाले? एवढेच नव्हे तर त्या स्वातंत्र्य लढ़याला त्यांनी विरोंध का केला? या प्रश्नापासुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही पळ काढला तरी आपण ही गोष्ट समजावून घेतली पाहिजे व इतरांना समजावून सांगितली पाहिजे.
१८१८ मध्ये ब्रिटिशांचा झेंडा शनिवार वाडयावर रोवण्याआधी महाराष्ट्रात सत्ता होती ती पेशव्यांची. सत्ता पेशव्यांच्या ताब्यातून ब्रिटिशांच्या हाती गेली होती. तात्कालीन प्रचलित विद्वानांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ” ज्या अर्थी चित्पावन ब्राम्हणांच्या हातून ब्रिटीशांनी सत्ता मिळवली असेल,तर ती सत्ता परत चित्पावन ब्राम्हणांनीच मिळवली पाहिजे व त्यांनीच ती भोगली पाहिजे”. एवढाच टिळकांच्या नेतृत्वातील स्वातंत्र्याचा अर्थ होता.ही चौकट टिळकांनी स्विकारली होती. ११ नोव्हेंबर रोजी अथनी येथिल भाषणात ते म्हणतात.” शेतकऱ्यांनी विधिमंडळात जावून काय नांगर धरावयाचा आहे? शिंप्यांनी तिथे जाऊन काय शिलाई मशीन चालवायची आहे? आणि वाणी तेथे जाऊन काय तराजू धरणार आहेत? असे म्हणत असताना, ब्राह्मण तिथे जाऊन काय पूजा पाठ करणार आहेत? हा प्रश्न टिळकांना पडत नाही.कारण बाहेरच्या ” जातीबंद” समाज व्यवस्थेच्या उतरंडीच्या, उच्चनीचतेच्या, अस्पृश्यतेच्या, सोवळ्या-ओवळ्याच्या प्रभावापासून टिळक मुक्त नाही हेच खरे.म्हणूनच ते केवळ “राजकीय” स्वातंत्र्याचा आग्रह धरतात आणि ” सामाजिक” स्वातंत्र्याचा विरोध करतात.
त्यामुळेच टिळक यांचे अनुयायी श्रिधर विठ्ठल दाते हे काँग्रेसच्या राजकारणी अधिवेशनाला सामाजिक समस्यांच्या चर्चेला” विटाळ” असे म्हणत.आणि सामाजिक समस्येच्या विटाळाने कॉग्रेसच्या अधिवेशनातील मंडप बाटला तर तो “विटाळलेला” मंडपच जाळून टाकण्याची धमकी देत. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ़याचे नेतृत्व करु लागले तेंव्हा पासून त्यांनी काँग्रेसचे राजकारणी व्यासपीठ बाटविण्यास सुरुवात केली अशी सनातन्यांची पक्की धारणा बनली होती. त्याला कारण ही तसेच होते.गांधींनी १९१६च्या लखनौ कॉग्रेसच्या अधिवेशनात व्यासपीठावर चंपारणच्या शेतकऱ्याला बोलावून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला सांगितले. १९२०च्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात तर त्यांनी कहरच केला. काँग्रेसचे राजकारणी व्यासपीठ त्यांनी अस्पृश्यता विरोधी ठराव करण्यासाठी वापरले.कधी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी ‘ वापरले. गांधींसाठी स्वातंत्र्य हे साध्य नसून ‘ गांधींनी अस्पृश्यता निवारण. हिंदू -मुस्लिम ऐक्य,समता, बंधुता या गोष्टींसाठी स्वातंत्र्य लढ्याला
साधन” म्हणून वापरणे सुरू केले.
