सार्वजनिक जीवनात लोक येतात आणि जातात. नेत्यांवरच नाहीतर कार्यकर्त्यांवर सुद्धा टिका टिपणी होतंच असते. आजचे समर्थक, उद्या विरोधक होऊ शकतात, तर आजचे विरोधक उद्या समर्थक होऊ शकतात. हे सत्य स्वीकारून त्यानुसार धोरण आखले पाहिजे. मात्र, संघटनेच्या अंतिम ध्येयासह विचारधारेतील सातत्य नेत्याने प्रामाणिक पणे जपने गरजेचे असते. असे केल्यास, जे लोकं एका विशिष्ट दिवशी एखाद्या संघटनेच्या विरोधात असतील, ते नंतर अशा संघटनेचे अनुयायी होऊ शकतात. यासाठी प्राथमिक अट अशी आहे की, संघटनेचे कट्टर अनुयायी मानणाऱ्या जुन्या लोकांनी, इतरांनी कितीही टीका केली तरी, त्यांनी आपले विचार मांडताना संयम व शालीनता बाळगने गरजेचे आहे. त्यामुळे, जे लोकं आज विरोधात आहेत, ते विचार करू शकतात की, जो काही वादविवाद आहे, तो वैचारिक व निष्ठावान लोकांशी आहे. परिणामतः आजचे विरोधकांचे मत परिवर्तन होऊन, एक ना एक दिवस ते सकारात्मक होतील आणि सोबत काम करू लागतील. कोणत्याही संस्थेच्या यशाचा हाच मंत्र आहे आणि तो पूर्णपणे अशा कट्टर अनुयायांच्या हातात असतो. अन्यथा, इतर लोकांप्रमाणे, संघटना देखील येतील आणि जातील. काही असल्या तरी त्यांचे अस्तित्व दिसेनासे होत असते व त्यांचा समाजाला काही उपयोग होत नाही. परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, काहीच स्थिर नाही. माणसाचे मन सुद्धा या नियमाला अपवाद नाही, उलट माणसाचे मन अति चंचल असल्याने, ते लवकर परिवर्तित होऊ शकते, हा नैसर्गिक नियम व बुध्दांची शिकवण विसरून चालणार नाही.