इंग्रजांच्या गुलामगिरीतून तर मुक्त व्हायचे आहे पण आमच्या जन्मजात वर्णश्रेष्त्वाच्या टाचेखालीच सारा देश आहे तसाच गुलाम राहीला पाहिजे ही ज्यांची धारणा होती त्याना गांधींच्या स्वातंत्र्याची कल्पना कशी काय रुचणार? त्यामुळे त्या स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी व्यक्तिगत प्रयत्न न करता संघटितपणे प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले. त्या संघटनेचे नाव राष्टीय स्वयंसेवक संघ.बाकी त्यांनी कोणतेही आवरण घेतले असेल, वेळोवेळी कोणतेही मुखवटे चढवले असले तरीही मूळ उद्देश एकच.गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ़याला विरोध करणे. या लढयाच्या नेतृत्वाला विरोध करणे. त्यांची यथेच्छ टिंगल-टवाळी करणे.त्यांना हिंदू विरोधी ठरवत मुस्लिमधार्जिणे ठरविणे. “रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले” असं म्हणत अहिंसक लढयाची थ़ट्टा करणे, मिठाच्या सत्याग्रहाची टर उडविताना, हळदी,मिठ, तिखटाचे सत्याग्रह करून थोडीच स्वातंत्र्य मिळत असतं असा उलट प्रश्न करणे.गांधींच्या स्वातंत्र्य लढयातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान एवढेच आणि हीच यांची “देशभक्ती”! हीच मंडळी आता लोकांना देशभक्तीचे प्रमाण पत्रे वितरित करणार? बरं यांच्या
देशभक्तीची व्याख्या तरी काय? मी आणि माझी जात म्हणजे देश.त्या जातीचे श्रेष्ठत्व व वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे राष्ट्रकार्य.बस एवढेच. यांचा राष्ट्रवाद थोडा खरडला की हिंदुत्व दिसते आणि हे हिंदुत्व थोडे खरडले की त्याच्या आड दडलेले ब्राम्हणत्व उघड पडते .राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी प. पु. गोळवलकर गरुजींचे इंग्रजीतील ” बंच ऑफ थॉटस “व त्यांचेच मराठी अनुवादित “विचारधन” हे पुस्तक ईश्वरीय ग्रंथासारखे आहे.या ग्रंथात गोळवलकर गरुजींनी चातुर्वर्ण व्यवस्थेचे उघडपणे केलेले गुणवर्णन, जातीव्यवस्थेचे केलेले समर्थन, मुस्लिम शत्रु क्रमांक एक, ख्रिश्चन शत्रु क्रमांक दोन, कम्युनिस्ट शत्रू क्रमांक तीन असे सगळेच आहे. गोळवळकर गरुजी या ग्रंथात म्हणतात, “चातर्वर्ण्य म्हणजे सर्व शक्तिमान परमेश्वराचेच चतुर्विध स्वरूप.त्याची सर्वानी आपापल्या पद्धतीने व शक्तीनुसार पूजा करावयाची. ज्ञानदानामुळे जसा ब्राह्मण श्रेष्ठ त्याचप्रमाणे क्षत्रिय हा शत्रूचा नाश करीत असल्यामुळे तितकाच श्रेष्ठ समजला जाई .
शेती व व्यापार करुन समाजाचे धारण-पोषण करणारा वैश्य आणि समाजाची सेवा करणारा शूद्र यांचेही स्थान कोणत्याही प्रकारे कमी महत्वाचे नव्हते.अभेद वृत्तीने परस्पराना सहाय्य करणाऱ्या या सर्वांची मिळून झालेली ती समाजव्यवस्था होती.”
किती सहजपणे गुरुजी हे आपल्याला सांगतात. चारही वर्णांची कर्मे वेग वेगळे असली तरीही सर्वाचे समाजातील स्थान महत्वाचे होते. समाजातील सर्व कामांचे स्थान समान महत्वाचे असेलही पण ही वेगवेगळी कामे करणाऱ्या माणसांचे समाजातील स्थान समान महत्वाचे होते काय? तर याचे उत्तर नाही असे आहे.
या माणसांचे समाजातील स्थान समान असते तर माणसामाणसामध्ये “शिवाशिव” कशी आली असती? एखाद्या माणसाच्या स्पर्शाने, एवढेच नव्हे तर त्याच्या सावलीच्या स्पर्शाने देखल माणसे कशी विटाळली असती? माणसे विटाळत होती, त्यांच्या स्पर्शाने पाणी बाटत होते. मंदिर विटाळत होती.बर ह्याच माणसांनी मंदिर बांधली तेंव्हा ती पवित्र होती पण मंदिर बांधून झाल्यानंतर मात्र त्यांच्या प्रवेशानेच ती मंदिरे अपवित्र होत होती. गोळवळकर म्हणतात त्याप्रमाणे चातुर्वर्ण्य म्हणजे सर्व शक्तिमान परमेश्वराचेच चतूर्विध रुप होते तर त्या शक्तिमान ईश्वराने तितक्याच सहजपणे चारही वर्णाच्या ” कर्तव्या” ची एक्सचेंज ऑफर ठेवायला हवी होती.
म्हणजे सहजपणे “चेंज” म्हणून त्यांनी शुद्रांना ज्ञानदानाचे काम दिले असते, आणि ज्ञानदानाचे काम करणाऱ्यांना “चेंज” म्हणुन गटार साफ करण्याचे काम दिले असते तर किती बरे झाले असते. आणि त्या वेळेस चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे गोळवलकर गुरुजींनी समर्थन केले असते तर समजू शकले असते . एवढेच नव्हे तर शक्तिमान परमेश्वराने या चारही वर्णाच्या जन्माच्या जागाही कधीतरी बदलून बधितल्या असत्या तर! प्रत्येक वेळेस ब्रम्हदेवाच्या तोंडातून ब्राम्हणच जन्माला यावा? एखाद्या वेळेस ब्राह्मण ब्रम्हाच्या पायातून जन्माला आला असता तर चालले नसते का? “‘एक्सचेंज ऑफर'” अंतर्गत ब्राह्मणांकडे गटारं साफ करण्याचे कर्तव्य आले असते आणि शूद्रांकडे ज्ञानदानाचे काम सोपवले असते आणि या गटारं साफ करण्याच्या आनददायी अनुभवानंतर ही “ईश्वरीय” व्यवस्था अशीच कायम राहो ,असा आग्रह गरुजींनी धरला असता तर बरे वाटले असते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार म्हणजे, “आयजीच्या जिवावर बायजी उदार” सारखा प्रकार आहे.ही व्यवस्था गुरुजींना “ईंश्वरीय”वाटते कारण त्यात त्यांची सोय आहे. त्यांच्या जातीची सोय आहे.ज्या व्यवस्थेत मला जन्मजात श्रेष्ठत्व बिना कष्टाने आयतेच मिळत असेल. ती व्यवस्था ईश्वरीय
ठरविण्याचा मी खटाटोप करत असेल तर नवल नाही. ती व्यवस्था टिकावी यासाठी प्रयत्न करीत असेल तर त्यातही नवल नाही.पण त्यालाच कोणी त्याग म्हणत असेल, देशसेवा व देशभक्ती सारखे शब्द त्यासाठी वापरत असेल तर ते मात्र नवलच म्हटले पाहिजे.अर्थात असे काही उघडपणे म्हणणे धोकादायक आहे . ज्यांनी ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतो.ही बदनामीची “कुजबुज” मोहीम कुशलतेने राबविण्यात येते.त्याला दाद दिली नाही तर छळ केला जातो.यालाही जुमानले नाही तर हत्या केली जाते.या हत्येला नावे मात्र वेगवेगळी दिली जातात.कुणाच्या हत्येला वैकुंगमन, कुणाच्या उत्तरायणपंथे तर कुणाच्या हत्येला वध म्हटल्या जाईल.कुणाचा देहच गायब होईल सापडणारच नाही.
प. पू. गोळवळकर गुरुजींच्या “विचारधन” पुस्तकात एक किस्सा सांगितला आहे तो जसाच्या तसा खाली देत आहे. “आपले एक थोर क्रांतिकारक लाला हरदयाळ यांनी सांगितलेला एक प्रसंग पहा. दक्षिणेत एक इंग्रज अधिकारी होता. एक ‘स्थानिक नायडू गृहस्थ त्याचा सहाय्यक होता. त्या इंग्रजाचा चपराशी ब्राह्मण होता. एक दिवस हा इंग्रज मनुष्य रस्त्यावरुन चालला होता.
त्याचा चपराशी त्याच्या मागून चालला होता. समोरुन त्या इंग्रज गृहस्थाचा तो सहाय्यक आला. त्या दोघा अंमलदारांनी इंग्रजी पध्दतीने हस्तांदोलन करून एकमेकांचे स्वागत केले. परंतु त्या ‘सहाय्यक अधिकाऱ्याने त्या चपराश्याला पाहताक्षणीच आपले पागोटे
काढले व तो त्याच्या पाया पडला. तो इंग्रज अधिकारी विस्मयचकित झाला. त्याने आपल्या सहाय्यकाला प्रश्न केला,” मी तुझा वरीष्ठ अधिकारी असूनहीं तू ताठ उभा राहून माझ्याशी केवळ हस्तांदोलन केलेस,हा तर माझा नोकर आहे, भर रहदारीच्या रस्त्यात तू त्याच्यापढे लोटांगण घातलेस, हे कसे काय?” त्या साहाय्यक अधिकाऱ्याने उत्तर दिले , ” आपण माझे वरिष्ठ अधिकारी आहात हे खरे, हा आपला नोकर असेल, परंतू आमच्या समाजामध्ये जो वर्ग शतकानुशतके आदरणीय मानला जात आहे त्या वर्गामधील तो आहे त्याच्यापुढे मस्तक नमविणे हे माझे कर्तव्यच आहे.”
ही कथा सांगण्याच प्रयोजन स्पष्ट आहे. कथेच्या रुपात का असेना ही कथा स्पष्ट संदेश देते. हाच संदेश रामदास स्वामी ही देतात ,” ब्राह्मण झाला भ्रष्टI तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ” या कथेत भ्रष्ट च्या जा्गी फक्त” चपराशी ” हा शब्द आहे एवढाच काय तो फरक.शब्द कोणताही घाला ब्राह्मण शतकानूशतके “श्रेष्ठ” राहील. रहावा एवढेच राष्टीय स्वयंसेवक संघाचे प्रयोजन. बाकी सारी सोंग
सध्या भयाचे आणि भ्रमाचे उत्पादन तेजीत आहे.भयाच्या आणि भ्रमाच्या वातावरणात ” पोषणाचे” मुद्दे मागे पडतात. भयाच्या वातावरणात तहान भूकेचा आपसूकच विसर पडतो. जीवसृष्टीचा सारा पसारा प्रजनन,पोषण आणि संरक्षण या तीन मुख्य प्रेरणांभोवती फिरत असतो. आपली वंशवृद्धी व्हावी,तिचं पोषण व्हावे, संरक्षण व्हावे यातही पोषणाचा आणि संरक्षणाचा मुद्दा परिस्थितीनुसार वर- खाली होत राहतो. सर्वसाधारण परिस्थिती असेल तर पोषणाचा मुद्दा महत्वाचा वाटतो.पण परिस्थिती
सर्वसामान्य नसेल, वातावरण असुरक्षित असेल, भयग्रस्त असेल तर पोषणाचा मुद्दा गौण ठरुन संरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरतो. उदा.मी दोन -तीन दिवसांचा उपाशी आहे.पोटात अन्नाचा कण नाही.तिसऱ्या दिवशी
माझ्यासमोर अन्नाचं ताट आहे आणि पोटात भूक आहे . मी ताटावर बसतो. तेवढ्यात शेजारी आग आग असा गलका ऐकू येतो.मी भरल्या ताटावरुन तहान भूक विसरून उठतो.येथे पोषणापेक्षा भयापोटी संरक्षणाचा
मुद्दा महत्वाचा ठरतो.सध्या अशाच धोरणाचा अवलंब राष्ट्रीय स्तरावर होतांना दिसत आहे.” हिंदू खतरेमे है”.
मुसलमानांपासून हिंदुना धोका.लव्ह जिहादच्या धोका.व्होट जिहादचा धोका.मुस्लिमांची लोकसंख्या वाढते आहे. हिंदूंची लोकसंख्या कमी होते आहे.म्हणून हिंदूंची लोकसंख्या वाढविली पाहिजे.हम दो हमारा एक किंवा हम दो हमारे दो हे विसरून, अधिक संख्येने पोरं पैदा करा.म्हणजे स्री ने पोरं पैदा करण्याची “मशिन'”‘ बनाव आणि पुरुषाने त्यावर “काम” करणारा कामगार. बरं हा सल्ला कोण देतात तर आजन्म अविवाहित राहणारे संघ कार्यकर्ते,साधु, साध्व्या. ज्यांचा अर्थाअर्थीं या प्रकरणाशी संबंध नाही.
आपल्या देशावर साडेआठशेच्या वर्षापेक्षा जास्त वर्ष मुस्लिमांचे राज्य होते व दिडशे वर्षं ब्रिटिशांचे म्हणजे खिश्चनांचे राज्य होते.हा कालखंड जवळपास हजार वर्षाच्या वर होतो.हा कालखंड कमी नाही.या दिर्घ कालखंडात मूस्लिम व ख्रिश्चनांचे राज्य असतांना हिंदुची लोकसंख्या कमी झाली नाही. हिंदु अल्पसंख्याक झाला नाही. पण आता राज्य आपले असतांना मात्र हिंदुची लोकसंख्या कमी होते आहे.हे कठले तर्कट? पण ते दिल्या जाते.त्यातून मुस्लिमांविषयीचा द्वेषही तयार होतो आणि भिती सुध्दा.यातून मस्लिमांची संख्या वाढली तर? म्हणजे एकाच वेळेस भय आणि भ्रमाची निर्मिती. मुस्लिमांनी व ख्रिश्चनांनी जबरदस्तीने व प्रलोभने देऊन धर्मांतरे घडवून आणली या भ्रमाच उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते.पण त्यात कितपत तथ्य आहे? मुस्लिमांच्या अन्याय , अत्याचाराला कंटाळून धर्मांतरे कमी झालीत उलट ब्राम्हणी धर्माच्या जाचाला कंटाळलेल्या हीन, शूद्र जातीतील असंख्य लोकांनी इस्लाम धर्माचा अंगीकार केला होता. खालच्या वर्गात धर्मांतर फारच लवकर होत असे.विशेषतः ब्राह्मणांचे स्पृशास्पश्यतेचे नियम ज्यांना जाचक वाटत ते फारच जलद स्वधर्म सोडीत असतं. मुस्लिमांच्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून धर्मांतरे कमी झाली. पण ब्राह्मणी
धर्माच्या जाचाला कंटाळून झालेलं लाखो लोकांचं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील धर्मांतराचे आपल्या पैकी बरेच लोक साक्षिदार असतील.१९३६ मध्येच या जाचाला कंटाळून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी,” मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरीही हिंदू म्हणन मरणार नाही. “असा इशारा त्यांनी दिला होता.
या दरम्यान त्यांनी चवदार तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह केला. अस्पृश्यांच्या मंदीर प्रवेशासाठीची आंदोलने केली.त्याला विरोध झाला. हिंदू धर्मात मानविय वागणूक मिळणारच नसेल. अस्पृश्यांना सन्मानाने वागवले जाणारच नसेल तर हिंदू धर्मात रहायचे कशाला? म्हणत त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत नागपूरलाच धर्मातर केले.ते काही कोण्या मस्लिमांच्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून नव्हे.तर हिंदू म्हणवून घेणाऱ्या, वर्णश्रेष्त्वाच्या गंडानी पछाडलेल्या हिंदूंना कंटाळून . आपल्याच हिंदू बांधवांवर केलेल्या अन्याय अत्याचाराला लपविण्यासाठी यांनी वारंवार अन्य धर्मीयांचा तोही विशेषतः मुस्लिमांचा कुशलतेने वापर केला आहे.ज्ञानेश्वरांच्या आईवडीलांना छळणारे व त्यापोटी त्यांना आत्महत्या करायला लावणारे कोणी मुस्लिम नव्हते.ज्ञानेश्वरादि भावंडांनाही छळणारेही कोणी मुस्लिम नव्हते. तुकारामाला छळायला,त्यांच्या गाथा इंद्रायणी मध्ये बुडवायला व तुकाराम महाराजांना थेट वैकुंठाला रवाना करायला औरंगजेबाने आपले सैन्य पाठवले नव्हते वा खुद्द औरंगजेब आला नव्हता.उलट औरंगजेबासाठी दुवा मागणारे व शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे हेच आपले धर्ममार्तंड होते. आज तेच नव्याने नव्या अवतारात, नव्या रुपात,आकारात सत्तेच्या आधाराने सक्रिय झाले आहेत. यांच्या पासुन सावध रहाणे व इतरांनाही सावध करण्याचे काम साहित्यिक बंधूंना करावयाचे आहे.
चंद्रकांत वानखडे
0Shares